लग्नाची गोष्ट

“हेलो आशा, सॉरी बेटा. काल खूप बिझी शेड्युल होतं, फोन करणं नाही जमलं. कसा झाला कार्यक्रम? धमाल केली असेल ना? कुठे आहे राजकुमार?” आनंदने विचारलं.

“तो बाहेर खेळत आहे मुलांसोबत. कसली धमाल घेऊन बसला आहेस दादा? मोजून१३ लोकं होती.  मुलाच्या ५व्या वाढदिवसाला १३ लोकं यावेत यापेक्षा मोठी थट्टा काय होऊ शकते?” आशा.

“असं कसं? आली नाहीत का बरीच लोकं? तुम्ही निमंत्रणचं वेळेवर दिलं नसेल.” पलीकडून आनंद.

थोडावेळ आशा काहीच बोलली नाही. “काय झालं? गप्प का झालीस?” आनंदने पुन्हा विचारले.

“नकोसं झालंय रे दादा. मी कधी बोलली नाही पण निर्णय चुकला आहे आपला. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे.” आशाने कसाबसा हुंदका आवरला. “आशा, असं का बोलते आहेस तू? नेमकं काय झालं ते सांग बघू. कोणता निर्णय चुकला?” आनंद गोंधळला होता. आशाच्या तोंडून असं कधी ऐकायला मिळेल अशी साधी शंकाही त्याच्या मनाला कधी शिवली नव्हती. आशा गप्पच होती.  बोलावेसे वाटत असूनही ती स्वतःला रोखू पाहत होती, मात्र तिचा श्वास वाढला होता. तिची घालमेल आनंदच्या लक्षात आली. “आशा, बाळ काय झालं? काल काही झालं का? कार्यक्रम लहान झाला म्हणून वाईट वाटतय का तुला? बोल बघू, तू बोलल्याशिवाय कसं समजेल मला.” आनंदचा आवाज कासावीस झाला होता.

त्याच्या प्रश्नाने आशाचा बांध फुटला. दाबण्याचा प्रयत्न करूनही एक अस्पष्टसा हुंदका आनंदला ऐकू गेला. त्याच्या काळजात चर्रर झालं. “बाळ, तू रडू नकोस. मला तसंही नाशिकला यायचं होतं, मी उद्याचं येतो. आपण समोरासमोरच बोलू, तेच ठीक राहील. तू शांत हो बघू आधी.” आनंदने कसेबसे समजावले. आशा रडते आहे म्हणजे अडचण साधी नाही हे त्याच्या लक्षात आले होते. कोणत्याही परिस्थितीत हसत राहणारी मनमिळाऊ स्वभावाची आशा त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. ती सहजासहजी हार मानणारी नाही हे त्याला ठाऊक होते. काय झालं असेल याचा मनाशी विचार करतच “राधिकाsss, मी उद्या नाशिकला जातो आहे. १-२ दिवसांनी परतेन.” आनंदने घरात सांगितले आणि तो तयारी करू लागला.

दारावरची बेल वाजली. आशाने दार उघडले. तिचा निस्तेज चेहरा आणि रडवेले डोळे पाहून आनंदचा चेहरा फिका पडला. “आशा, काय करून घेते आहेस? आरशात बघ स्वतःला. आणि असं नेमकं झालं तरी काय? 3-४ महिन्यांपूर्वी मी येऊन गेलो तोपर्यंत तर सर्वच ठीक सुरु होतं, मग आत्ताच असं काय झालं?” आनंदने विचारलं.

“बैस ना. काय घेतोस, चहा कि कॉफी? दुरून आला आहेस.” आशाने त्याला हाताला धरून सोफ्यावर बसवले. ती किचन मध्ये जायला निघाली. “थांब आशे, तू आधी इथं बस आणि काय झालं ते सांग. तुझ्यासारखी मुलगी असं करते आहे हे पाहून मी काय समजू?” आनंदने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. “आलेच दादा मी, प्यायला पाणी आणते.” आशा.

आनंदला पाण्याचा ग्लास देऊन ती त्याच्या समोर खुर्ची घेऊन बसली. आनंद तिच्याकडे बघत तिच्या बोलण्याची वाट पाहू लागला. हातात पाण्याचा ग्लास तसाच होता. आशा खाली मन घालून बसलेली होती. कुठून सुरु करावं ते कदाचित तिलाही समजत नव्हतं. किचन मध्ये जाऊन आवरता घेतलेला हुंदका बाहेर येण्यासाठी धडपडत होता. त्याला तर तिने रोखलेले होते मात्र अश्रुंचे दोन थेंब तिच्या हातावर अलगद येऊन उतरलेले आनंदने पहिले. नक्कीच मोठा वाद झाला आहे याची त्याला आता खात्री झाली. गेल्या वेळी जेंव्हा त्याने आशाला रडतांना पहिले होते तेंव्हा ती ९ वर्षांची होती. त्यानंतर आजच ती रडतांना दिसत होती. मधल्या काळात अडचणी आल्याच नाही असं नव्हतं. लाटा येत राहतील आणि तश्याच जातही राहतील. किनाऱ्यावरच्या खडकाने भिजायचं तर असत पण लाटांच्या भीतीने झीजायचं नसतं हि आई-अण्णांची शिकवण गाठीशी होती. त्यामुळे दोन्ही भावंडांना अडचणींसह आयुष्यावर प्रेम करायची सवय लागली होती. वाद-विवाद, रुसवे-फुगवे असा प्रकार नव्हता अन स्वभाव जुळत नाही अशी व्यक्ती  नव्हती. जुळवून घेता येत नाही असं काही तरी आशाच्या आयुष्यात आहे याची आनंदला आज पहिल्यांदाच जाणीव झाली. हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत त्याने आशाच्या डोक्यावरून हलका हात फिरवला. तिचे डोळे बंदच होते. अश्रू गालावरून ओघळले. ज्या डोळ्यांनी प्रत्येक क्षणामध्ये आनंदच शोधला होता ते डोळे आज साक्षात आनंदासमोरचं बंद होते. होठ दाताखाली दाबून ती रडणं थांबवण्याचा प्रयत्न करत होती.

“आशा, मला चहा हवा आहे. थोडा चहा करून आण, जा.” तिला किचन मध्ये मोकळं रडता यावं म्हणून आनंदने सांगितले. ती धावतच किचन मध्ये गेली. आनंदच्या काळजाचा ठोका चुकला. त्याची बेचैनी वाढली होती. आज काहीही झालं तरी तिच्याशी बोलून हे शोधणं आता आवश्यक झालं होतं. पाणी पित असतांना सोफ्यावर बसूनच तो घर न्याहाळू लागला. हॉलमध्ये तिघांचे भरपूर फोटो टांगलेले होते. सर्व वस्तूही जागच्या जागेवर होत्या. फ्रेशनरचा सुगंध घरभर दरवळत होता. बाहेरून आलेल्या नवीन माणसाला ह्या घरात काही प्रॉब्लेम असावा असं वाटायला कुठेच वाव नव्हता.

थोड्यावेळाने आशा चहा घेऊन आली. आतमध्ये जाऊन रडून घेतल्याने ती थोडी फ्रेश दिसत होती. चहाचा कप त्याच्यासमोर धरला आणि ती पुन्हा पहिल्या जागेवर बसली. तिला अचानक हसायला आलं. आनंद आणखीणच गोंधळला. ‘इतक्या वेळ आशा आपली चेष्टा तर करत नव्हती?” त्याच्या मनातलं तिनं ओळखलं, “नाही रे दादा, चेष्टा वगैरे नाही पण कुठून सुरु करावं हे न समजल्यामुळे मला हसायला आलं.” ती खिडकीतून बाहेर बघू लागली, ”आयुष्य बदललं आहे दादा. खरंतर, सात वर्षं झालीत, सवय व्हायला हवी होती. पण हल्ली त्रासचं जास्त होतो आहे.” आशा थोडी हरवल्यासारखी वाटली. “आशा, आशा काय हे? लग्नानंतर आयुष्य बदलतच असते. थोडा फार बदल होतच असतो जगण्यात.” तो पुढे बोलणार तोच आशा पुन्हा बोलू लागली, ”जगण्यामध्ये थोडा-फार बदल चालून जातो रे दादा, पण जगणंचं जर फार-थोडं उरलं तर मग काय करायचं?” आनंद अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. आशा त्याच्या डोळ्यात पाहून बोलली, “दादा, मी नेहमी हरखून गेलेलीच तूला आठवत असेल. मी हरवून गेलेली मात्र तू कधी पहिली नसशील, हो नं?” आनंद मागे रेलून बैठकीचा बसला, “आता मला कोडी नकोय आशा. सविस्तर बोलशील थोडी?” मला अजूनही काय होतंय ते समजलच नाही आहे.” आनंद.

“विचार केला तर माझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये दादा, अन विचार केला तर.. आयुष्य म्हणावं असं काही उरलंचं नाही बघ. सॉरी, पुन्हा कोड्यात बोलले. पण मी खूप एकटी पडलेय रे  दादा. काही वेळ शांततेत गेला.

“रोज थोडी फार कुरबुर सुरु असते. तुला तर माहिती आहे मला वाद घातलेले आवडत नाहीत पण वाद सोडून दुसरं काहीच नसतं सध्या आयुष्यात. त्यामुळे थोडी डीमोरलाईज झाली आहे. सारखी एकमेकांवर ओरड सुरु असते.” आशा खिडकीतून बाहेर पाहू लागली.

“आशा, मला असं वाटतं कि लग्नाला घेऊन तू खूप इमोशनल झाली आहेस. डोळसपणे नात्याकडे पाहत नाहीयेस.” आनंद.

“तसं नाही रे, दादा.  लग्नाआधी जशी जगलेय त्याची ईतकी सवय झाली होती की आजच्या जगण्यातला अर्थच मला कळत नाही आहे. रोजचा दिवस एक नवीन ध्येय घेऊन यायचा. दिवसभर त्याच्यामागे पळत कधी दिवस संपायचा ते कळतसुद्धा नसायचे. ध्यास नाही तो श्वास काय कामाचा? पण आज अशी परिस्थिती आहे कि गेल्या कित्येक वर्षांत मी नवीन काही शिकलेच नाहीये, जीव गुंतवावा असं कधी काही केलच नाहीये. आता त्याचा त्रास व्हायला लागला आहे.  मी आयुष्याला काय देते आहे हाच विचार रोज माझ्या डोक्यात पिंगा घालत असतो. काय होतं रे आपल्या अण्णांकडे? कित्येकदा तर मन मारून जगलो आपण. महिन्याच्या शेवटी तर काही विकत घेण्याची ईच्छा होऊ नये म्हणून आपण मान वळवून दुकानांसमोरून जायचो. तरी किती समृद्ध होतं ते आयुष्य? आपलं छोटसं  3 रूमचं ते घर. पण प्रत्येक भिंतीमध्ये जगणं कसं रसरसून भरलेलं होतं.” आशा पुन्हा हरवली होती. हरवलेल्या डोळ्यांनीचं ती पुन्हा बोलू लागली, “आनंद आणि आशा, आई-अण्णांनी आपली नावं का ठेवली होती? कारण, जगण्यासाठी या दोनच गोष्टी आयुष्यभर पुरतात याची त्यांना कल्पना होती. बाकी काही लागत नाही अन भेटलं तरी पुरत नाही हेच शिकवलं ना त्यांनी आपल्याला? आणि नेमकं तेच मला लग्नानंतर या घरात सापडत नाहीये. इथे प्रत्येक गोष्टीला तर्क-वितर्क लावले जातात, प्रत्येक गोष्टीचं अनॅलिसिस होतं आणि शक्य नाही असं लेबल लावून मोकळी होतात हि लोकं. मग काय? करण्याचा त्रास नाही की अपयशाची भीती नाही. जर काही करायलाच नाहीये तर जगण्यातली उमेद उरतेच कुठे अन करण्यातला आनंद तरी मिळेल कसा? आठवते तुला दादा, कशी होते मी लग्नाआधी? करुन पहिली नाही अशी एक गोष्ट नसायची तेंव्हा. अण्णासुद्धा प्रोत्साहन द्यायचे, नेहमी म्हणायचे की जगण्यातली खरी गम्मत करून पाहण्यात आहे, दुरून पाहण्यात नाही.” आशाचं भान हरपत चाललं होतं. अडचण आनंदच्या लक्षात येऊ लागली होती.

हरवलेल्या अवस्थेतच आशाने प्रश्न विचारला “आपण लग्न का करतो रे, दादा?”

Lagn.jpg

 

ता. क. :        मित्रांनो, आशाला पडलेला हा प्रश्न बहुतेक लोकांना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पडतच असतो. (तुम्हाला हा प्रश्न पडला नसेल तर उत्तमच.) मला मात्र हा प्रश्न पडला आहे (take it positively dude) आणि मी उत्तराच्या शोधात आहे.  या प्रश्नाचे उत्तर तुमच्यापैकी काही लोकाना नक्कीच माहिती असेल. चला तर मग, कमेंट मध्ये जाऊन तुम्हाला माहिती असलेले उत्तर टाईप करून पाठवा..

(ज्यांना उघडपणे कमेंट करायची नसेल त्यांनी blogvalayankit@gmail.com  या mail ID वर mail करून आपले उत्तर कळवण्यास हरकत नाही.)

वि. रा. !!!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: