संकल्प तडीस का जात नाहीत ?

२०१७ चा पहिला आठवडा. पहिला आठवडा म्हणजे उत्साहाला उधाण. नाविन्याचा ध्यास प्रत्येकालाच हवा असतो. नववर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करून २०१७ मध्ये नवीन काय करता येईल याचा विचार करत सर्वच जण एव्हाना कामाला लागले असतील. हे नवीन काही म्हणजे काय तर “संकल्प”; आपल्या आरोग्यासाठी किंवा प्रगतीसाठी उपकारक ठरतील अशा गोष्टींचा नव्याने स्वीकार करायचा आणि त्याचबरोबर अपायकारक ठरतील अशा गोष्टींचा त्याग करायचा असं काहीसं या संकल्पातून आपण ठरवत असतो. आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही ते आपल्याला चांगलचं माहिती असतं. त्यासाठीच हा “संकल्प” आपण केलेला असतो. पण प्रत्यक्षात काय होतं? फार थोडा अपवाद वगळता इतर लोकांचा संकल्प फेब्रुवारी तर कशीबशी पार करतो पण मार्च संपेपर्यंत मात्र या संकल्पाची होळी झालेली असते.

      आपलं वजन आता वजनकाटा तोलू शकत नाहीये हे आपल्याला समजून चुकलेलं असतं, वाढलेलं वजन त्रास द्यायला लागलय हा अनुभव यायला लागलेला असतो, तरीही दुलईत लोळण्याचा आनंद आपण टाळू शकत नाही. कसातरी मनावर दगड ठेऊन आपण उठतो, दात घासत सहज TV लावतो तर तिथे क्रिकेटची मॅच लागलेली. झालं, फिरायला जाणं उद्यावर.

      आपलं presentation skill सुधारण्याची गरज आहे, त्या अभावी आपण मागे पडत आहोत हे आपल्याला कळून चुकलेले असते, त्यासाठी काय करायला हवं हेहि समजत असतं पण  प्रयत्न करूनही आपण त्यासाठी ठोस उपाय करत नाही. (काही लोकांचा अपवाद वगळता)

      आपण ईतक्या उत्साहात संकल्प करतो. तरीही, सर्व काही कळत असूनही शेवटी तेच करतो जे आपल्यासाठी चांगलं नाहीये आणि ते बिलकुलच करत नाही जे आपण करायला हवं असं आपल्याला सारखं वाटत असतं. असं का होतं? याचं उत्तरं देण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट १.५ ते २.० लाख वर्षापूर्वीच्या काळात. चला तर मग…

       साधारण १.५ लाख वर्षापूर्वीची हि गोष्ट… आपले पूर्वज अन्न शोधत राना-वनातून हिंडत असत. कंदमुळे भेटली तर ठीक; नाहीतर शिकार असा साधारण प्रकार होता. रेमंड किंवा पिटर इंग्लंड काही तेंव्हा नव्हते. मात्र थंडी-पावसापासून वाचण्यासाठी झाडांची पाने गुंडाळलेली असायची. पोट भरलं कि मस्त हुंदडायचं, रात्र झाली कि झोपायचं पण प्रत्येक वेळी आपल्या जीवाला जपायचं म्हणजे थोडीही धोक्याची चाहूल लागली तर एकमेकांना सावध करायचं अन जीव मुठीत धरून पळायचं. शक्य असेल तर सर्वांनी मिळून धोक्याचा सामना करायचा आणि जिवंत राहण्यासाठी धडपडायचं. थोडक्यात, जे काही करायचं ते आज, आत्ता आणि इथे. करायचे तेही निसर्ग-नियमाच्या (instinct) अधीन राहूनच. ५ वर्षानंतर स्वतःला कुठे पाहणार आहोत याचा विचार करायची तेंव्हा गरजच नव्हती. कारण जिवंत राहण्यासाठी आज काय करायचं हा मुख्य प्रश्न असायचा. जो चुकला तो जीवानिशी जायचा. मागे जीवंत राहिलेल्यांसाठी तोच काय तो भूतकाळ. म्हणजेच भूतकाळ फक्त चुकांपासून धडा घेण्यासाठी होता आणि भविष्यकाळ म्हणाल तर फक्त अन्न आणि निवारा कुठे चांगला मिळेल याचा अंदाज. याशिवाय जे काही आयुष्य होतं ते फक्त वर्तमानात होतं. जो काही आनंद (gain) होता तो समोर होता आणि जे काही दुःख किंवा जो काही त्रास (pain) होता तोहि समोरच होता. केलेल्या प्रत्येक कृतीचा तात्काळ परिणाम दिसायचा. त्याचा फार तर फार थोडा फार अंदाज घेऊन कृती करायला सुरुवात झालेली होती कारण आपल्या मेंदूमध्ये बदल घडून विचार करणारा मेंदूचा भाग विकसित झाला होता. पण परिणाम तात्काळ अनुभवाला यायचा हे महत्वाचे. मनुष्य इथून कालपरत्वे सुधारित होत गेला. एकत्र राहिलो तर आजूबाजूच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकतो हे समजल्यामुळे वस्ती करू लागला. परिस्थिती आपल्याला अनुकूल करत गेला. पण हि सुधारणा सांस्कृतिक होती. आपण जर इतर प्राण्यांकडे बघितले, तर त्यांच्याबाबतीत आजही वर्तमानच महत्वाचा आहे. उद्याचा विचार त्यांच्याकडे मुळीच नसतो. म्हणून घर बांधणं नाही कि अन्नाची साठवण नाही.

      आता आपण सरळ सन २००० मध्ये येऊ. आता आपला दिनक्रम कसा आहे ते बघूया. प्रत्येक क्षणी भविष्याचा विचार करून आपण वर्तमानात जगत असतो. मुलाखतीला गेलो कि समोरचा विचारतो १० वर्षानंतर स्वतःला कुठे पाहता? ते सांगण्याईतके आपण आज नक्कीच चतुर झालो आहोत. त्यामुळे आपली निवड पक्कीच. मग, महिनाभर काम करायचं कारण महिन्याच्या शेवटी पगार मिळणार आणि चांगलं काम केलं तर वर्षाच्या शेवटी पगारवाढ मिळणार हे माहित असतं. म्हणजे सगळं भविष्यासाठी. आज गोड कमी खायचं कारण भविष्यात व्याधी नको आहे. आज पैसे साठवायचे कारण निवृत्तीनंतर जगायला पैसे पाहिजे. मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे कारण त्यांना पुढे आयुष्यात स्थिर-स्थावर होता यावं. एक तेवढा शरीर-धर्म जर सोडला तर आपण करत असलेले वर्तमानातले ९०% काम हे भविष्यासाठीची तरतूद असते. हा सर्व नागरीकरणाचा परिणाम आहे. या प्रक्रियेमध्ये आपण मागच्या २००० वर्षात मोठी झेप घेतली. गेल्या २००-३०० वर्षात तर आयुष्याचा वेग प्रचंड वाढला आणि इथेच सारा घोळ झाला.

शास्त्रीय प्रयोगांतून हे सिध्द झालं आहे कि आजही आपला मेंदू हा १.५ -२.० लाख वर्षापूर्वीच्या आदी-मानवाच्या मेंदूसारखाच आहे. म्हणजे आदी-मानव ज्याप्रकारे कोणतीही कृती करत असतांना फक्त वर्तमानाचा विचार करून आलेल्या प्रसंगामध्ये gain आहे कि pain आहे एवढेच ठरवायचा तसच आपणही करतो. यामुळे सभोवतालची परिस्थिती जरी आपल्याला भविष्याचा विचार करायला भाग पाडत असली तरी आपली वर्तणूक हि वर्तमानात gain आहे कि pain हे पाहूनच होत असते. आदी-मानवाच्या उत्क्रांतीप्रक्रीयेमध्ये त्याच्या मेंदूचा विकास होण्याला जितकी वर्ष लागली त्याच्या तुलनेत हि नागरीकरणाची १०००-२००० वर्ष काहीच नाहीत त्यामुळे आपल्या मेंदूला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला पुरेसा अवधीच मिळालेला नाही. त्याचा परिणाम काय?

आजहि आपल्याला वर्तमानात gain हवा असतो आणि pain टाळण्यावर भर असतो:- आज आईस-क्रीम खाऊन जास्त आनंद मिळतो. पुढे वजन वाढलं तर पाहून घेऊ. व्यायाम करून वर्षभरात शरीर पिळदार होईल, पण आज व्यायाम करायचा म्हणजे आलाच ना त्रास? कोण त्रास करून घेईल?

Fight OR Flight: जिथे जास्त मेहनत लागणार आहे, त्रासदायक होणार आहे, जमणार नाही असं वाटलं कि तिथून पळ काढण्याकडे जास्त कल असतो. कारण जीवाल त्रास नको असतो. म्हणूनच एखादे skill विकसित करायचे असते पण त्याची भीती मनातून जात नाही. मग, आपण लावलेला क्लास मधेच बंद करतो.

आपल्या मेंदूची संरचना अशीच आहे कि तत्काळ परिणाम दिसलेला आवडतो: आज विकत घेतलेला बूट पायात घालून मिरवतांना जी मजा येते ती निवृत्ती साठी पैसे साठवत असतांना  येत नाही.

neanderthal
आपल्या मेंदूचा विकास होण्याची प्रक्रिया जेंव्हा घडली, त्या काळात जास्त महत्व “वर्तमानाला” होते.

        मित्रांनो, आपला मेंदू आजही survival instincts चाच जास्त विचार करत असतो. आदी-मानवाच्या गरजा सीमित होत्या अन निसर्गात मुबलकता भरपूर होती. त्याला जे मुख्य प्रश्न  भेडसावत असायचे ते वर्तमान परिस्थितीशी संबंधित असायचे म्हणजे जिवंत कसं राहायचं आणि अन्न कसं मिळवायचं? तो प्रश्न आजच्या युगात निकाली निघाला आहे. आज मुख्य प्रश्न आहे तो उद्या आपलं कसं होणार? परंतु, वर्तमानाला महत्व देणाऱ्या मेंदूला भविष्यात उपयोगी पडणाऱ्या कल्पनांना फारसं महत्व द्यावंसं वाटत नाही हि मुख्य अडचण आहे. त्यामुळे आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची थेट उत्तरं आपल्याला माहित असूनही जेंव्हा कृती करायची वेळ येते तेंव्हा आपण फक्त समोर असलेल्या प्रसंगाचा विचार जास्त करतो न कि भविष्याचा. यालाच आपण म्हणतो “कळतं पण वळत नाही”.  आता यावर उपाय काय?

सतत काय आवश्यक आहे हे स्वतःला सांगत रहावे– सद्यस्थितीत भविष्य आपल्यासाठी जास्त महत्वाचे झालेले आहे. आपल्याला भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सतत आपल्या डोळ्यासमोर असायला हवे.

pain मधेही gain शोधायला शिकावे:- आजचा pain जर उद्याचा चा gain आहे तर तो pain आपण gain मध्ये रुपांतरीत करायला हवा. जसे कि; जीम, व्यायाम अथवा चालण्याच्या व्यायामानंतर किंवा स्वतःला काही प्रोत्साहनपर स्व-संवाद करावा, एखादे छोटेसे बक्षीस द्यावे.

संकल्प शक्य तितका सोपा करावा:- “मला वजन कमी करायचे आहे” असा संकल्प न करता “मी रोज २ किमी चालण्याचा व्यायाम करणार” असा करावा म्हणजे तो संकल्प दिनक्रमामध्ये समविष्ट होईल. संकल्प तडीस नेण्यास जास्त कालावधी लागणार असल्यास त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये तोडावा आणि एक-एका भागावर लक्ष केंद्रित करावे.

सोबत मिळाली तर उत्तम:- एकट्याने उत्साह टिकवून ठेवणे जरा अवघडच आहे. तेंव्हा आणखी कोणाची सोबत मिळाली तर एकमेकांना प्रोत्साहित करून प्रयत्नांमध्ये नियमितता आणणे शक्य आहे. संकल्प जाहीर करावा म्हणजे इतर लोकं आपल्याकडे अधून-मधून विचारणा करत राहतील. त्यामुळे आपल्यावर नैतिक दबाव वाढेल आणि मनाची नाही तर जनाची…..मात्रा लागू पडेल.  (हि म्हण येथे सोईसाठी उलट केली आहे)

दिनक्रम चुकला तर दंडाची तरतूद ठेवावी:- ज्या दिवशी आपण संकल्पात ठरवल्याप्रमाणे करणार नाही त्या दिवशी आपल्या जोडीदाराला ठराविक रक्कम देण्याचे कबुल करावे. जोडीदाराला तर gain होईल पण तुम्हाला नक्कीच pain होईल. त्यामुळे pain टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे नक्की.

शक्य असेल तिथे संकल्पाच्या निमित्ताने खर्च करून ठेवावा:- उदाहरणादाखल, जर सायकलिंग सुरु करायचे असं ठरवलं असेल तर एखादी महाग सायकल विकत घ्यावी. पैसे वाया जाणार याचा pain आपोआपच तुम्हाला रोज सायकलिंगची आठवण करून देईल. माझ्या एका मित्राने नुकतीच सायकलिंग सुरु केली आहे. महाग सायकल विकत घेणे हि त्याचीच कल्पना जी इथे मी तुम्हाला सांगत आहे.

मित्रांनो, आपल्या विचारांकडे, कृतीकडे डोळसपणे बघायला शिकायला हवे. आपण करीत असलेले संकल्प जर आपल्या फायद्याचे आहेत हे आपल्याला माहिती आहे तर ते संकल्प तडीस नेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेंव्हा मनाशी निर्धार करा कि यावर्षीचा संकल्प पूर्ण झालाच पाहिजे. २०१७ साठी माझा संकल्प हाच आहे कि मी अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार, जी तुम्हाला स्वतःची ओळख करून देत राहिल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल.

तुमचा संकल्प काय आहे ते कळवा तर मग……. आणि हो, इतरांना या माहितीची गरज आहे तेंव्हा हा लेख share करायला विसरू नका…… माझा ब्लॉग तुम्ही email द्वारे थेट तुमच्या Inbox मधेही मिळवू शकता. तुम्हा सर्वांना नूतन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावो !

वि. रा…! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: