Man’s Search for Meaning – Viktor Frankl

नमस्कार मित्रांनो, मजेत आहात ना?
आज ज्या पुस्तकाची माहिती मी येथे देणार आहे त्या पुस्तकाने मला निशब्द केलेले आहे.
व्हिक्टर फ्रँकेल, एक ज्युईश मानसशास्त्रज्ञ. १९४२ च्या दरम्यान हिटलरच्या नाझी सैन्याने त्याला कैद केलं आणि एका छळ-छावणीत त्याची रवानगी केली. तिथे त्याने सुमारे ४ वर्ष काढली. तिथल्या ४ वर्षाच्या आयुष्यावर बेतलेले हे पुस्तक Man’s Search for Meaning.

का वाचावे?

आपल्याला आयुष्यात अनंत अडचणी येत असतात. कधी कधी तर त्या इतक्या सलग येत राहतात कि उबग येऊ लागतो. माझ्याच नशिबी हे सर्व का असा प्रश्न मनात येऊ लागतो. असा प्रश्न पुन्हा जर मनात आला तर त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ह्या पुस्तकात आहे. ज्याने हे पुस्तक वाचले आणि व्यवस्थित समजावून घेतले त्याला आयुष्यात पुन्हा कधीहि निराशा घेरू शकत नाही आणि म्हणून हे पुस्तक वाचायला तर हवेच परंतु संग्रहीसुद्धा हवे.

सारांश:
पुस्तक २ भागांमध्ये विभागलेले आहे.

१ला भाग:

व्हिक्टरने छळछावणीत व्यथित केलेल्या आयुष्याचे चित्रण यात दिलेले आहे. छळछावणीत प्रवेश मिळाल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ज्यू लोकांची होणारी विभागणी. पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि अनुत्पादित माणसे ज्यामध्ये म्हाताऱ्या व्यक्ती, आजारी आणि अपंग लोक जे शारीरिक कामासाठी अयोग्य होते.
परिणामी, सर्व कुटुंब इतस्त्तः विखुरल्या जायचे. नंतर कोणीच कोणाला भेटू वा पाहू शकत नव्हते.
सर्वांकडून सर्व कागदपत्र जप्त केली जायची. जाळून टाकली जायची. त्यांची सर्व ओळख मिटवली जायची आणि दिल्या जायचा एक कैदी नंबर, ज्या नंबरने नंतर त्यांना ओळखले वा बोलावले जायचे.
शारीरिक कष्टायोग्य पुरुष आणि स्त्रियांकडून मरेस्तोवर काम करून घेतले जायचे.
लहान मुले, आजारी, अपंग आणि म्हातारी माणसे यांना गोळ्या घालून ठार केले जायचे अथवा विषारी वायूच्या रूममध्ये कोंडून मारले जायचे.
कसे असेल ते आयुष्य? आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतके ते भयंकर होते. सकाळी ४.३०-५.०० ला उठवले जायचे. आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये ओळीने चालत जिथे कुठे रस्ता बनविणे, रस्ता खोदणे आणि इतर जी शारीरिक कष्टाची कामे असतील तिथे चालत घेऊन जायचे. कधी तरी मध्यंतर होईल तेंव्हा एक ब्रेडचा तुकडा आणि वाटीभर सूप, तेही पांचट-बेचव प्यायला दिलं जायचं. एवढाच काय तो दिवसभराचा आहार. हळूहळू दिवसागणिक शक्ती क्षीण होत जाऊ लागते. काम करताना जखमा होतात, पाय चालून-चालून आणि दिवसभर काम करून इतके सुजतात कि बुटामध्ये पाय घालणे कठीण होऊन जाते. शरीराची चाळणी होते, कपड्यांची लक्तरे होतात.

परंतु, सतत एक भीती पिंगा घालीत असते. जर कोणी आजारी आहे असे जाणवले, कोणी जखमी झाले आणि काम करू शकत नाही असे नाझी सैनिकांना वाटले तर मग मात्र …निवड होणार… विषारी वायूच्या रूममध्ये कोंडून अथवा गोळ्या घालून ठार केले जाणार.

एका प्रसंगामध्ये एक थोडा वयस्कर व्यक्ती नुकत्याच दाखल झालेल्या तरुण मुलांना धीर देतो..”काळजी करू नका, हे दिवस निघून जातील. फक्त एकच करा.. रोज तरुण दिसा, काहीच नाही भेटले तर चक्क काचेच्या तुकड्याने घासून का होत नाही परंतु रोज दाढी करा. त्याने तुमचा चेहरा तजेलदार दिसेल. तुम्ही काम करू शकता असे वाटेल. आणि मरणासाठी तुमची निवड होणार नाही”

इतके भयंकर आयुष्य कोणाच्या वाटेल येऊ शकते?… वाचतांना अंगावर शहरे येतात.

२ रा भाग:

आयुष्य म्हणजे काय? आयुष्याचा अर्थ काय ? असे आयुष्य आपल्याच नशिबी का आले? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे व्हिक्टरने इथे दिली आहेत. बरेचदा आपण आयुष्यात आपल्या अडचणींना कवटाळून बसतो आणि दुखी, कष्टी राहतो. व्हिक्टर वा इतर ज्यूंच्या वाट्याला जे आयुष्य छळछावणी आलं त्यात त्यांचा काहीहि दोष नव्हता. तरी त्यांना त्या भयंकर आयुष्याला तोंड द्यावे लागले.

व्हिक्टर म्हणतो इथेच यशस्वी लोकांचं वेगळेपण ठसठसून दिसतं.
त्या ४ वर्षात ते सर्वच लोक मेले ज्यांनी त्या दिवसांबद्दल आयुष्याला आणि नशिबाला दोष दिला. ह्या आयुष्याला काय अर्थ आहे? असे आयुष्य माझ्याच नशिबी का? आणि अश्या आयुष्यापेक्षा मेलेलं चांगलं, असा विचार जे सतत करत राहिले ते किती हि धडधाकट दिसत असले तरी, एक तर ते लवकरच आजारी पडून मेले किंवा त्यांनी स्वतःहून विजेच्या तारांना चिकटून आत्महत्या केली. उलट ज्यांनी सकारात्मक विचार केला, चांगल्या दिवसाची वाट पहिली आणि हे दिवस सरल्यानंतर पुढे आयुष्यात काय करायचे याचाच सतत विचार केला ते मग अगदीच किरकोळ शरीरयष्टीचे जरी असले तरी त्यांनी सर्व आजारपण, सर्व कष्ट आनंदाने झेलले आणि जिवंत परत आले.

त्यापैकीच एक म्हणजे लेखक व्हिक्टर फ्रॅन्कल. व्हिक्टरला कैद केले तेंव्हा तो मानसशात्रावर एक पुस्तक लिहीत होता. त्याचे हस्तलिखित नाझी सैनिकांनी जाळून टाकले. ते सर्व पुन्हा निर्माण करायचे असा ध्यास ठेऊन, दिवसभर हाल-अपेष्टा सहन करून, रात्रीतून तो पुन्हा लिखाण करीत असे. व्हिक्टरने आपल्या चिंतनातून लोगोथेरपी विकसित केली आहे. ह्या त्याच्या तत्वज्ञानामध्ये त्याने हे सिद्ध करून सांगितले आहे कि तो आणि त्याचे इतर सहकारी ह्या छळछावणीमधू जिवंत बाहेर कसे येऊ शकले. आणि इतर कोणीही त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून कसा यशस्वी होऊ शकतो.

लोगोथेरपी काय आहे?

लोगो हा ग्रीक शब्द लोगोस ह्या शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे ….. अर्थ..
प्रत्येकजण आयुषयात येणाऱ्या अनुभवांवरून वर्तमान परिस्थिती समजून घेत असतो. ज्यायोगे तो एकंदरीत आयुष्याचा अर्थ लावत असतो.
ती परिस्थिती म्हणजेच आयुष्य हे त्याचे साधे सरळ समीकरण असते. म्हणजे काय परिस्थिती जर चांगली, मनासारखी तर आयुष्य चांगले. आणि परिस्थिती जर विपरीत, वाईट तर आयुष्य पण वाईट. व्हिक्टर म्हणतो इथेच घोळ आहे. परिस्थिती म्हणजे आयुष्य असे कधीच नसते. परिस्थिती हि केवळ परिस्थिती असते. ती तात्पुरती वा तात्कालिक असते. परंतु, त्यालाच आपण आयुष्य समजतो. बऱ्याचदा हि परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर असते. जसे ज्यू असणे व्हिक्टर च्या हातात नव्हते, हिटलरच्या वा नाझी सैन्याच्या मनात ज्यूंविषयी शत्रुभाव उत्पन्न होणे व्हिक्टर वा इतर ज्यूंच्या हातात नव्हते. तरीही, व्हिक्टर सहित लाखो ज्यूं लोकांना छळ सहन करावा लागला. परिस्थिती जी होती ती होती. ती बदलणे कोणच्याही हातात नव्हते. परंतु, एक गोष्ट बदलणे व्हिक्टरच्या हातात होते अन ती म्हणजे आलेल्या प्रसंगाला सामोरे कसे जायचे?
आपला दृष्टिकोन आपले आयुष्य घडवीत असतो. म्हणून लोगोथेरपी असे सांगते कि “ह्या आयुष्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न विचारण्या ऐवजी ह्या आयुष्याला मी काय अर्थ देऊ शकतो? असा प्रश स्वतः ला विचारा.

व्हिक्टरला बाहेर पडून कुटुंबाला भेटायचे होते. शिवाय अर्धवट राहिलेले पुस्तक लिहून पूर्ण करायचे होते. आलेला प्रत्येक दिवस बाहेर पडण्याची आशा मनात बाळगून त्याने काढले. दुसऱ्या एका व्यक्तीने छळछावणीत प्रवेश केल्यावर तिथले वातावरण पाहून लगेच देवाला एक अट घातली होती, “मी सर्व छळ आनंदाने स्वीकारेल, पण ह्याच्या बदल्यात माझे कुटुंब बाहेर सुरक्षित राहू दे. त्यांना ह्या लोकांच्या तावडीत सापडू देऊ नकोस.” देवाने आपली हि अट मान्य केली आहे असे मनाशी समजून घेऊन त्याने पुढचा सर्व छळ आनंदाने सहन केला. कारण त्याच्या छळाला आता अर्थ होता. त्याचा जितका छळ होईल तितके त्याचे कुटुंब सुरक्षित असणार होते.
हा आहे दृष्टिकोन… काही लोक आहे त्या परिस्थितीला दोष राहतात. त्याचा स्वतःशी संबंध जोडून निराश होतात आणि काही लोक वर्तमान परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, दूर असलेल्या ध्येयावर नजर केंद्रित करतात आणि पुढे जाऊन यशस्वी होतात.

शेवटी:
व्हिक्टरने अधोरेखित केलेले काही मुद्दे असे आहे

कसे वागायचे याचे स्वातंत्र्य आपल्या कडेच असते: कोणत्याही परिथितीत वागायचे कसे याचा अंतिम निर्णय आपल्याच हाती असतो. आपण कसे वागणार याची निवड करण्याचे स्वतंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वतः भुकेने व्याकुळ असतांनाहि दुसरा एखादा मरणासन्न अवस्थेत दिसतो आहे म्हणून आपल्या जवळचा उरलेला ब्रेडचा तुकडा त्याला देणारे लोकं त्याने जवळून पहिले.

घटनाक्रम बदलणे बव्हंशी शक्य नसते: समोर येणारी परिस्थिती कित्येक घटकांचा परिणामस्वरूप असते. त्यातील कित्येक घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. तेंव्हा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा, आहे ती परिस्थिती स्वीकारून, त्यातून मार्ग काढून आपल्या ध्येयावरचा केंद्रित राहणे हाच सर्वोत्तम मार्ग.
जर्मन तत्ववेत्ता नीट्सचे याचा उल्लेख व्हिक्टर करतो ज्याने म्हंटले आहे, “ज्याच्याकडे जगण्यासाठी कारण आहे, तो कितीहि बिकट परिस्थिती वा अडचणी असोत, त्या सर्वांवर मात करून जगतोच.”

जगायचा एक नवा अर्थ देणारे हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवायलाच हवे. जेंव्हा कधी निराशा मनाला शिवेल, हे पुस्तक काढून वाचा आणि पुन्हा आपल्या स्वप्नाकडे झेप घ्या…. आयुष्याला एक अर्थ द्या.. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी हे एक सुंदर पुस्तक आहे. खाली मराठी तसेच इंग्रजी आवृत्तीची लिंक दिलेली आहे…

वि. रा.!!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

One thought on “Man’s Search for Meaning – Viktor Frankl

  • March 15, 2018 at 1:37 pm
    Permalink

    Wow… that’s a lovely write up… The summery of the books is explained very well… It’s super motivating… Thank you for such an amazing write up… The feelings and thoughts have been very well moulded in the form of inspirations words….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: