सहजीवन-१

२० जून २०१७, पुण्यातील आपटे रोडवरील एक टुमदार बंगला सजून-धजून नवीन आयुष्याच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. प्रशस्त बंगल्याला शोभेल असा परिसर, मधोमध असलेला बंगला, समोर हिरवंगार लॉन, डाव्या बाजूला डोलत असलेली फुलांची झाडं आणि उजव्या बाजूला कार पार्किंगची जागा. लॉनवर ४-५ खुर्च्या गोल करून ठेवलेल्या होत्या. गेटमधून आत शिरताच मनाचं आसमंत व्यापून टाकणारं ते प्रसन्न वातावरण.. संध्याकाळची साधारण ४.३० ची वेळ असावी. एका खुर्चीवर बसून अरविंद पेपर चाळत बसलेला असतो. हातात चहाचा ट्रे घेऊन मृण्मयी बाहेर येते.

“काय रे विंदा, अजून कोणाचाच फोन कसा नाही आला?” मृण्मयी.

“फोन? कशाबद्दल?” ट्रे टेकवतांना पुढे आलेली तिच्या डाव्या बाजूची केसांची बट पाहत अरविंदने विचारलं.

“अरे, आज तुझी एकषष्ठी ना? तुला कोणीच विश कसं नाही केलं अजून?” तिच्या स्वर काकुळतीचा होता.

“मनुss, नको इतका विचार करू.. बैस, चहा घे.” तिच्याकडे चहाचा कप सरकावत अरविंद बोलला. तितक्यात, गेट उघडण्याचा आवाज आला. सचिन आणि महेश आत आले.

“काय रे, तुम्ही दोघेही आपले बेटर-हाल्फ घरीच कसे ठेवून आले?” अरविंदने न रहावून विचारले. दोघेही थोडे अडखळले. “अरविंद, काम निघालं असेल काही. ते दोघे आलेत ते काय कमी आहे?” त्यां दोघांची मनस्थिती ओळखून मृण्मयी खोटे हसत म्हणाली. “चला, आपण आतमध्ये जाऊ या. मी या दोघांसाठी चहा ठेवते.”

सर्वजण उठून दिवाणखाण्यात आले. भारतीय आणि वेस्टर्न बैठकीचा सुरेख संगम असलेला तो दिवाणखाना सुगंधाने भरून गेलेला होता. तिथली सर्व तयारी पाहून अरविंदने आश्चर्याने विचारले, “मृण्मयी ईतकी तयारी तू केलीस तरी कधी?”

“आवडली तयारी? तू बाहेर पेपर वाचत बसला होतास ना? तेंव्हाच मी झटपट सर्व लावून घेतले.” सोफ्याची कुशन्स, टेबल-क्लॉथ सर्व बदलेले होते. टी-प्यॉयवर फ्लॉवरपॉट सजवलेला होता. सर्वत्र रंगीबेरंगी फुगे सोडलेले होते. “व्वा, झक्कास तयारी केलीस आपल्या लग्नाची.” अरविंद आनंदून म्हणाला.

“नाही विंदा, आपण जरी आजपासून एकत्र राहण्याला सुरुवात करणार असलो तरी आपलं लग्न ३० वर्षांपूर्वीच झालेलं आहे. हि तर तुझ्या ६१ व्या वाढदिवसाची तयारी आहे.” मृण्मयी जरी हसून बोलली तरी तिच्या हृदयात उठलेली कळ तिच्या डोळ्यापर्यंत आलेली अरविंदला जाणवली. आपण अरविंदला जगापासून तोडलं तर नाही ना? एक सुहृदयी माणूस ज्याने आयुष्यात ज्ञान, पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळवलं होतं, बुद्धिमान परंतु मनमिळावू म्हणून जो जगाला सर्व-परिचित होता, ज्याचा मित्र-परिवारहि मोठा होता, त्या अरविंदच्या ६१ व्या वाढदिवसाला आज फक्त 3 जण हजर होते. कारण एकच होतं… अरविंद आणि मृण्मयी यांनी आता एकत्र राहायचं ठरवलं होतं आणि काही दिवसांपूर्वी तसं जग-जाहीर केलं होतं.

मृण्मयीच्या खांद्यावर थोपटत अरविंदने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर दुखाची छटा तर नव्हतीच उलट आनंद ओसंडून वाहत होता. त्याचा आश्वासक हात हातात घेऊन तिनं आपल्या दोन्ही हाताने  दाबला. आपण आयुष्यात खऱ्या पुरुषावर प्रेम केलं याचं तिला समाधान वाटून गेलं.

त्या दोघांची तशी समाधी लागलेली पाहून सचिन हलकेच खाकरला, “अरे अरे, आम्ही दोघं अजून येथेच आहोत. आम्हाला जाऊ द्या अन मग चालू द्या तुमचं. महेश, ते हार घेतोस का इकडे?” सचिनने वातावरण निर्मिती केली. महेशने बॉक्स मधून हार काढले. अरविंद आणि मृण्मयीच्या हातात एक-एक हार दिला. खरं तर त्या दोघांना इतक्या तन्मयतेने एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असलेले पाहून महेश अवाक् झाला होता. वयाची साठी ओलांडल्यावर जिथे निवृत्तीने मनुष्याच्या मनाच्या उमेदीचा ताबा घेतलेला असतो, आपण इतरांच्या दृष्टीने निरुपयोगी ठरू लागलो आहोत याच्या सूचना जेंव्हा नकळत येऊ लागतात आणि  त्यातून येणारं वैषम्य पचवतांना जेंव्हा प्रत्येक जण आतून हळू-हळू पोखरला जाऊ लागतो. वयाच्या या अशा वळणावर हि दोघं आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करताहेत अन ते हि इतक्या उत्साहाने? लोक काय म्हणतील? कोणी सपोर्ट करेल कि नाही याची जराही पर्वा न करता त्यांचा दिनक्रम सुरु होता. त्याही पेक्षा जास्त आश्चर्य महेशला वाटले होते ते त्यांच्या तन्मयतेने एकमेकांकडे पाहण्याचे. लग्नानंतर सुरुवातीचे १-२ महिने सोडले तर त्यानंतर आपण आपल्या बायकोला इतक्या तन्मयतेने कधी बघितले होते हे आठवण्याचा प्रयत्न महेश करू लागला. पण लगेच, सचिनने वाजवलेल्या टाळ्या ऐकून तो भानावर आला.

अरविंदने एव्हाना मृण्मयीच्या गळ्यात हार टाकला होता. मृण्मयी उंचीने ठेंगणी होती. तिने हार  टाकण्यासाठी हात उंचावताच अरविंद मान वर करून आणखी ताठ उभा झाला. तिने हसून त्याच्या पायावर आपली टाच दाबली अन तो खाली वाकताच पटकन हार घातला. लग्नविधी पार पडला होता. कायद्याला मान्य नसलेला, समाजाला अन विशेषकरून संस्कृतीरक्षक म्हणवून घेणाऱ्यांना बिलकुल मान्य नसलेला परंतु तितकाच मानवीय असलेला विवाहसोहळा संपन्न झाला होता तेही फक्त २ साक्षीदारांसमक्ष. त्यांना साक्षीदार म्हणणेही संयुक्तिक कसे होईल? कारण साक्षीदार व्यवहारात असतात. जिथे मनोमिलन होतं……. जिथे तुमचं अंतर्मन तुमच्या साक्षीला हजर असते तिथे आणखी कोणाही साक्षीदाराची गरज उरत नसते.

“काँग्रॅच्युलेशन्स वाहिनी, तुमचं भावी आयुष्य समाधानात जाओ हीच कामना. चला आता मस्तपैकी फक्कड चहा द्या आणि जाऊ द्या”, महेश.

चहा घेऊन आणि पुन्हा एकवार अभिनंदन करत पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन ती दोघं बाहेर पडली. हॉल क्षणात रिकामा झाला. आतापर्यंत धावपळ करीत असलेलं मृण्मयीचं शरीर कंप पाऊ लागलं आणि एकटेपणाच्या जाणीवेनं तिला घेरलं. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आधार घ्यावा असे वाटून ती मटकन् सोफ्यावर बसली. इतकावेळ आपल्याच धुंदीत असलेला अरविंद भानावर आला. तिची अस्वस्थता त्याच्या ध्यानात आली. तिचा मूड बनवावा असा विचार करून तो जमिनीवर तिच्या पायाला पाठ टेकवून बसला आणि आपले डोके मागे नेत म्हणाला, “कुरवाळ ना मला.” ती त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. पण आज तिची बोटे सफाईने फिरत नव्हती. तो लडिवाळपणा सुद्धा नव्हता. शांतता तोडावी म्हणून त्याने विचारले, “काय विचार  करते आहेस?”

“विंदा, आपण चूक तर नाही ना रे केली?” मृण्मयी.

“हंम्म्, चूक कशाला म्हणायचे गं?” त्याने अजाणतेपणाचा आव आणत विचारले.

“माहिती नाही. जे मनाला बरोबर वाटत नाही ते बहुदा.” ती.

“एकमेकांबद्दल अतीव ओढ असूनही आपण एकमेकांपासून ईतकी वर्ष दूर राहिलो, ते बरोबर होतं? त्याने विचारलं.

“नक्कीच नाही” ती.

“म्हणजेच ते चूक होतं असंच ना? मग चुकीची दुरुस्ती जर आपण करत आहोत तर ती पुन्हा चूक कशी असू शकेल?” तो.

“तसं नाही रे. पण आपण खूप स्वार्थी तर झालो नाहीत ना, असा विचार मनात येऊन जातो.” ती.

अरविंद गुडघ्यांवर बसत मागे वळाला, तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत व्याकूळ नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला, “मना, आपण जर स्वार्थी असतो तर जे आपण आज करत आहोत ते ३० वर्षांपूर्वीच केलं असतं. कसलीही बांधिलकी न जुमानता, जबाबदाऱ्या झटकल्या असत्या अन हातात हात घेऊन चालते झालो असतो. परंतु, आपण तसं कधीच केलं नाही. एकमेकांचे हात आपण हातात जरूर घेतले मात्र आधीपासून हाती असलेली जबाबदारी, आपल्या खांद्यावरचं एकही ओझं आपण टाकून नाही दिलं. वेळोवेळी आपली सर्व कर्तव्ये न चुकता पार पाडली. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचाच विचार आजपर्यंत आपण करत आलो. मुला-बाळाचं आयुष्य मार्गी लावलं. आणि आता… जेंव्हा आपली गरज अशी म्हणून  कोणाला उरलेली नाहीये तेंव्हा कुठे आपण आपलं आयुष्य सुरु करतो आहोत. हा स्वार्थीपणा कसा होईल, मनू?”

“विंदाsss, मला कशाची तरी खूप भीती वाटतेय रे.” मृण्मयी त्याला घट्ट बिलगली.

“घाबरू नकोस. आता आपण सोबत आहोत आणि कायम सोबतच राहणार आहोत.” अरविंदने तिला थोपटले. मात्र अनामिक भीती त्याच्याही मनात काहूर माजवत होती. पण लगेच त्याने सावरले, “हे काय? सेलेब्रेशन सोडून आपण रडतच बसणार आहोत का? ३० वर्षांपासून पाहत असलेलं स्वप्न आज साकार होत आहे. ते काही नाही, चल बघू, झटपट तयार हो. आज आपण धमाल करणार आहोत.” अरविंद चपळाई ने उठला आणि बाथरूमकडे जात बोलला, “चल, आधी मी तयार होतो.” त्याची ती चाल पाहून मृण्मयी आजही तितकीच थक्क झाली. त्याचं चालणं, दोन्ही पायांवर समान भर देऊन भक्कम उभं राहणं, त्याच्या लकबी, शारीरिक हालचाली या सर्वांवर तर तिने कित्येकदा आपला जीव ओवाळून टाकला होता. ते सर्व अगदी तस्सच होतं जसं तिला नेहमीच हवं होतं. सोफ्यावर रेलून ती हळूच भूतकाळात शिरली.

“हाय, दिदी.” होस्टेलच्या जिन्यावर प्राची भेटली.

“ए हाय, प्राची. कुठे आहेस अगं? कित्ती दिवसांनी दिसतेस आणि कशी आहेस तू?” मृण्मयी.

“मी कुठे जाणार दिदी? आता तर मला दावणीला बांधायचे प्रयत्नही सुरु झालेत.” प्राची.

“आता हे काय गं नवीन?” मृण्मयी.

“सांगते, ए चल ना दिदी रूमवर, कॉफी घेऊ गरमा-गरम. तितकंच बोलणं होईल” प्राचीने हात धरून मृण्मयीला ओढतच आपल्या रूममध्ये नेलं.

“बाप रे… प्राची, तुझी रूम सुद्धा तुझ्यासारखीच सतत हालत असते कि काय? एक हि वस्तू जागेवर ठेवलेली दिसत नाही आहे. किती पसारा करून ठेवलास रूममध्ये?” एकाच होस्टेलमध्ये राहत असूनही मृण्मयी आज पहिल्यांदाच प्राचीच्या रूम मध्ये आली होती. प्राची मोठ्याने हसली. “मला ना दिदी, वस्तू जागेवर असली कि सापडतच नाही बघ.” सडपातळ बांध्याची, मानेपर्यंत जेमतेम केस वाढवलेले, गोल भिंगाचा चष्मा लावणारी प्राची २६-२७ वर्षांची असेल. क्षणभर एका जागेवर उभं राहणं तिच्यासाठी अशक्य असायचे. परंतु, आज तिचा नूर काही वेगळा होता.

“दावणीचं काय म्हणत होतीस तू?” मृण्मयीने न राहवून विचारलं.

आई-बाबांनी एक स्थळ फायनल केलं आहे.” कॉफीचा मग हातात देत प्राची काहीशा खिन्न्तेनेच बोलली.

“अरे व्वा ! पण तू का असा चेहरा पाडून घेतला आहेस?” मृण्मयी.

“दिदी, मला तो मुलगा आवडलेला नाहीये.” प्राची.

“नकार दे ना मग सरळ, अजून तुझं वयच काय आहे? मिळेल तुला मनासारखा मुलगा. अगदी तुला हवा आहे ना, तसा.” मृण्मयी कॉफी घेत बोलली.

“कुठे? आई म्हणाली असं कधीच होत नसतं. ती म्हणते लग्न म्हणजे कॉम्प्रमाईज असतं आणि ते प्रत्येकाला करावचं लागतं. खरं का गं दिदी? आपल्या मनासारखा मुलगा कधीच नाही मिळत? आपला परफेक्ट मॅच?” प्राचीने जरा नाराजीनेच विचारलं.

“परफेक्ट मॅच?” मृण्मयी विचारात गढून गेली. तिच्या डोळ्यासमोर अरविंदची प्रतिमा उमटली. त्याच्याकडे पाहतच जणू ती उद्गारली, “मिळतो ना. नक्कीच मिळतो.”

“खरं सांगतेस दिदी? मलाही मिळेल का गं? प्राचीची कळी खुलली.

“अगं नक्कीच मिळेल. पण तू थोडी वाट तर पहा.” मृण्मयीने हसतच म्हंटले.

अरविंदने हलवून मृण्मयीला जागं केलं. “मृण्मयी, कोणाशी बोलते आहेस? आणि वाट पाहायला कोणाला सांगतेस? अजून सोफ्यावरच बसून आहेस तू?” अरविंद.

“माझं वाट पाहणं संपलं आहे. मला माझा परफेक्ट मॅच मिळाला आहे.” मृण्मयी स्वतःशीच हसत म्हणाली.

“अच्छा, तू आणि तुझी स्वप्नं. चल उठतेस का आता? फ्रेश हो. चलायचं आहे ना फिरायला?” अरविंदने तिला धरून उठतं केलं.

Sahjivan

दोघे फ्रेश होऊन बाहेर पडली. हातात हात घेऊन मनसोक्त हिंडली. आज तहान नव्हती कि भूक नव्हती. होता तो फक्त निर्भेळ आनंद. एकमेकांच्या सहवासाचा आनंद ज्याची तीस वर्ष दोघांनी चातकासारखी वाट पहिली होती. यापूर्वी ते भटले नव्हते असं नाही परंतु आज ची भेट फार वेगळी होती. आज कोणी बघितलं तर काय म्हणेल याची चिंता नव्हती. हातात हात घेऊन फिरणं बरं दिसेल का हा प्रश्न पडत नव्हता. कालपर्यंत गळ्यात वाग्विलेला सामाजिक बंधनांचा दोर दोघांनीहि कापून टाकला होता. आज त्यांचे सहजीवन खऱ्या अर्थाने सुरु झाले होते. एका ठिकाणी भेळ खाण्यासाठी दोघे थांबले. संध्याकाळ झालेली असल्याने घरी जाणाऱ्यांची वर्दळ रस्त्यावर वाढली होती.

        क्रमशः

 

वि.रा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: