सहज सुचलं म्हणून…..

औरंगाबाद ते पुणे बसमध्ये भेटलेला सहप्रवासी, जुजबी ओळख झाली, गप्पा रंगात आल्या.
हळू हळू लक्षात येऊ लागलं, स्वभाव काही जुळत नव्हता. तरी आम्ही बोलत राहिलो.
त्याचे अविर्भाव, स्वतःला ग्रेट समजणं, आत्मप्रौढी सगळंच माझ्या स्वभावाशी विसंगत.
मनात म्हंटलं असू द्यावं, सोबती आहेच असा किती वेळासाठी? फार तर फार ५-६ तास, ठीकच आहे करूया दुर्लक्ष.
असा विचार केला अन मग ५-६ तास त्याच्या स्वभावाच्या गमजा पाहण्यात मस्त गेले.
आता जेंव्हा कधी त्या प्रवासाचा विचार करतो तेंव्हा वाटतं…”तिथे तरी पक्कं ठाऊक होतं कि ५-६ तास “हा”च सोबती असणार आहे. इथे तर आयुष्याचा तितकाहि भरवसा नाही. कधी पुढच्या क्षणाला साथ सुटेल तेहि सांगता येत नाही.
तरीही….. आयुष्यात आपण असे दुर्लक्ष का नाही करत आपल्याच माणसांच्या सवयींकडे?
का हट्ट धरतो आणि प्रयत्न करत राहतो त्यांना बदलण्याचा?
१०० वर्ष सोबत राहणार आहोत या विश्वासावर?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: