युअर ब्रेन अँट वर्क – डेव्हिड रॉक

पुस्तक मंथन मध्ये आपले स्वागत आहे. छान छान पुस्तकांचे सारांश वाचत राहण्यासाठी वलयांकितला सबस्क्राईब करा आणि पुस्तकातला महत्वाचा आशय मिळवा….

आजच्या पुस्तकाचे नाव:- Your Brain at Work

लेखक : David Rock

का वाचावे: आपल्या मेंदूला (मनाला) जाणून घेण्यासाठी. स्वतः मध्ये बदल करायचे असल्यास ते बदल करण्यासाठी आपला मेंदू नक्की कसे काम करतो हे जाणून घेणे म्हणूनच आवश्यक ठरते.

सारांश: आपल्या सवयी, विचार आणि व्यक्तिमत्वावर आपल्या मेंदूमध्ये सुरु असणाऱ्या उलथापालथींचा प्रभाव असतो. कळायला लागल्यापासून आजूबाजूच्या वातावरणातून आपण काही बोध घेत असतो. त्यातून आपले व्यक्तिमत्व घडते. ह्या बोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा त्रुटी राहून जातात ज्या आपल्या प्रगतीला मारक ठरत राहतात. त्या त्रुटी कश्या ओळखायच्या याचे सुंदर वर्णन या पुस्तक दिलेले आहे.

मनुष्याला प्राण्यांपासून वेगळे सिद्ध करणारा मेंदूचा एक भाग म्हणजे प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्स (PRE-FRONTAL CORTEX) याला लेखकाने मंचाची उपमा दिली आहे. या मंचावर काम करणारे कलाकार म्हणजे आपले विचार, आठवणी, स्वप्न, ध्येय आणि आपल्या नानाविध भावना. आपला मेंदू या सर्वांचा मेळ कोणत्या परिस्थितीत कसा घालत असतो याचे सुंदर विवेचन यात आहे. याउपर, आपण एका विशिष्ट परिस्थितीत साधारणपणे कसे वागतो आणि कसे वागू शकलो असतो हे उदाहरणासहित देऊन लेखकाने आपल्यातला बदल कसा शक्य आहे हे सोपे करून सांगितले आहे.

बोध:
1. आपल्या जागेपणीच्या मेंदूतल्या सर्व हालचाली (सजगता म्हणजेच विचार क्षमता, निर्णय क्षमता, नियोजन हे सर्व) प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्समध्ये होत असतात. हेच आपले ते मन असते जे आपल्याशी बोलत असते.

2. आपल्या प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्समध्ये खूप कमी जागा आहे. म्हणजे त्याची प्रोसेस करण्याची क्षमता खूपच कमी आहे. तिथे कोणत्याही एका वेळेला एकच गोष्ट (विचार, भावना, स्वप्न, प्लँनिंग वगेरे) राहू शकते. म्हणून आपल्या मनात कोणती गोष्ट असावी याची दक्षता बाळगायला हवी. त्यासाठी नेहमी कामांची यादी करून प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्यानुसार एक एक काम हाती घ्यावे. इतर सर्व विचारांना त्यावेळी स्थगिती द्यावी हे इथे अपेक्षित आहे.

3. आपल्या प्रिफ्रॉन्टल कॉर्टेक्सला छोटीशी गोष्ट करायला सुद्धा ऊर्जा लागत असते. हेच कारण आहे कि जेंव्हा आपण थकलेले असतो तेंव्हा आपण डोक्याला जास्त ताण देणाऱ्या गोष्टी टाळतो. कारण मेंदूला लागणारी ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध नसते. म्हणून निर्णय घेणे, प्लांनिंग करणे, नियोजन करणे अशी कामे दिवसातल्या ज्या वेळेत साधारणपणे आपण ताजेतवाने असतो अश्याच वेळी उरकावीत.

4. आपल्या मेंदूला उपलब्ध पर्यांयापैकी अशीच कामे करायला आवडतात ज्या कामांना तुलनेने कमी ऊर्जा लागत असते. म्हणून विचारांमध्ये गुंतून राहणे, भूतकाळाची वा भविष्यकाळाची स्वप्नरंजन करणे अशी कामे आपला मेंदू जास्त करतो कारण व्हिज्युअलायझेशनला खूप कमी ऊर्जा लागते. परिणामी समोर असलेले काम हातात घ्यायला मेंदू (म्हणजेच आपण) टाळाटाळ करत असतो.

5. मेंदू नेहमी अश्याच युक्त्या वापरीत राहतो ज्यायोगे आपण कमी ऊर्जा खर्च होणारे काम करायला उद्युक्त होत असतो. हेच कारण आहे कि आपल्याला पॉवर-विंडो असलेली कार आणि remote control असलेली T.V. आवडत असते. कारण इथे ऊर्जा कमी लागते हे मेंदूला माहित असते.

6. कामांमधून लक्ष विचलित करणाऱ्या इतर गोष्टींकडे सहज लक्ष जाण्यामागे हेच कारण असते. कमी ऊर्जा लागणार हे माहित असल्याने मेंदू सहज आपले लक्ष तिकडे वळवतो आणि आपण मेंदूच्या ह्या सवयीला सतत बळी पडत राहतो.

7. कित्येक लाख वर्षांपूर्वी आपला मेंदू ज्याकाळी विकसित झाला आहे तो काळ अन्न-टंचाईचा होता. त्यामुळे आपला मेंदू शारीरिक हालचाल टाळणे, व्यायाम टाळणे, डोक्याला ताण देणाऱ्या गोष्टी टाळणे या गोष्टींना प्राधान्य देत असतो. परंतु, याबाबतीत आपण सजग राहून आवश्यक त्यावेळी आवश्यक कामे केलीच पाहिजे.

8. जेंव्हा जेंव्हा हातात असलेले काम सोडून तुमचे विचार इतरत्र भटकू लागतील तेंव्हा हा तुमच्या मेंदूचाच प्रताप आहे हे लक्षात घेऊन आपले लक्ष पुन्हा समोर असलेल्या कामावर केंद्रित करा.. जे काम समोर आहे त्यावरच फोकस ठेवा.. कमी वेळेत आणि अचूकतेने कामे उरकण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

पुस्तकात सांगितलेला आशय तर मी येथे दिलाच आहे. तरीही संपूर्ण पुस्तक वाचावेसे वाटत असल्यास घेऊन संग्रही ठेवावे. आपल्या सवयी तसेच वर्तन बदलण्यासाठी आणि त्यायोगे आयुष्याची दिशा बदलण्यासाठी ह्या पुस्तकाची उत्तमप्रकारे मदत होऊ शकते.

वि.रा.!!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: