मेरी आवाज सुनो…..

रविवारची प्रसन्न सकाळ. सुट्टीचा दिवस असला कि खिडकीत बसून चहाचे झुरके घेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना न्ह्याहाळणे हा श्यामचा ठरलेला उद्योग असे. तेवढ्यात त्याला शेजाऱ्याच्या घरातून ८-१० वर्षाच्या लहान मुलाचा जोर-जोरात ओरडण्याचा आवाज आला. “कायम ओरडत असतो हा मुलगा, सरळ सांगताच नाही येत त्याला. काहीही हवं असलं कि रडून-बोंबलूनच सांगतो,” सोफा आवरत स्वानंदी तक्रारीच्या सुरात बोलून गेली.

“त्याची चुकी नाही आहे त्यात स्वानंदी. त्याला शिकवणच तशी मिळाली आहे.” श्याम रिकामा चहाचा कप खाली ठेवत म्हणाला.

“अशी शिकवण देतात का कोणी? कोणाला वाटतं मुलाने ओरडूनच बोलावं? स्वानंदी.

“स्वानंदी, मुल जेंव्हा लहान असतं, ते आनंदी असेल, खेळत असेल तर घरातली सर्वच मंडळी त्याला मोकळं खेळू देतात आणि आपापली कामं करत राहतात. आणि जर का ते रडायला लागलं तरच मात्र सगळी कामं सोडून त्याच्याकडे धाव घेतात. तिथूनच त्याला कळायला लागतं कि इतरांचं ध्यान आकर्षित करायचं असेल तर आपल्याला रडावं लागेल. जसजसं ते मूल मोठं होतं, त्याचं हे रडणं मग ओरडण्यात बदलू लागतं.” श्याम हसत हसत म्हणाला.

“बरोबर आहे. पण हे तर प्रत्येक घरात असच होतं. याला काय उपाय आहे? मुल कितीही रडलं तर त्याच्याकडे पाहूच नये का मग?” स्वानंदीचा प्रश्न स्वाभाविक होता.

kidscreaming

“अगं, असं कसं? ध्यान आकर्षित करण्यासाठी त्याने मार्ग शोधायच्या आधीच पालकाने त्याला attend करायला हवं. रडायची अन ओरडायची पाळीच त्याच्यावर का यावी? याउलट जितकं मुल खुश असेल तितकं त्याला attend करावं, appreciate करावं जेणेकरून ते मुल आनंदी राहायला शिकेल आणि इतरांना आकर्षित करण्यासाठी आपण आनंदी रहायला हवे हेच त्याच्या मनात ठसेल. आपल्या आस-पास असे कित्येक लोकं आपण पाहतो जे सतत आक्रस्ताळे असल्यासारखे वागत असतात, हट्टी आणि दुराग्रही असतात. त्याचं कारण मुळात हेच असतं कि ते लहान असतांना त्यांनी शांतपणे सांगितलेलं कोणी ऐकलेलं नसतं. आपण सांगितलेलं ऐकलं जात नाही याचा वारंवार प्रत्यय येऊन त्यांचा ईगो दुखावतो. ती लोकं जेंव्हा मोठी होतात, भावनिक नाट्य करूनच त्यांना आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवण्याची सवय लागते. आयुष्यभर मग ते लोकं आपलंहि रक्त जाळतात अन इतरांसाठीसुद्धा जगणं नकोसं करतात.”

“तू आणि तुझं तत्वज्ञान..” हसत हसत स्वानंदी चहाचा कप उचलून किचनकडे निघाली..

वि.रा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: