यशाकडे नेणारा….स्व-संवाद !

स्व-संवाद म्हणजे काय: – वयाच्या १५ वर्षी Acid हल्ल्याची बळी ठरलेल्या लक्ष्मी अग्रवालला किंवा रेल्वे अपघातात सापडलेल्या अनुरीमा सिन्हाला आयुष्यात एक नवं ध्येय ज्याने दिलं, तो स्व-संवाद होता आणि कामगिरीच्या उत्तुंग शिखरावर असलेल्या टायगर वूड्स किंवा माईक टायसनला क्षणार्धात धुळीत मिळवलं तो हि स्व-संवादच होता. तो स्व-संवादच होता, ज्याने रवींद्रनाथ टागोरांना वादळातल्या निसर्ग-सौंदर्याने मोहित केले आणि गुडघ्यावर बसून त्यांनी निसर्गाच्या असीम शक्तीचा आनंद अनुभवला आणि तोहि स्व-संवादच आहे, साध्या साध्या गोष्टींवरून जो आपल्या आयुष्यात, नाहक वादळ निर्माण करीत राहतो.

स्व-संवाद, एक अव्याहतपणे सुरु असलेली प्रक्रिया. आपण सर्वच जण स्वतःशी सतत बोलत असतो. व्यक्ती, वस्तू अथवा प्रसंगाबाबत आपली भूमिका मांडत असतो, निर्णय घेत असतो, स्वतःला प्रश्न विचारत असतो, कधी स्वतःवरच टीकादेखील करत असतो. एखाद्या प्रसंगात आपलं काय चुकलं, आपण काय करायला हवं होतं किंवा काय करायला नको होतं ते स्वतःला सांगत असतो. स्वतःशी असं सतत बोलून आपण आपलं एक जग निर्माण करत असतो. आपल्या धारणा, समज-गैरसमज, गुण-अवगुण आणि आपल्या क्षमता आपणच ठरवत असतो आणि त्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन आपण काहीच करू शकणार नाही असे स्वतःलाच जाहीर करत असतो.

             आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव ह्या स्व-संवादाचाच असतो. तुम्ही कधीतरी हे नक्कीच अनुभवलं असणार की प्रसंग तोच असतो, पण एकाला त्यात संधी दार ठोठावतांना दिसते आणि त्याचवेळी दुसरा कोणीतरी मात्र, अडचणींचा भला-मोठा डोंगर आता कसा पार करायचा याचा विचार करायला लागतो. हि स्व-संवादाची किमया आहे आणि यशस्वी होण्यासाठी ती कशी काम करते हे समजून घेणे आवश्यक आहे.

            स्व-संवाद, पण कशासाठी? – मित्रांनो, आपल्यासहित सर्व सजीवांचे कार्य दिलेल्या कोणत्याही वेळेला दोन स्तरांवर सुरु असते. आणि त्या दोन्ही स्तरांना जोडण्याचं महत्वाचं काम हा संवाद करत असतो.

एक असतो बाह्य-स्तर जो सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करून अनुकूलता-प्रतिकूलता जाणण्याचे काम करत असतो. ज्यामध्ये आपली ज्ञानेंद्रिये आणि त्यांना प्राप्त झालेल्या संवेदनांवरून आकलन करणारे, त्यावर विचार-तर्क लावणारे आणि त्यानुसार कृती करण्याची आज्ञा देणारे मेंदूमधील विविध केंद्रे तसेच आपल्या ईच्छा, भावना, कल्पना आणि भाषा ई. नियंत्रित करणारी केंद्रे असतात. ह्या झाल्या बाह्य-मनाच्या कक्षा. आपल्याला आयुष्यात दिशा दाखवण्याचे आणि ठराविक दिशेने आपली आंतरिक उर्जा उर्जा कार्यान्वित करण्याचे काम बाह्य-मन करीत असते.

              दुसरा स्तर असतो आंतरिक स्तर ज्यामध्ये आपले अंतर्मन असते. एक अशी चेतना जी कधीच  विश्रामावास्थेमध्ये नसते. आपण जागे असो वा झोपलेले, अंतर्मनाचे कार्य सतत सुरु असते. आपल्या शरीरातील अत्यावश्यक क्रिया उदा. हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण, चया-पचायाच्या क्रिया, डोळ्यांची पापणीची उघड-झाप, सर्व प्रतिक्षिप्त क्रिया ई. पार पाडण्याची जबाबदारी अंतर्मनाची, आपल्याला जाणीवसुद्धा होऊ न देता. आणखी एक अतिशय महत्वाचे कार्य अंतर्मन करीत असते ते म्हणजे  स्मृती (माहिती) साठवत राहणे. कारण माहिती म्हणजे ज्ञान असते ज्याचा काही ना कधी उपयोग होणार याची त्याला जाणीव असते. ही माहिती तरी किती असावी? तुम्ही-आम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या प्रचंड माहितीची नोंद आपले अंतर्मन सतत करत असते. आपल्या आसपास सुरु असलेल्या प्रत्येक संवेदनाचा कळत-नकळत साठा होत असतो. यावेळीसुद्धा तुम्ही हा लेख वाचत आहात, तुमच्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी सुरु आहेत ज्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे, डोळ्यांच्या कडा मधुन काही गोष्टी अस्पष्टशा दिसत आहेत, तुमच्या त्वचेला हवेतला गारवा/उष्मा जाणवत आहे. नोंद घेणे तर सतत सुरु आहे मात्र तुम्हाला त्याची जाणीव नाही इतकेच. पण, इतकी प्रचंड माहिती? आणि कशासाठी?

आपले अंतर्मन कोणत्याही कार्यांत यश देऊ शकते:-  सजीवांचे अंतर्मन हे एक महाकाय केंद्र आहे. सर्व सजीवांमध्ये मूलतः एकच असलेल्या ह्या अंतर्मनात विश्वाची सारी रहस्ये, सर्व नियम यांची नोंद आपण जन्माला येण्याच्याही आधीपासून असते. शुक्र-बिजानुचे फलन होऊन जीव तयार झाला कि लगेच त्याला जीवाची भीती अन यशस्वी होऊन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रेरक-शक्ती यांचं अधिष्ठान प्राप्त होत असते. १-२ महिन्याचं तान्ह बाळ बघा. त्याच्या आईशिवाय इतर कोणी त्याला उचलून घेतलं तर लगेच ते रडू लागतं. आपली सुरक्षा आईजवळच आहे. सध्या आपण सुरक्षित नाही आहोत याची त्याला जाणीव होते आणि अस्वस्थ वाटून ते रडायला लागतं. हि असुरक्षितता त्याला कशी जाणवते? त्याने ना कधी शारीरिक ईजा पाहिलेली असते ना मारहाण. मग हि अस्वस्थता त्याच्यात येते तरी कशी? अंधारातून प्रकाशाकडे झेपावणारे वृक्ष-वेली असो, प्रजननासाठी हजारो मैलांचा प्रवास करून पुन्हा आपल्याच ठिकाणावर परतणारे पक्षी असो वा अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर थेट स्वतःच्या जनुकीय संरचनेमध्ये बदल करण्याचा सजीवांचा प्रयत्न असो हे सर्वच या अंतर्मनाच्या सहाय्याने शक्य होत असते. निसर्गानेच आपल्याला हि सोय करून दिलेली आहे.

            ही अंतर्मनातील माहितीच असते जी तान्ह्या बाळाला आई सोडून इतर कोणी उचलले तर असुरक्षिततेची भावना देत असते. हीच ती माहिती आहे जिच्या आधारे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला, गतीचे नियम शोधले, आईनस्टाईनने सापेक्षतावाद शोधला आणि जेम्स वॅटने वाफेच्या शक्तीचा शोध लावला. आर्कीमेडीजला जल-निस्सःरण चा नियम आंघोळीच्या टबमध्ये सुचला होता. आपलेच बघा ना, अडचणीच्या वेळी अथवा संकटामध्ये असतांना अचानक आठवलेली युक्ती येते तरी कुठून? जर कित्येक पिढ्यांचा उध्दार करणारे भले-मोठाले शोध ह्याच मनाने लावले तर मग आपल्याला एक आयुष्यभर पुरेल इतका यशाचा शोध का लागू शकत नाही? नक्कीच लागू शकतो. हे सर्व शोध मनातच तर उगम पावलेले आहेत. आपणा सर्वांमध्ये अशी आंतरिक शक्ती असते जी समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडवून देऊ शकत असते. मात्र आपल्याला तसा ध्यास हवा. तरच अंतर्मनातील ही उर्जा योग्य दिशेने वापरल्या जाते. दुर्दैवाने, आपल्या संवादाच्या माध्यमातून हि उर्जा आपण चुकीच्या दिशेने वापरत असतो.

%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6
स्वतःला नेहमी हेच विचारत रहावे  की आता पुढे कसं जायचं?… उत्तर समोर हजर होणार यात शंका नाही .

      अंतर्मनाची मर्यादा आणि स्व-संवादचे महत्व:- आपले अंतर्मन शरीराच्या आतले कार्य न सांगता आणि न चुकता करत असते मात्र बाह्य जगातले कोणतेही कार्य करण्यासाठी त्याला तसा संदेश बाह्य मनाने द्यावा लागतो. आपली आंतरिक उर्जा कोणत्या दिशेने कार्यान्वित करायची आहे ते ठरवणं हे बाह्य मनाचं मुख्य कार्य असते.

                प्राप्त संवेदनांना अर्थ लावून त्यावर आपण करीत असलेला विचार, आपल्या मनात येत असलेल्या सर्व कल्पना आणि त्याला असुसरून आपला स्वतःशीच होत असलेला संवाद हाच अंतर्मनापर्यंत पोहचलेला संदेश असतो, ज्याला अंतर्मन आदेशच मानत असते. आपला स्व-संवाद आपल्या दोन्ही मनाला जोडणारा एकमेव दुवा असतो. बाह्यमन ज्याहि गोष्टीचा विचार करत असते तिथेच आपले ध्यान असते. जे आपले ध्यान असते तेच अंतर्मनाचे ध्येय बनते आणि त्या ध्येयाकडेच अंतर्मनातील सारी उर्जा कार्यान्वित होत असते. जसे हा लेख वाचत असतांना इतर संवेदनांची नोंद घेण तुमच्या अंतर्मनात सुरु आहे मात्र तुमचे बाह्यमन या लेखाला चिकटले आहे म्हणून त्या संवेदना तुम्हाला जाणवत नाहीत. जेंव्हा हा लेख सोडून दुसऱ्या एखाद्या संवेदनेला बाह्यमन चिकटेल तेंव्हा तुमचे डोळे ह्या लेखावरून फिरत राहतील मात्र इथल्या शब्दांचा बोध तुम्हाला होणार नाही, त्या संवेदनेचा बोध होईल जिथे तुमचे मन जाऊन चिकटले आहे. पण म्हणून बाकी सर्व घडणे थांबले आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला होणारा बोध फक्त बदलतो. आणि बोध म्हणजे काय तर आधीच साठवून ठेवलेल्या माहितीचा (स्मृतीचा) संदर्भ घेऊन नव्याने प्राप्त झालेल्या संवेदनेचं केवळ एक वर्गीकरण. जेंव्हा कोणी असं सांगितलं की “रमेश खूप खोडकर मुलगा आहे” तेंव्हा लगेच रमेश काय-काय करू शकतो हे सांगणारे सर्व चित्र एक-एक करून तुमच्या डोळ्यासमोरून जातात कारण “खोडकर” ह्या शब्दाशी निगडीत आपल्याकडे माहिती (स्मृती) साठवलेली असतेच. त्याप्रमाणेच बाह्यमनाकडून मिळालेल्या प्रत्येक नवीन संदेशाला स्मृतीच्या आधारे पुष्टीकरण देण्याचे आणि ते कसे खरे आहे हे सिद्ध करण्याचे काम अंतर्मन करीत असते. थोडक्यात आपल्या विचारांमध्ये जे काही सुरु आहे त्याच्या पुष्टीसाठी आवश्यक असलेला सर्व data बाहेर येत राहतो. मग जेंव्हा आपण एखादे काम अवघड आहे असं स्वतःशीच म्हणतो, ते खरच कसं अवघड आहे ते सिद्ध करण्यासाठी “अवघड” या शब्दाशी निगडीत एक-एक स्मृती मनःपटलावर येऊ लागते. अशाप्रकारे जी उर्जा यशस्वी होण्यासाठी वापरायची होती ती उर्जा उलट्या दिशेने कार्यान्वित होते. आपले विचार “अवघड” वर केंद्रित आहेत म्हणजे आपलं ध्येय आता “अवघड” झालेलं आहे.

           आता आठवून पहा कि आपले विचार नेमके कोणते असतात? “नाही रे बाबा, मी तर हे कधी केलेलेच नाही,” “बाप रे! हे तर अवघडच दिसते आहे.” “मला जमेल असं नाही वाटत,” नातं टिकेल का माझं? माझा व्यवसाय चालेल?” हा आपला स्व-संवाद असतो, मग यशस्वी होण्याची कितीही ईच्छा असो, अपयशी होण्याचे विचार आपल्याला यशापासून दूर नेत राहतात. जेंव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं नातं टिकणार नाही असा विचार आपण करतो तेंव्हा ती व्यक्ती कशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे याकडेच आपले जास्त लक्ष जात राहते. नातं टिकावं ही आपली ईच्छा केवळ एक स्वप्न बनून राहते आणि प्रत्यक्षात मात्र आपण मनाने आणखीनच दूर जाऊ लागतो. ईच्छा आणि कल्पना या दोहोंमध्ये मेळ नसल्याचा हा परिणाम आहे. ईच्छा अंतर्मनातून येते आणि ती नेहमी मंगलमय असते मात्र यशाची केवळ ईच्छा असून भागत नाही. आपण यशस्वी होणार अशी कल्पना बाह्य-मनानेसुद्धा करावी लागते. मग आपोआपच यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल त्याची लिस्ट समोर येऊ लागते. आणि इथेच स्व-संवादाचे महत्व येते. घटना रोज घडत राहतात, त्यांना चांगली अथवा वाईट अशी लेबल चिकटवून आपण त्यातल्या काही “समस्या” समजून निवडतो आणि त्याभोवती आपले विचार केंद्रित करतो. मग तशाच घटना ठळकपणे आपल्याला दिसायला लागतात आणि आपण म्हणतो “मला वाटलच होतं असं होईल.”

             यशस्वी लोकांच्या आयुष्यात जर आपण डोकावलं तर हेच दिसेल कि त्यांच्या मनात अपयशाची भीती क्वचितच येते आणि आलीच तर लगेच ती भीती ते लोक झटकून टाकत असतात. म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त यशाचाच विचार दिवस-रात्र करा. तुमचा स्व-संवाद यशाभोवती केंद्रित करा. कोणत्याही परिस्थितीत ALL IS WELL असं स्वतःला सांगा असं आमीर खान ३ Idiot मध्ये जे सुचवतो तो यशस्वी स्व-संवादाचा उत्कृष्ट नमुना आहे कारण त्यामुळे तुमची उर्जा योग्य त्या ध्येयावर केंद्रित होण्यासाठी मोकळी असते.

तूर्तास, येथे थांबूया. हा लेख कसा वाटला ते comment लिहून कळवा. हा स्वतःचा शोध आहे आणि तो घेणे आवश्यक आहे कारण जेंव्हा शक्तींचा प्रत्यय आपल्याला येयील, तेंव्हाच आपल्या भीती नाहीश्या होतील आणि आपला प्रवास यशाकडे होऊ लागेल यात शंका नाही.

वलयांकितचे लेख तुमच्या Inbox मध्ये मिळवण्यासाठी Email ने subscribe करा. तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये share करा.

वि रा…!

2 thoughts on “यशाकडे नेणारा….स्व-संवाद !

 • December 23, 2016 at 10:53 am
  Permalink

  Bravo ViRa….Psychological concepts are very hard to understand….but, you explained “Self-talk” concept in a very simplistic way – exchange between Consciousness & Subconscious minds !!!…….. I am still confused about the “Unconscious” mind, information in which we cannot access. They are unconscious forces (beliefs, patterns, subjective maps of reality) that drive our behaviours…..hope I’ll get my doubts cleared as your “blog” journey continues…Cheers

  Reply
 • December 24, 2016 at 10:09 pm
  Permalink

  U r focussing on most important aspects of life. We will like to read more. Keep on writing.👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: