बायकोचा मित्र

संध्याकाळचे सव्वा पाच वाजत आले होते, आज वेळेवर निघावं असा विचार करून आकाश भराभर टेबल आवरत होता. ईतक्यात मोबाईलचा मेसेज टोन वाजला. एका हाताने टेबलचा ड्रॅावर बंद करीत आकाशने मेसेज उघडला, “I want you to do a favor for me. Will you become friend of my wife?” मेसेज अरविंदने पाठवला होता. आकाश थोडा गोंधळला. अरविंद  त्याला दोन वर्ष सिनियर होता. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांनी तीन महिने सोबत काम केलं होतं. दोघांचे विचार जुळले अन् तिथूनच त्यांची गट्टी जमली होती. हा काय प्रकार आहे असा विचार करून  आकाशने नंबर डायल केला.

“आकाश, मी थोडा कामात अडकलोय, १५-२० मिनिटे लागतील, थांबतोस?” पलीकडून अरविंदचा आवाज आला.

“अरेsss., घरी काम आहे,  मला लवकर जायचं होतं, असा मेसेज का पाठवलास? “

“जमत असेल तर थांब नं प्लीज, बोलायचं आहे काही.” अरविंद.

आकाशने क्षणभर विचार केला, “ठीक आहे, थांबतो मी, भेटू आपण.”

आकाशने घरी फोन करून यायला उशीर होईल असा निरोप दिला अन अरविंदची वाट पहात तो ऑफिसच्या पोर्चमध्ये फेऱ्या मारू लागला.”तुझी संध्याकाळ खराब तर नाही केली मी?” अरविंदचा आवाज ऐकून त्याने मागे पहिले.

“नाही, नक्कीच नाही, काम होतं मला, पण ते उद्याही होऊ शकतं. असा कसा मेसेज पाठवलास? पुढचा बकरा मी तर नाही ना?” आकाश.

अरविंदला थट्टा-मस्करीची भारी हौस, प्रत्येक वेळी एकेकाला गाठून तो त्या व्यक्तीची गंमत करायचा, मनात काही नसायचे पण चाबी भरायला त्याला मजा येई.

“बकरा? नाही यार, तो मेसेज मी सिरीयसली पाठवला होता.”

“अच्छा? कि सिरीयसली गंमत करण्यासाठी पाठवला होता?” आकाशने थट्टेने विचारले. अरविंदला पूर्वी कधीही गंभीरपणे बोलतांना ऐकलेले नसल्याने आकाशचे समाधान होत नव्हते. “चल, निघूया का?” अरविंद चालत बस-स्टॅापकडे निघाला, आकाश त्याच्यासोबत चालू लागला.

अरविंद एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचा धनी होता, हसत-हसवत जगणं हा त्याचा पिंड होता, तो सिरीयस होऊ शकतो हे आकाशसाठी नवीन होतं. अरविंद अजूनहि विचारात दिसत होता. बहुदा शब्द जमवत असावा.

“बोल, काय प्रॉब्लेम आहे?” अरविंदचा अबोला तोडत आकाशने विचारले.चालत-चालत ते दोघं एका गार्डन समोर आले. आतमध्ये लहान मुलं खेळत होती. काही वेळ त्यांना पाहण्यात अरविंद गढून गेला, आकाशची अस्वस्थता ताणली गेली.

“ही लहान मुलं बघतोयस नं? केवढी एनर्जी असते त्यांच्यात?” अरविंद काहीसा हरवलेला वाटत होता.

“खरय, मस्त हुंदडत असतात, एकदम नो-टेन्शन, आपण मोठं व्हायलाच नको होतं असं वाटतं कधी कधी.” आकाश.

“त्यांना टेन्शन का नसतं माहितीये?” अरविंद.

“त्यांना उद्याचा विचार नसतो….” आकाश खांदे उडवत बोलला.

“खरं आहे. समोर आहे तेच आणि तेवढंच त्याचं आयुष्य असतं. त्यातच तल्लीन होऊन त्यांचं सर्व काही सुरु असतं, आपोआपच इतर गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरतात. मग टेन्शन असं म्हणून  काही उरत नाही. जस-जसे आपण मोठे होत जातो, हि तल्लीनता आपण गमाऊन बसतो. इतर गोष्टी, ज्या खरच तितक्या महत्वाच्या नसतात त्या आपल्या मनाचा पगडा घेऊ लागतात. हातात एक असतं अन् डोक्यात एक. मग जीवाची घालमेल सुरु होते आणि प्रत्येक क्षणातलं ते जगणं आपण हरवून बसतो.” रस्त्याकडे तोंड करून असलेल्या गार्डनबाहेरच्या एका बाकावर अरविंद बसला.  त्याला काही तरी बोचतंय याची एव्हाना आकाशला कल्पना आली होती. ओळख झाल्यापासूनचा अरविंद आणि आजचा अरविंद यांत  खूप त्याला फरक जाणवत होता. आकाश शेजारी बसला, अरविंद  शांतपणे रस्त्यावरची वर्दळ न्ह्याहाळत होता.

“बघतोयस ना तू? रस्ता घरी जाणाऱ्या लोकांनी कसा भरलेला आहे. सर्वचजण घरी जाण्यासाठी धावपळ करत आहेत.” थोडं थांबून अरविंद पुन्हा बोलला,” मला रोज संध्याकाळ झाली कि पोटात गोळा येतो रे,  घरी जायची भीती वाटते मला.”

“अरविंद?” आकाश जवळ-जवळ ओरडलाच, त्याचे डोळे विस्फारले. हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.

“लग्नाला सहा वर्ष झाली आहेत, बायको दिसायला सुंदर आहे. तीन वर्षांची गोड सई आहे, चार-चौघांसारखा वाटेल असा संसार आहे, तरीही….. ..” अरविंद थबकला.

आकाशचा आपल्या कानांवर विश्वासचं बसत नव्हता. क्षणातच त्याच्या डोळ्यासमोरून अरविंदची मागच्या दोन वर्षाची झलक गेली. ती मौज-मस्ती, खळाळून हसणं, इतरांना जगण्याची उमेद देत दिवसभराची काम उरकणं.  हा तोच अरविंद आहे? आज हा असं का बोलतो आहे? याची दुखरी बाजू आहे तरी काय? आकाशच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी जमू  लागली.

अरविंद पुन्हा बोलू लागला.”लग्नाआधी जेंव्हा मी तिला पाहायला गेलो होतो, मी तिला एकचं प्रश्न विचारला होता, “तुला आयुष्यं कसं जगायचं आहे? तसं काही ठरवलं नाही, जसं समोर येईल तसं….” हे तिचं  उत्तर होतं आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला होता. त्या उत्तरात मला समोर खेळत असलेल्या ह्या मुलांची मानसिकता दिसली होती. वाटलं होतं कसलेही पूर्वग्रह मनात नं ठेवता जे समोर येईल त्याचा  स्वीकार करत आनंदात जगायचं असं तिचं तत्वज्ञान असेल. माझ्यासारखं ..” समोर विजेच्या खांबावर दोन पक्षी बसलेले होते. त्यांच्याकडे हरवलेल्या नजरेने पाहत अरविंद बोलला.

“मग, ती खोटं बोलली होती का?” आकाश.

“नाही… ते खरं होतं, खूप खरं होतं”. अरविंदनं एक दीर्घ उसासा टाकला. रस्त्यावरची रहदारी थोडी कमी झाली होती, रिकाम्या रस्त्याकडे पाहतच तो पुन्हा बोलू लागला, “चॅाईस म्हणून काही तिच्या गावीच नाहीये आकाश. ती कुठलाच निर्णय घेऊ नाही शकत. कायम गोंधळलेली असते, त्यापेक्षा निर्णयच घेणं नको म्हणून तिचं उत्तर तसं होतं. मी मात्र उलटं समजलो.”

“ठीक आहे अरविंद, त्यात इतकं नाराज होण्यासारखं काय आहे? बऱ्याच मुलीना लग्नाआधी घरी एक्स्पोजर नसतो, त्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तू तिला आत्मविश्वास दे, तिची तिला जबाबदारी घेऊ दे, जमेल तिला निर्णय घेणं.” आकाश समजावणीच्या सुरात बोलला.

“ते इतकं सोपं असतं तर तुला मेसेज का करावा लागला असता मित्रा? खरी अडचण तिथेच तर आहे.” अरविंद.

“मी नाही समजलो.” आकाश.

“ती post-graduate आहे. पण  फक्त  डिग्री  मिळवायची या  हेतूनं शिकलेली. त्यामुळे  अभ्यास  कशाला  म्हणायचं, ज्ञानाच्या साह्याने  आपलं  व्यक्तिमत्व  कसं  खुलवायचं याचा  काहीच  विचार तिच्याकडे नाही. कधीच  अवांतर  वाचन  करणार  नाही, वाचलं  तरी  काही  लक्षात  ठेवण्याचा  प्रयत्न  करणार  नाही. त्यामुळे  जगात  कुठे काय घडत  आहे  त्याचा  आम्हाला  पत्ताच नाही. मी  यावर  काही  बोललो  तर  माझ्यावरच  चिडते. पुस्तकात खोटं लिहीलेलं  असतं  हे  तिचं  तत्वज्ञान. घरात येणारी वर्तमानपत्रदेखील वाचत नाही. कोणताच  छंद  नाही कि  काही  आवड  नाही.” दोन्ही गुढघ्यांवर  हाताचे  कोपरे  टेकवून  अरविंदनं आपला  चेहरा तळव्यांमध्ये  झाकून  घेतला . काही क्षण  शांततेत  गेले.

“तुला  वाटत  असेल  मी  जे  काही  बोलतो   आहे  ते सगळं  सुखी  संसारासाठी  तितकंसं  आवश्यक  नाहीये , हो  नं ? ” अरविंदनं  मान  वळवून  आकाशच्या  डोळ्यात  पाहत  विचारलं. आकाशच्या ह्रदयातून  एक  कळ  उठली. रोज  ऑफिसमध्ये  दिसणारी  अरविंदच्या  डोळ्यातली ती चमक  गायब होती. इतरांना  आश्वासक  वाटणारे , जगण्याची  दिशा  दाखवणारे  डोळे आज मात्र स्वतःमध्येच हरवलेले  दिसत  होते.

“होss, म्हणजे ….म्हटलं तर आवश्यक  नाहीये  अन म्हंटल तर  खूप  काही  आहे….हे… सर्व ”  आकाश खाकरत बोलला.

“एकदम मान्य आहे. मी  हेहि  समजू  शकतो  कि  प्रत्येकाची  एक  उपजत  वृत्ती असते. प्रत्येकच जण जगण्याची आपली एक रीत घेऊन जन्माला येतो. त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते सर्वं तिनं करावं असं मला वाटत असलं, तरी तिच्यावर मी ते कधीच लादलं नाही. खरी  अडचण दुसरीच  आहे .” संध्याकाळ  ओसरू  लागली होती, अंधाराने हळूहळू  आपलं  जाळं विणायला सुरुवात केली होती.

“तिनं घराशी, घरातल्या माणसांशी, माझ्या मित्रांशी आणि तिच्याही मित्रांशी आपली  बांधिलकी जपावी, सगळ्यांना लळा लावावा इतकीच माफक अपेक्षा आहे रे माझी. आजपर्यंत ती  कोणाशीच  नातं  जुळवू नाही शकलीय. या अख्या जगात कोणीच नाहीये, ज्याला ती  माया  लावेल, जीवापाड जपेल, अगदी पोटच्या पोरीलासुद्धा. खूप आत्म -केंद्रित आयुष्यं जगतेय. घरात  कोणाशीच तिचं  पटत  नाही, कोणी  समजवायला  गेलं तर उलटून बोलते. मी उभ्या आयुष्यात कधीच कोणाशी वाद घातलेला नाही, पण तिच्याशी मात्र  माझा यावरून  रोज  वाद  होतो.

तुला  तर   माहिती  आहे  कि मला  बोलायचा किती  सोस  आहे. दगडालाही  बोलायला  लावीन असा अभिमान  बाळगून  होतो  मी; पण  माझ्या घरी गेलो  कि  माझाच  दगड  होतो. माझी अक्षरश: वाचा बसते. तिला कितीही चांगलं बोला.. कितीहि सरळ बोला, ती  त्याचा  नेमका  उलटा  अर्थ  घेते  अन  मग  कुर-बुर  सुरु  होते.” अरविंद थोडं थांबला, पुन्हा बोलू लागला, “मी  ऑफिसमधून  घरी  गेलोय, तिनं बॅग माझ्या  हातातून  घेतली  अन कसा होता दिवस असं मला विचारलं हे गेल्या सहा  वर्षात  एकदाही  झालं  नाही . उलट दारात  बूट  काढतो  न  काढतो  तोच  तिचा आवाज कानावर येतो, आज  आई  असं  बोलल्या, आज बाबा  असं म्हणाले,  सई माझं  ऐकतच नाही,  कधी  काही  तर  कधी  काही. सततचे रुसवे -फुगवे , इतरांवर  संशय ….. त्यातून होणारी  वादा-वादी … मी आता कंटाळलोय रे. खुपवेळा समजून  सांगितलं  पण  तिच्यात काहीच फरक पडत नाही. जसा मनमिळाऊपणा नाही तसंच समर्पणभावही नाही. तिचं समर्पण  जसं किचनमध्ये दिसलं नाही  तसच  ते मला कधी बेडरूममध्येहि जाणवलं नाही. अरविंद हताशपणे बोलला.

“तुम्ही शांतपणे समोरासमोर बसून कधी चर्चा नाही केलीत?” आकाशने विचारले.

“आजवर फक्त चर्चाच तर केली. आपण  सुशिक्षित घरात  वाढलेलो.  त्यामुळे, तिला  समजावून सांगण्यापलीकडे  दुसरं काही  करू  शकलो  नाही  अन्  फक्त  बोलून  तिच्यात  फरक   काही  पडत  नाही. स्त्री -अत्याचारावर  आवाज उठवणाऱ्या लोकांना माझ्यासारख्या  पुरुषाचा  कोंडमारा  कधी  समजेल  का  रे?”  अरविंदच्या आवाजात  कंप  जाणवू  लागला होता. त्याचे डोळे पाणावले.

“शांत हो,  अरविंद , मी  समजू शकतो तुझी  मनस्थिती .” आकाशला खुप  वाईट वाटत  होते. एका संवेदनशील  मनाच्या  माणसासोबत  नियतीने विचित्र खेळ केला होता.

“तू तो मेसेज पाठवलास त्याचा अर्थ काय होता? मी  कशी मदत करू शकतो तुला ?” आकाश.

अरविंदने  दोन्ही  हातानी  आपले  डोळे  पुसले . “तिच्या मनाचा हा ग्रह आहे कि घरातल्या इतर  लोकांचं  ऐकून,  त्यांना  सोयीस्कर  असच  मी तिला  वागायला  लावतो. त्यामुळे मी  समजावून  सांगितलेलं  काहीएक तिला ऐकायचं नसतं. लग्नानंतर  2-3 वर्षातच  माझ्या  लक्षात  आलं कि   माझ्याकडून  तिला  समजावणं शक्य  नाही . तेंव्हापासून  मी  तिच्यासाठी  एका  मित्राच्या   शोधात  होतो. जो तिच्याशी  ह्या  गोष्टींवर  चर्चा  करू  शकेल. तिच्या वागण्याने घरातल्या छोट्या छोट्या आनंदावर कसं विरजण पडतंय हे तिला उदाहरणासहीत समजावून सांगेल.  तिला हे पटवून देईल  कि इतरांवर प्रेम करण्यासाठी  आधी  तुम्हाला  स्वतःवर  प्रेम  करता  आला  पाहिजे. तिचा खरा प्रॅाब्लेम low self-esteem आहे. स्वतःवरच प्रेम नाही त्यामुळे विश्वास नाही. ती सतत कसली तरी भीती बाळगून असते. काही तरी गमावण्याची ती भीती तिला आनंदाने जगू देत नाही. मग इतरांपासुनही तो आनंद ती हिरावून घेत राहते. आयुष्यातल्या शाश्वततेचा प्रत्यय  तिला येणं खूप आवश्यक आहे आकाश. ती  शाश्वतताच  तिला  शांत  आणि  समाधानी  करू  शकेल.” अरविंदला थांबवून काही सुचवण्याचा प्रयत्न करावा असा एक विचार आकाशच्या मनात येऊन गेला. परंतु,  अरविंदला मोकळं होऊ देणं गरजेचं होतं, म्हणून आकाश शांतच राहिला. अरविंद बोलत होता..

“तिची सुद्धा काही दुःखं  असतील, काही  वेदना  असतील. त्या जाणून घेण्याचा मी  खुपदा प्रयत्न केला, पण तिने  कधीच  माझ्यासमोर  स्वतःला उकललं नाही. ती अढी मला कधी सुटलीच नाही. व्यक्त  होता आलं तर बहुधा ती  थोडी  खुलेल. म्हणूनच, मला असं वाटतं कि मन मोकळं  करायला  तिला एक  मित्र  असावा. जो तिला डोळसपणे  जगाकडे  पाहायला  शिकवेल. तिला  हे  पटवून  देईल कि जगात चांगल्या  माणसांची काही कमी नाही पण त्यासाठी तुम्हाला  तुमच्या  डोळ्याची  भिंग  adjust  करता  आली पाहिजे. सगळ्यांकडे  आपण  एकाच  भिंगातून  पहायचं  नसतं. तू हे करू शकतोस आकाश.” आकाशकडे पाहत अरविंद बोलायचे थांबला

“तू म्हणतोस ते ठीक आहे. पण माझ्यापेक्षाही एक मुलगी हे काम चांगलं करू शकेल असं नाही वाटत तुला? म्हणजे …त्या दोघी मन-मोकळी चर्चा करू शकतील. आपल्या ऑफिसमध्ये मृणाल आहे. आपण जर हे तिला सांगितलं  तर? ” आकाशने विचारलं.

birds1
संवादाअभावी नकळत एक काटेरी कुंपण तयार होते

“मी पण तोच विचार केला होता आधी.  माझ्या एका मित्राच्या लहान बहिणीला फार पूर्वी मी या बाबतीत बोललो होतो. मला मदत करायची ठरवून तिने प्रयत्नहि सुरु केले होते. अधून-मधून घरी यायची,  हिच्याशी गप्पा मारायची, तिला घराबाहेर पडायला प्रोत्साहन द्यायची. नाही म्हणायला थोडा-फार परिणामहि दिसू लागला होता. ती घरी आल्यावर साहजिकच आमचहि बोलणं व्हायचं अन नेमका तिथच घात झाला. तिनं आमच्यावरच संशय घेणं सुरु केलं. रोज आदळ-आपट. मनात राग धरायचा आणि समोरच्यावर काढायचा. प्रसंगी रागाच्या भरात सईला मारहाण करायची. शेवटी कंटाळून मीच तिला घरी येऊ नको म्हणून विनंती केली. ती वाटदेखील बंद झाली.” अरविंद आपल्या तळ-हातावरच्या रेषांकडे बघत बोलला. जणू नशिबात काय लिहिलं आहे हे शोधायचा तो प्रयत्न करत होता.

आकाशला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोणी इतकं सूड बुद्धीने वागत असेल? इतका चांगला  नवरा मिळाला तरी ही बाई असं का वागतेय?  आकाश मनाशी विचार करू लागला.

“आकाश, मला  माझ्या  घरात विसाव्यासाठी  एक  जागा  तेवढी  हवी  आहे. खरंतर, पती आणि पत्नी या दोघांच्याहि  आनंदाच्या  जागा  जर  सारख्याच  असतील  तर  तो  संसार  आयुष्यभरासाठी एक  सोहळा  होऊन  जातो. असंच काहीसं  स्वप्न मनात ठेऊन प्रत्येक जण लग्न करतो, मीदेखील तेच स्वप्न पाहिलं होतं. माझ्या नशिबी  तो  सोहळा नक्कीच नाही आला. तरी सईसाठी मला हा संसाराचा खेळ सुरु ठेवावाच लागेल. आणि त्यासाठी मला तुझी गरज आहे. माझं रोजचं जगणं थोडं सुसह्य व्हावं यासाठी तिच्यात improvement होणं गरजेचं आहे.”

“पण, अरविंद… मी?” आकाश गोंधळला होता.

“आकाश, आपल्या दोघांच्या विचार प्रक्रियेत खूप साम्य आहे. त्यामुळे, आवाज जरी तुझा असला तरी विचार माझे असतील याची मला खात्री आहे. बोलत जा तिच्याशी. तुझ्यारूपाने एक संयमित मित्र अन मार्गदर्शक भेटला तर तिला जगण्याची एक नवी दिशा मिळेल. आणि हा विश्वासपण येईल कि स्त्री-पुरूषाच नातं ती विचार करते तितकं उथळ अन फक्त शारीरिक नसतं. चार दिवस साफ नाही केलं, तर सडणाऱ्या ह्या शरीराच्या जाणीवांईतकं मर्यादित तर मुळीच नसतं. पटू  दे तिला की हे नातं निकोप आणि पवित्र सुद्धा असू शकतं.”अरविंदनं  आकाशचा हात आपल्या दोन्ही हातात  घेतला, “बघ प्रयत्न करून. तुला माझ्या  संसारातली  कटुता थोडी  जरी घालवता आली तर. करशील नं माझ्यासाठी इतकं ?”  अरविंदने अजीजीने विचारले. आकाश सुन्न  होता. भोवतालचा अंधार  आता  आणखीनच  गडद  झाला  होता.

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली ते सांगा. share करायला विसरू नका. पुन्हा भेटूचं !

वि. रा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: