मी पाहिलेला…. दंगल

पुस्तकं आणि चित्रपट या माझ्या नेहमीच्या हरवण्याच्या जागा. त्यांच्यात शिरलो कि मी माझा ऊरत नाही. कालच दंगल पहिला. आमीर खानचा चित्रपट म्हंटल्यावर अपेक्षा साहजिकच भरपूर होत्या आणि त्या अपेक्षांना तो चित्रपट पूर्णपणे उतरला. काय सांगतो हा चित्रपट आपल्याला? आपण चित्रपट जिथे संपतो तिथून उलटे पाहत येऊ…..

geeta-phogat-1439968930-800

  • मशीन नव्हे तर मिशन आपल्याला जिंकून देत असते: – गीता का जिंकली? ज्या कोण्या प्रतिस्पर्ध्यांना तिने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंड दिले ते तिच्यापेक्षा चांगल्याच वातावरणातून आलेले होते आणि गीता गरीब परिस्थितीतून. म्हणजेच त्या सर्वांकडे जिंकण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची भरपूर रेलचेल होती. तरीही, ते हारले आणि गीता जिंकली. कारण तिच्याकडे ध्येय होते. फायनल मॅचच्या आदल्या रात्री ती जेंव्हा वडिलांना विचारते कि आता स्ट्रॅटेजी काय असावी. तिचे वडील त्यावेळी जे काही बोलतात ते खूप महत्वाचे आहे. ते तिला पुन्हा एक नवीन मिशन (ध्येय) देतात ज्यामध्ये केवळ मेडल मिळवणे हा हेतू नसतो. ज्या स्त्री-जातीचे प्रतिनिधित्व ती करत असते त्या समस्त स्त्रीत्वाला सिद्ध करण्यासाठी ते तिला प्रेरित करतात. ध्येय असे असते. कुठल्याही तंत्रापेक्षा आणि कुठल्याही स्ट्रॅटेजीपेक्षा जास्त प्रभावी असते. मेडल्स आणि पुरस्कार तर फक्त निमित्त झाले.
  • अंतिम ध्येय नजरेत असले कि मार्ग निघत जातात:- महावीर सिंग फोगट जेंव्हा आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण द्यायचे ठरवतात, त्यांची पत्नी विचारते, “खर्च लागेल. पैसे कुठून येतील?” त्यांचे उत्तरं असते, ”माहित नाही.”यशस्वी लोकांचे जीवन जर आपण पाहिले तर हि गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि सुरुवातीला त्यांच्या नजरेत फक्त अंतिम लक्षच होते. ते कसे साध्य होणार याची त्यांनाही कल्पना नव्हती. होती ती फक्त ईच्छाशक्ती आणि पयत्न जी त्यांना मार्ग दाखवत गेली. ध्येय असते पण कसं साध्य होईल ते माहित नसणे हीचं महत्वाची पायरी असते आणि इथेच आपण बऱ्याचदा थबकतो. पुढे काय होईल माहित नसल्याने आपण प्रयत्न सोडून देतो आणि ते ध्येय त्यानंतर केवळ एक ईच्छा बनून राहते.
  • फक्त ध्येय असून भागत नाही, ध्येयासक्तीही आवश्यक असते: गीताने जेंव्हा NSA ला प्रवेश घेतला, तिथल्या वातावरणात तिच्यात बदल झाला. ध्येय तेच होतं मात्र ध्येयासक्ती मंदावली होती. लहान बबिता जेंव्हा NSA मध्ये येते त्यावेळी तिला कॅम्पसमधून फिरवतांना गीता जे वाक्य बोलते त्याकडे लक्ष द्या, “ये कॅन्टीन, यहां हम पेलके खाते है. और ये TV  रूम.. यहां हम फैलके TV  देखते है” हि तिची वाक्ये ऐकून आणि निवांतपणे नखांना पेंट लावत बसलेली तिला पाहून बबिताच्या सर्व लक्षात येते. तिचा फोकस हरवलेला असतो. परिणाम सुद्धा दिसू लागतात. तिची विजयी घौडदौड अडखळायला लागते. याचा अर्थ, बाकी काही करू नये असा नक्कीच होत नाही. परंतु, यशस्वी होण्यासाठी फक्त आणि फक्त ध्येयाचाच विचार सतत करणे आवश्यक असते. हात कोणत्याही कामात असोत, डोक्यात मात्र कसं जिंकायचं हा एकच विचार हवा. जिथे हा विचार हरवतो, यश दूर जाऊ लागते.     Steve Jobs ने Mac कॉम्पुटर बनविण्यासाठी एक बिल्डिंग किरायाने घेतली होती आणि जो पर्यंत कॉम्पुटर तयार होत नाही, त्याच्या एका टीमला टार्गेट देऊन त्याच बिल्डिंगमध्ये बंदिस्त करून ठेवले होते. त्यानंतर बनलेल्या       Macintosh कॉम्पुटरने १९८० च्या दशकात एक नवीन पर्व सुरु केले.
  • कितीही क्षमता असली तरी मार्गदर्शक हवाच:- एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिकवण्याचे नाकारल्यावर त्याने त्यांचा पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचे धडे घेतले. शिष्याला गुरुचे महत्व सांगावे लागत नाही. आपल्यात कितीही क्षमता असो, गुरुविना ती पूर्णत्वाला येत नसते. म्हणून प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आयुष्यात चांगल्या गुरूचा शोध कधी ना कधी घेतलेला असतोच. गुरु कसा नसावा आणि कसा असावा याचे सुंदर चित्रण दंगल मध्ये येते
  • गुरु कसा नसावा:- NSA चा coach स्वतःच एका हारलेल्या मनोवृत्तीचे द्योतक असतो. कमीत कमी 3 तरी       मेडल्स हवेत हे त्याचे टार्गेट म्हणजे किमान ससा तरी हाती आला पाहिजे या विचारसरणीचा एक मनुष्य. ज्याचे       स्वतःचेच ध्येय इतके कमजोर आहे तो इतरांना आयुष्यात काय उभारी देऊ शकणार? त्याची खांदे पाडून होणारी शारीरिक हालचाल आणि तणावाच्या क्षणांमध्ये ढासळत जाणारी मनःशांती पुन्हा-पुन्हा हेच सुचवत असते कि तो मार्गदर्शक नसून फक्त एक पोटार्थी आहे आणि चुकून त्या जागेवर नेमण्यात आलाय. जिंकायचं असेल तर त्याचं ऐकून चालणार नाही हे जेंव्हा गीताला कळते तेंव्हाच ती पुन्हा जिंकू लागते. आपल्यालासुद्धा आयुष्यात असे खूप लोकं भेटतात जी आपल्या नैसर्गिक उर्मिपासून आपल्याला दूर नेऊ लागतात. त्यांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून दूर राहायला शिकायला हवे. (हे पात्र बहुदा काल्पनिक किंवा रंगवलेले दिसते)
  • गुरु कसा असावा: जो आयुष्यापेक्षाही मोठे ध्येय आणि संकटात नेहमी धैर्य देतो तोच खरा गुरु. आपल्या क्षमता आणि उणीवा यांची त्याला पूर्ण जाणीव असते. कोणत्याही परिस्थितीत ध्येयापासून विचलित न होऊ देता तो आपल्याला फुलवत असतो. तो आपल्याला नेहमीच आणखी थोडं चांगलं कर असं सांगत असतो. त्याच्यासाठी जिंकणं म्हणजे फक्त पुरस्कार नसतो तर आपल्याला आणि आपल्या निमित्ताने स्वतःला सिद्ध करणं हा त्याचा  मुख्य हेतू असतो. त्याची प्रत्येक शिकवण आपल्या नसानसातून भिनत जात असते. तो मित्र, नातेवाईक किंवा प्रिय-व्यक्तीच्या रूपातही भेटू शकतो.
  • प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक जण ध्येयासाठीच काम करत असतो:- (हे खूप महत्वाचे आहे) गीताचा चुलत भाऊ, खरंतर एक पुरुष होता. त्याने जर कुस्ती लढायचे ठरवले असते तर त्याला घरातून आणि समाजातून पाठिंबाच भेटला असता. किंबहुना, तितका त्रास आणि अपमान नक्कीच सहन करावा लागला नसता जितका गीता आणि बबिताला झाला. परंतु, आपल्याच बहिणींना कुस्ती शिकत असलेले पाहून आणि त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार राहूनसुद्धा तो कुस्तीगीर होऊ शकला नाही. कारण त्याच्याकडे ध्येयच नव्हते. तो केवळ त्यांना मदत करत राहतो. साथ देत राहतो. शेवटच्या क्षणी तर तो महावीर सिंगजी सोबत दिल्लीला जाण्यासाठी स्वैंपाक करायची तयारी दर्शवितो. ध्येय नसलेल्या माणसाला आयुष्यात काय काय करावे लागते याचे हे मार्मिक उदाहरण म्हणावे लागेल.

ज्याच्याकडे ध्येय असते तो स्वतःसाठी काम करत असतो आणि ज्याच्याकडे नसते तो इतर कोणाच्या ध्येयासाठी काम करत असतो. आपलेही तसेच असते. एकतर आपण आपल्या ध्येयासाठी काम करत असतो अन्यथा त्याच्यासाठी, ज्याने काही ध्येय समोर ठेवून एक कंपनी उभी केलेली असते. पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकच जण ध्येयासाठीच काम करत असतो..

तुमचे मत जरूर कळवा….

वि रा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: