भावबंधपट

“एक ब्लॅक कॉफी.” ऑर्डर करत राजीव खुर्चीवर बसला. “समजते काय स्वतःला? च्यायला झक मारली अन लग्न केलं” स्वतःशीच पुटपुटत राजीव काचेतून बाहेर बघू लागला. तितक्यात त्याच्या जवळून एक स्त्री चालत गेली अन त्याच्या समोर असलेल्या टेबलजवळ जावून घुटमळली; कोणीतरी ओळखीचं असल्याचा तीला बहुदा भास झाला होता. तिने चमकून मागे पहिले अन ती जवळ-जवळ किंचाळलीच, ”माय गॉssड, राजीssव. तू राजीवच ना?”

राजीव उठून उभा राहिला, “सरिता….. राईट? व्हाट अ सरप्राईज? तू पुण्यात कधी आलीस?”

सरिताने मनसोक्त हसली. “हा हा हा, आले तुला शोधत. काय म्हणतोस, कसा आहेस?….” सरिताने त्याच्या दंडावर थोपटत विचारले आणि सरळ त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली.

“तशीच दिसते आहेस अजूनही. काहीच बदल नाही झाला.” राजीव

“बदलायला मी मोबाईलचा प्री-पेड प्लान आहे का? मी अशीच राहणार.” सरिताने एक डोळा मिचकावीत राजीवकडे क्षणभर पाहत विचारले.

“पण काय रे, तू किती बदललास? जीम पण  बंद केलेली दिसतेस?” फिरकी घेण्याच्या उद्देशाने तिने प्रश्न केला

“जाऊ दे, तू इथे कशी ते सांग? कोण कोण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्या ग्रुपपैकी?” राजीवने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

“कोणीच नाही. सगळे ऑऊट ऑफ नेटवर्क आहेत. इतक्या दिवसांनतर भेटलेला तू पहिलाच. पण काय रे एकटाच का बसलाय? या, किसीका इंतेजार हो रहा है? एsss, मी जाऊ का?” सरिताने पुन्हा डोळा मारला.

“स्वभावसुद्धा बदलला नाही अजून. लग्न वगैरे?” राजीव.

सरिता मोठ्याने हसली. “वगैरे तर खूप केलं पण लग्न नाही केलं अजून. का नाही केलं ते नको विचारूस प्लीज? खूप लोकांना याचे एक्स्प्लेनेशन देऊन थकली आहे मी. बावळटपणा नुसता.” सरिता एकदम बोलायचे थांबली. राजीव उजव्या हाताच्या तळव्यावर चेहरा टेकवून तिचं बोलणं ऐकत होता.

“बोल बोल. बरोबर आहे तुझं. बावळटपणा तर खरच आहे. आणि मी तो केला आहे.” राजीव हातातला ग्लास फिरवत बोलला.

“हम्म, सगळेच करतात तो बावळटपणा, तू एकटा बावळट नाहीये. सो डोन्ट फील बॅड.” सरिता हसून बोलली.

“काय करतेस हल्ली? अजून हि खूप जण मरत असतील तुझ्यावर; हो ना?” राजीव.

“मी एका अॅडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर आहे. जे माझ्यावर मरायचा प्रयत्न करतात त्यांना मी कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लावून हलाल करते.” गळ्यावरून बोट फिरवत गळा कापण्याचा अभिनय करत सरिता म्हणाली.

“Anyways, पण तू असा हलाल झाल्यासारखा का दिसतो आहेस? खरं सांगू, तुला इतक्या वर्षानंतर असा पाहून …यू नो? काही प्रॉब्लेम आहे का? नौकरीत ठीक सुरु आहे सर्व?” सरिता.

“ठीक आहे.. सर्व ठीक आहे.” राजीव.

“एक विचारू?” हातातला कप गोल फिरवत सरिताने विचारलं.

“मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस. मी एकटा का बसलो होतो? हेच ना?”.

“अं, हो. म्हणजे, थोडं विचित्र वाटते आहे. सर्व ठीक असं जर तू म्हणतोस तर मग?” सरीता.

काही वेळ शांततेत गेला. “रोज थोडी फार कुरबुर सुरु असते. तुला तर माहिती आहे मला वाद घातलेले आवडत नाहीत पण वाद सोडून दुसरं काहीच नसतं सध्या आयुष्यात. म्हणून इथे येऊन बसलो होतो.  म्हटलं थोडावेळ निवांत बसावं.” राजीव काचेतून बाहेर पाहू लागला पण पुन्हा लगेच म्हणाला, “जाऊ दे, माझं होत राहील. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. दुसरं काहीतरी बोलू.”

सरिताने काही क्षण त्याच्या डोळ्यांमध्ये बघितले. नंतर थोडंसं हसली. “नाही ठीक आहे. मला आवडेल तू तू डिस्कस केलंस तर. माझं विचारशील तर मला आधीपासूनच लग्नाची क्रेझ नव्हतीच कधी. पण मला असं वाटतं कि लग्नाला घेऊन आपल्याकडे लोकं खूप इमोशनल असतात. डोळसपणे नात्याकडे पाहत नाहीत.” सरिता.

“डोळसपणा दोघांनीही दाखवावा ना सरिता. एकाने डोळस वागायचे आणि दुसऱ्याने त्याचेच डोळे फोडायचे असं कसं चालेल?

“बरोबर आहे तुझं” सरिता थोडंसं खाकरत पुढे म्हणाली, “आपण किती दिवस रिलेशनशिप मध्ये होतो रे?” कॉफीचा कप हातात घेऊन सरिताने गालाला लावला.

तिचा हा लडिवाळ अंदाज त्याला अनपेक्षित होता. “तरी पाच-साडे पाच वर्ष. असं का विचारते आहेस?”  राजीव सावध झाला.

सरिता मोठ्याने हसली. “घाबरू नकोस, मी तुझ्यावर डोरे नाही टाकत आहे. मदत करते आहे. आता मला सांग किती वेळा भांडायचो आपण?”

“फार नाही. आपल्यात विभागणीच तशी होती. जे तुला कळायचं त्यात मी बोलत नव्हतो अन जे मला कळायचं त्यात तू बोलत नव्हतीस. तुझीच तर अट होती ती.” राजीवचा चेहरा जुन्या आठवणींनी उजळला. त्याला उत्साहाने बोलतांना पाहून सरिताला बरं वाटलं.

“घर सुद्धा असंच चालवायचं असतं राजीव. माझं लग्न नक्कीच झालेलं नाही आणि तुझा नेमका प्रॉब्लेम काय हेहि मला माहित नाही पण मी तुला एक उपाय सुचवते.. भले आपण याला एक खेळ किंवा एक activity म्हणूया हवं तर. तुला त्याचा नक्की फायदा होईल. या activity चे नाव आहे,   “भावबंधपट.” राजीवला मिस्कील हसतांना पाहून ती थांबली.

“खेळ? खेळ खेळून कधी नाती टिकतात?” राजीवच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्न होता.

“का नाही? नात्याचा खेळ होण्याआधीचं जर हा खेळ शिकून घेतला तर कोणतंही नातं टिकणं शक्य आहे असं मला वाटतं. तुला माहिती आहे राजीव, कोणतीही कंपनी ग्राहकांशी असलेले नाते टिकून राहावे म्हणून रिलेशनशिप मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स फॉलो करत असते. घरातली रिलेशन्स मात्र आपण खूप अविचाराने हाताळतो. त्यात फक्त इमोशनॅलिटी आणतो.” सरिताने पॉज घेतला परंतु राजीवची उत्सुकता ताणलेली पाहून ती लगेच पुढे बोलू लागली. “भावबंधपाट हा तीन शब्दांचे संक्षिप्त रूप आहे. भावना-बंधन-पट. यात करायचे काय तर दोघांनी महिन्यातून एकदा समोर बसायचे.

महिन्याभरात झालेल्या गोष्टींबद्दल, घटनांबद्दल, वागणुकीबद्दल तुला जे म्हणायचे आहे त्यातल्या एका एका मुद्याला हात घालायचा आणि जो काही राग, संताप आणि टीका आहे ती एकाने करायची आणि दुसऱ्याने शांतपणे ऐकून घेऊन मग आपल्या वागण्यामागचा हेतू काय होता ते समजून सांगायचे.

म्हणजे असं कि तुला तिच्या एखाद्या कृतीचे वाईट वाटले आहे आणि तो मुद्दा मांडून तू तुझी भावना व्यक्त केली. त्यावर मग ती त्यावेळी असं का वागली, तिच्या मनात काय उद्देश होता हे तुझ्या बायकोने तुला पटवून द्यायचे. त्यावर पुढे कोणती भूमिका रास्त होती, तिने घेतलेली कि दुसरी एखादी भूमिका घेता आली असती यावर चर्चा करायची.

त्यानंतर मग पुढचा मुद्दा मांडायचा. आणि हो, तिने जर काही चांगलं काम केलं असेल तर ते पण तू नमूद करायचंस. त्यानंतर तिची टर्न. आता ती एक एक मुद्दा घेऊन तिच्या भावना व्यक्त करेल. तुला तुझी भूमिका स्पष्ट करावी लागेल.

थोडक्यात, एकाने भावना व्यक्त करायच्या, दुसऱ्याने react किंवा over-react न होण्याचं बंधन पाळून आपली भूमिका मांडायची आणि शेवटी कोणती भूमिका योग्य असू शकते हे एकाने दुसऱ्याला  पटवून द्यायचे. असा हा खेळ आहे. आणि खेळाचे दोनच नियम आहेत, पहिला, आपले सबंध सुधारावे किंवा चांगले व्हावे असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनीच हे करावे आणि दुसरा म्हणजे जेंव्हा एक जण आवाज चढवतो, रागात येतो, राग व्यक्त करतो; तेंव्हा दुसऱ्याने शांत राहण्याचे बंधन पाळायचे. एका वेळी एकालाच रागावण्याची परवानगी मिळेल. दोघेही एकाच वेळी रागात बोलू  शकत नाहीत.” सरिता थांबली.

राजीवच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते आणि तो मोठ्या मुश्किलीने दाबून धरत होता. पण शेवटी त्याला रोखणे अशक्य झाले आणि तो जोरजोरात हसू लागला. सरिता मात्र शांत होती.

“आय अॅम सॉरी.” राजीव पुन्हा मोठ मोठ्याने हसू लागला. त्याने हसू दाबायचा प्रयत्न केला पण पुन्हा त्याचा भडका उडाला आणि तो परत हसू लागला.

“बघ, मी म्हणाले होते ना, फक्त इमोशनॅलिटी. मी काय म्हणते आहे याचा डोक्याने विचारही न करता तू नुसता हसतच सुटलास.” राजीव दोन्ही होट एकमेकांवर दाबून शांत राहायचा प्रयत्न करत होता.

मी तुला मदत होईल असे काही मनापासून सांगते आहे आणि तू मात्र हसून माझी टिंगल करतो आहेस. मला याचा राग येईल असे तुला नाही वाटत? सरिताने गंभीर झाल्याचे नाटक केले. राजीवच्या मनात चर्रर्र झालं. “please, don’t. Don’t be angry. तुझी टिंगल करायचा माझा हेतू नव्हता सरिता. फक्त तू सांगितलेला उपाय मला थोssssडासा हास्यास्पद वाटला पण …..anyway.” राजीव ला पुढे काय बोलावे हे समजेना.

हेच ते असते राजीव. तू मला हसत नाही आहेस तर मी सुचवलेल्या एका विचारावर हसतो आहेस हे मी समजू शकते म्हणून मला तुझा राग येणार नाही. एवढी एकच समज नातं फुलवायला पुरेशी असते. कोणत्याही नात्यामध्ये एखादी गोष्ट, एखादा प्रसंग वा एखादी कृती तेवढी आपल्याला आवडलेली नसते. याचा अर्थ ती पूर्ण व्यक्ती आपल्याला आवडत नाही असे होत नसते. ती न आवडलेली गोष्ट कोणती एवढे समजून घ्यायला आणि समजून सांगायला वाव मिळावा इतकंच काय ते महत्वाचं असतं. मी सुचवत असलेल्या activity चा हाच उद्देश आहे.

“राजीव, कस्टमर फीडबॅक मिळवण्यासाठी कंपन्या सर्वेवर लाखो रुपये खर्च करत असतात. इथे फुकट मिळणारा घरातला फीडबॅक आपण धुडकावून लावतो आणि आपल्यात आवश्यक असलेल्या सुधारणेचे आपणच मार्ग अडवून धरतो असं नाही वाटत तुला?” सरिता.

“कस्टमर फीडबॅक?” राजीव पुन्हा हसू लागला. “सरिता, अगं इगो, अहंकार, मूड स्वीन्ग्स हे काही असतं कि नाही? इतकं सरळ कोण…….?” राजीव पुन्हा थोडासा हसला. “oops, sorry.” त्याने तोंडावर बोट ठेवले.

“माहिती आहे मला डियर. गेल्या बुधवारी मी आई-बाबांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस केला. तो वाढदिवस कसा साजरा करायचा यावर दिवस संपला तरी त्याचं एकमत झालं नाही. शेवटी मी माझ्या पद्धतीने मला हवा तसा साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसा सारखा वैयक्तिक प्रसंग साजरा करण्यावर तुमचं एकमत होऊ शकत नाही? तेही ५० वर्ष सोबत राहिल्यानंतर? अहंकार आणि मूड जे काही तू म्हणतो आहेस त्याची पूर्ण कल्पना आहे मला राजीव. ते मी रोजच घरी अनुभवत असते. खरं सांगायचं तर, आई-बाबांकडे पाहूनच मला लग्न करण्याची मनापासून ईच्छा होत नाही.” सरिता एकटक राजीवकडे पहात होती.

“तरीही तू हे गृहीत धरतेस कि जी थेरपी तू सांगत आहेस ती कोणी ऐकेल? थोडंसं मेकॅनिकल नाही वाटत हे?” राजीवने तिला वाईट वाटणार नाही अश्या पद्धतीने चाचरत विचारले.

“घटस्फोट कधी घेतो आहेस?” सरिताने थेट त्याच्या डोळ्यात बघत प्रश्न केला.

“काय?” घटस्फोट?” राजीव जवळजवळ उडालाच. सरिता थोडंसं हसली.

“राजीव, ५० वर्ष झालीत माझ्या आई-बाबांच्या लग्नाला. एकहि दिवस असा नाही गेला ज्यादिवशी त्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतलं नसेल. तिनं काही केलं तर बाबांना ते आवडणार नाही अन त्यांनी केलेलं तिला कधी खपत नाही. पण गमतीचा भाग म्हणजे त्यांनी कधी एकमेकांना सोडलं नाही. कोणीच सहसा सोडत नाही. तू पण सोडणार नाहीस. फार तर फार तू इथे कॅफेमध्ये येऊन बसशील किंवा ती काही दिवस माहेरी जाऊन बसेल. पण रिलेशन इम्प्रूव्ह कसं होईल ते मात्र तुम्ही कधी विचारातच घेणार नाही, हो नं? खरच कमाल आहे यार. लोकं सोसायटीतल्या गार्डनमध्ये जाऊन लाफ्टर-क्लब चालवतात, तिथे कृत्रिम हसतात. ते त्यांना मेकॅनिकल नाही वाटत; परंतु थोडेफार प्रयत्न करून आपल्या माणसांसोबतचे रिलेशन जर इम्प्रूव्ह केले, रोज उठसूट टीका करण्यापेक्षा त्यासाठी ठराविक वेळ ठरवून इतर वेळी संयमाने प्रयत्नपूर्वक खेळकर वातावरण घरात राहिलं असा प्रयत्न केला आणि टीकेला सकारात्मकतेने घेऊन जर एकमेकांच्या अपेक्षांना खरे उतरण्यासाठी थोडे कष्ट घेतले आपले घरच लाफ्टर-क्लब होऊ शकते. हे मात्र मेकॅनिकल वाटते.” सरिता त्याच्याकडेच एकटक पहात होती.

राजीव थोडा गांगरला. काही वेळ शांत राहिला.

“सरिता, सोसायटीतला लाफ्टर-क्लब जॉईन करायचं हे एकट्याने ठरवता येते आणि अंमलबजावणी पण होऊ शकते, इथे तू म्हणतेस त्यात दोन लोकं आले. एकाने जरी तसं करायचं म्हंटलं तरी दुसऱ्यानेही ते तितकं सिरीयसली घ्यायला नको का?” राजीवने तोकडा प्रतिकार सुरूच ठेवला होता.

“म्हणूनच तर नियम आहे कि ज्यांना रिलेशन सुधारावे असे वाटते त्यांनीच हे करावं. अरे, अहंकार किंवा मूड जे काही तू म्हणतो आहेस ते जर थोडा बाजूला ठेवला तर किती चांगली चर्चा होऊ शकते. कोणत्या परिस्थिती आपण कसे वागलो? आपण कसे वागू शकलो असतो? एकाच प्रसंगाचे वा उद्गाराचे किती अर्थ निघू शकतात, आपण आपल्याच माणसाला केंव्हा, कसं आणि किती दुखावलं होतं याची जाणीव त्या चर्चेतून होऊ शकते. हळूहळू आपल्या विचारांमध्ये इतरांना जमेत धरून आपण वागू लागतो. आपल्या विचारप्रक्रियेत परिपक़्वता येते.  आपल्या जोडीदाराला अपेक्षित असलेले बदल आपल्यात घडून येऊ लागतात. संवाद आणि चर्चा वाढीस लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली प्रतिक्रिया महिन्यानंतर द्यायची असल्याने कित्येक अश्या गोष्टी, ज्या खरंतर प्रासंगिक भडका उडवणाऱ्या असतात त्या मागे पडतात. फक्त महत्वाच्या गोष्टीच तेवढ्या लक्षात राहतात. रोज होणारी कुरबुर हळूहळू कमी होऊ लागते.

तुला माहिती आहे राजीव, आजच्या युगातली सर्वात ज्वलंत समस्या कोणती आहे? आपल्या विचारांना, भावनांना ऐकणारा कोणीच नाही आहे हि जी जाणीव प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे, ती खरी समस्या आहे. म्हणून प्रत्येकानेच आपल्या प्रत्येक नात्यात “ऐकून घेण्याची” सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. आपल्याला ऐकणारी व्यक्ती आपल्या आसपास आहे केवळ हि एक जाणीव अर्ध्या समस्या सोडवते. शेवटी ज्याच्यासोबत आयुष्य काढायचेच आहे त्याला समजून घेणं आणि आपल्या मनात काय आहे हे त्याला समजावून सांगणं हे प्रयत्नपूर्वक करायलाच हवं, नाही का?” सरिताने घड्याळाकडे पाहिले…. “अरे बापरे ! चल, उशीर होतो आहे. निघायला हवे.” सरिता उठली, तसा राजीव उभा राहिला. पुन्हा कधी भेटता येईल याचा तो विचारच करीत होता तोपर्यंत काउंटवर दोघांचे बिल देऊन सरिता बाहेरसुद्धा पडली. राजीव तिला जातांना काचेतून पाठमोरी पाहत तसाच उभा होता.

गोष्ट आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीला share करायला विसरू नका.

विरा !!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: