सहवेदना

 

फट्कन फुगा फुटला आणि एकसुरात सर्वांनी गायला सुरुवात केली, “हॅपी बर्थडे टू यूssss; हॅपी बर्थडे टू यू…. हॅपी बर्थडे टू डीअर अण्णा… हॅपी बर्थडे टू यूssss”. आनंदधाम या वृधाश्रामातील सर्वात जेष्ठ असलेल्या अण्णांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत होता. वृधाश्रामातील झाडून सर्व वयोवृद्ध मंडळी आणि सर्वच स्टाफ सहभागी होता. आजची सर्व प्लॅनिंग अरविंदची होती. वृधाश्रामातील जवळपास सर्वांच्याच वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावणारा, प्रसंगी स्व-खर्चाने कार्यक्रमाची बाजू उचलून धरणारा अरविंद आज नववधू निशासोबत आलेला होता. अण्णांना केक भरवून आशीर्वाद घेण्यासाठी अरविंदने  सपत्नीक वाकून नमस्कार केला. अण्णांना भरून आले. दोघांच्या खांद्यांना धरून अण्णांनी त्यांना उठवले. मायेने निशाच्या डोक्यावरून अण्णांनी हाथ फिरवला. आपल्या कोरड्या झालेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांची कडा थरथरत्या हाताने पुसली. “नशीब काढलस पोरी, भाग्यवान आहेस तू. अरविंदला जप, सुखाचा संसार करा दोघं..” अण्णांना हुंदका आला. अरविंदने त्यांना सावरायचा प्रयत्न केला. “माहिती आहे निशा?  माझी दोन्ही पोरं अमेरिकेत आहेत. खूप छान सुरु आहे त्याचं. त्यांनी कष्टाने मिळवलंय हे यश.. तेच तर करतात इथला सर्व खर्च.. कधीहि फोन केला तर काही हवं-नको का ते विचारतात… पण एक सांगू? छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये जाणवणारी त्यांची उणीव… खायला उठायची. अरविंदने कधी त्यांची जागा घेतली ते कळलचं नाही बघ…” अण्णांच्या डोळ्यात निशाला एक समाधानाची झलक दिसली. निशा आणि अरविंदने अण्णांना खुर्चीत बसवले. सर्व जण शांततेत उभे होते.. “अरे असे शांत का? अण्णांचा वाढदिवस आहे ना आज? नानाकाका, तुम्ही नकला करणार होतात ना? करा न मग सुरु.. अरविंद सर्वांचाच मूड ठीक करण्यासाठी बोलला. तिथून पुढे सुमारे दीड तास हास्य-विनोदाचा फड रंगला.

रात्री ८.३० च्या दरम्यान सर्वांचा निरोप घेऊन अरविंद अन निशा निघाले. “काही अंतर चालून जाऊन टॅक्सी पकडूया का?” अरविंदने विचारले. निशाने मानेने होकार दिला. दोघेही चालत निघाले. रातकिड्यांचा आवाज चोहोबाजूने येत होता. निशा दिव्यांच्या प्रकाशात अधून-मधून अरविंदचा चेहरा न्याहाळत होती. अरविंद प्रसन्न दिसत होता. निशाने अचानक अरविंदचा हात धरून त्याला थांबवले. “काय झालं?” ती अचानक अशी थांबलेली पाहून अरविंद गोंधळला. “आय अॅम प्राऊड ऑफ यू, अरविंद.” निशाने अरविंदच्या बोटांमध्ये आपली बोटे घट्ट फसवली. “चल, एवढेच बोलायचे होते.” ती त्याच्या खांद्यावर मान टाकून त्याच्यासोबत चालू लागली. “थँक्यु स्विटी. मज्जा आली नां तुला पण? मला तर खूप छान वाटलं आज. माहितीये अण्णा रिटायर्ड बँक मॅनेजर आहेत. पप्पांच्या कंपनीचे अकाऊंट त्यांच्याच ब्रँचकडे होते.” अरविंद एकदम बोलायचे थांबला. “निशाss, काय झालं?” निशा रडत असलेली पाहून तो गोंधळला. “काय झालं तुला? कोणी काही बोललं का तुला?” निशाने नकारार्थी मान डोलावली. “अगं मग का रडतेय तू?” अरविंदने तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर बसवले. “अरविंद, मी तुझ्यासमोर खूपच खुजी आहे रे. तू श्रीमंत घरी वाढलेला. घरी सर्व सुखं हात जोडून उभी असतांना आणि कुणाही श्रीमंत बापाने हसत हसत आपल्या पोरीचा हात तुझ्या हाती दिला असता अशी परिस्थिती असतांनाही तू माझ्यासारख्या अनाथ मुलीशी लग्न केलंस, मला आपल्या आयुष्यात सामावून घेतलंस. पण तू एवढ्यावरच थांबलेला नाही आहेस. आज सर्वांच्या डोळ्यांमध्ये तुझ्याबद्दलचा आदर पाहून तर मी थक्कच झालेय.” निशाने आदराने अरविंद कडे पहिले.

“निशू, मी तुला फक्त तुझ्या दोषांबाबत जबाबदार धरू शकतो. तू अनाथ होतीस यात तुझा तो काय दोष? मी ते कधी गृहीतच धरलं नव्हते. पण तुला खुजेपणा का जाणवतो आहे? तुला असं वाटावं असा माझा काही उद्देशच…” निशाने अरविंदच्या ओठांवर हात ठेवला. “असं नव्हतं म्हणायचं मला. मी स्वतः अनाथालयात वाढलेली. आज मी लग्न करून येथे आले अन मला त्या सर्वांचाच विसर पडला रे. तुला आज या लोकांमध्ये मिसळतांना पाहून मला माझीच लाज वाटली अरविंद. तू ते नातं निभावतो आहेस जे तू जगलाच नाहीस अन मी मात्र…” निशा बोलायचे थांबली. अरविंद तिच्यासमोरच जमिनीवर मांडी घालून बसला. “माहिती आहे निशा? घरी लहानपणापासून सुखसाधनांची रेलचेल होती, पण मनातलं बोलायला मात्र माणसंच नव्हती. भिंतींना तरी पाझर फुटेल या आशेवर कित्येक रात्री मी रडून-रडून घालवल्या आहेत. पण हळूहळू मी एकटाच आहे याची जाणीव प्रखर होऊ लागली. तेंव्हाच मी ठरवले जो एकटेपणा माझ्या वाटेला आला तसा तो इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. मला रडायला खांदा नाही मिळाला तर काय झाले? इतरांना रडायला माझा खांदा नेहमीच मी उपलब्ध ठेवायचा. आणि मी रडणाऱ्या लोकांच्या शोधात बाहेर निघालो. त्याच प्रयत्नांत हा वृधाश्राम मला भेटला आणि तश्याच एका प्रयत्नात तूसुद्धा भेटलीस. आता आपल्या दोघांना मिळून हे कार्य करायचे आहे. देशील मला साथ?” अरविंदने दोन्ही हाथ पुढे करीत विचारले. “का नाही? तू मला फक्त जीवनच नाही तर जीवितकार्य सुद्धा दिलेस अरविंद. खूप शिकायचं आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं इतकंच ध्येय होतं माझं. तू त्याला आणखी विस्तारायला मदत करतो आहेस. का नाही साथ देणार?” निशा डोळे पुसत बोलली.

paz-arando-132661

“माहिती आहे? आज आपण समाजात जेही प्रॉब्लेम्स बघतो त्या सर्वांचं मूळ सहवेदना न समजून घेण्यात आहे. ज्या गोष्टीमुळे मला त्रास होतो त्या गोष्टीमुळे इतरांनासुद्धा त्रास होत असणार हेच आज कोणी लक्षात घ्यायला तयार नाही आहे. म्हणून सहानुभूतीने वागणे कमी होते आहे. जो सहवेदना अनुभवू शकतो तोच सहानुभूतीने वागू शकतो. याच सह्वेद्नेतून गौरी सावंतने तृतीयपंथी लोकांसाठी कार्य सुरु केले आहे. ते सह्वेद्नच आहे ज्याद्वारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेने नाम फौंडेशनचे काम सुरु केलेय आणि ती हि सह्वेदनच आहे जे अक्षयकुमार आज भारताच्या वीर जवानांसाठी  करतो आहे. प्रत्येकजण कदाचित इतके मोठे कार्य नाही करू शकणार तरीही, हे सहवेदन जर जपले तर जगातले अर्धेअधिक दु:खं आपोआप कमी होईल.  आपल्याही सहवेदना सारख्याच आहेत, निशा.  मी जसा एकटेपणा भोगला आहे तसाच तू हि भोगला आहेस. आता मात्र आपण दोघे आहोत आणि आपल्या दोघांना मिळून आता इतरांचा एकटेपणा घालवायचा आहे. तुझ्याशी लग्न करण्याचा माझा उद्देश सफल झालाय अशी माझी आज खात्री झालीय. चल निशू, आता निघूया..आपली रात्र वाट पाहते आहे.” अरविंदने डोळे मिचकावत तिला उठण्यासाठी खुणावलं. काजवांच्या प्रकाशात निशा आणखीनच उजळून निघाली.

वि. रा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: