प्लास्टिकची फुलं

“संध्याकाळी ऑफिसतर्फे पार्टी आहे. ठीक ६.३० ला तयार राहा, मी आलो कि लगेच निघूया आपण,” रंजनचा मेसेज वाचून अनिच्छेनेच राधा तयारीला लागली.

“किती वेळा सांगितले याला, ऐकतच नाही माझं,” नाराजीच्या सुरात पुटपुटत बराच वेळ ती आरशासमोर बसून होती. घरातला आरसा तिचा जीवलग मित्र होता. ती अधून-मधून  त्याच्याशी बोलायची, मनात उठणारे तरंग त्याच्यासमोर उलगडायची.

“आदर्श पत्नी  आहेस ना तू?  मग पतीच्या मनासारखं करायला नको का?” आवाज ऐकून राधा दचकली, तिने इकडे-तिकडे पहिले, पण कुणीच नव्हतं.

“राधा, अगं मी बोलतोय, तुझा मित्र, तुझा आरसा.” राधाने चमकून आरश्याकडे पहिले.

 “तू रोज माझ्याशी बोलत असतेस. म्हंटलं चला, आज मी बोलतो. काय गं, काय झालं?  जाण्याची ईच्छा नाही रंजन सोबत?” आरश्याने विचारले.

“मग का जाते आहेस?” तिची नकारार्थी हललेली मान पाहून त्याने पुन्हा विचारले.

“रंजनला काय वाटेल असा विचार करते आहेस, बरोबर ना?” आरसा हसत हसत म्हणाला.

“तूला काय झालं हसायला?” राधाने फणकाऱ्याने विचारलं

“तुला नाही हसलो, पण तुमच्या समस्त मानवजातीचं एक आश्चर्य वाटतं मला…” एवढं बोलून आरसा थांबला.

“अच्छा?  नेमकं कशाचं आश्चर्य वाटतं तुला? कळू तर दे.”  एक भुवई वर उचलून धरत राधाने विचारलं.

“रागाऊ नकोस प्लीज हं. नथिंग पर्सनल. अगं, ईतकी प्रगत जमात तुमची; तरीही सर्व आयुष्य तुम्ही कोड्यात जगता. सर्वकाही तुम्हाला समजते असं आयुष्यभर म्हणत असता तरी जगतांना किती चुका करता तुम्ही, याचं आश्चर्य वाटतं मला.” आरसा गंभीर होत म्हणाला.

राधा गोंधळली, “किती चुका करता तुम्ही?” या प्रश्नावर रेंगाळली.

तिची मनस्थिती लक्षात आल्याने थोडं सविस्तर बोलावं लागेल असा विचार करून आरसा म्हणाला, “मला सांग, आपण कसे दिसतो हे पहायचे असते म्हणून तुम्ही मानव आरश्यात बघता. बरोबर? तुमची प्रतिमा मी तुम्हाला दाखवतो. तशीच आणखी एक गोष्ट तुम्ही लोकं आयुष्यभर शोधत असता, ती म्हणजे स्व-प्रतीमा आणि तेहि इतरांच्या डोळ्यात, त्यांच्या नजरेने.” आरसा हाताची घडी घालत म्हणाला.

“स्व-प्रतिमा?” राधा विचारात पडली.

mirror
इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहणे कधीही शक्य नाही….

“हो मग. आपल्या आवती-भवतीचे लोकं आपल्याबद्दल काय विचार करत असतील किंवा त्यांच्या मनात आपली इमेज कशी असेल याचा विचार म्हणजेच हि स्व-प्रतिमा (self-image). समज येऊ लागते त्या वयापासूनच तुम्ही याबाबतीत जागरूक होता. ज्यांना तुम्ही जवळचे मानता, त्या लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं किंवा निदान वाईट म्हणू नये असा प्रयत्न करतच मोठे होता. परंतु, वास्तविकता काय आहे राधा? इथे प्रत्येक जण तुमच्या केवळ गुणांवरून तुमची पारख करीत असतो का? बव्हंशी तर तो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती यशस्वी आहात आणि तुमच्या achievements किती आहेत यावरून तुमची किंमत ठरवत असतो. मग तुमची किंमत त्यांच्या नजरेत वाढावी यासाठी मात्र फरफट सुरु होते. तुम्ही स्वतःचं मन मारून इतरांना चांगलं दिसावं आणि त्यांना चांगलं वाटावं म्हणून स्वतःच्याच मनाविरुद्ध जगत राहता. कधी आपल्या छंदावर पाणी सोडता तर कधी आवडते करियर  सोडून आयुष्यभर दुसराच काही तरी काम-धंदा करीत राहता. काहीही करण्याआधी इतरांचे मत घेणं आणि तुम्हाला प्रिय असणारी गोष्टंसुद्धा इतरांना काय वाटेल असा विचार करून टाळणं म्हणजेच तुमचा निखळ आनंद त्यागणं, आयुष्यभर आपलं “स्व”त्व सोडून तुमचं हे असं वागणं आश्चर्यच आहे मुळी. आता हेच बघ ना, कलीग्सला वाईट वाटू नये म्हणून रंजनने तुला मनाविरुद्ध पार्टीला नेणं आणि रंजनला काय वाटेल असा विचार करून तुझंहि ईच्छा नसतांना तिथे जाणं हा तुमचा स्व-प्रतिमा जपण्याचाच प्रकार नाही आहे का राधा?” आपले खांदे उडवीत आरसा म्हणाला.

राधा शांत बसून होती. तिच्याकडे उत्तरं नव्हतं. ऑफिसमध्ये आपली इमेज जपण्यासाठी सुरु असलेला रंजनचा खटाटोप तिला चांगला माहिती होता. पटत नसलं तरी तिला मनाविरुद्ध वागावं लागत होतं ज्याचा तिला बरेचदा त्रासच व्हायचा.

“हे तर असच असणार. यावर उपाय काय? असाच विचार करते आहेस ना?” तिच्या मनाची घालमेल आरशाने ओळखली. राधाने उसासा टाकत मान डोलावली.

“तुम्ही प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झाकून आपलं स्वत्व शोधायला हवं. प्रत्येक गोष्टीबाबत तुमचं एक ठराविक  मत असतं, तुमची भूमिका असते. तोच तुमचा “स्व” असतो. प्रत्येक गोष्टीसाठीची तुमची आवड-निवड त्या त्या “स्व” मधून तुम्ही व्यक्त करीत असता. असे अनेक “स्व” मिळून तुमचा एक “भाव” तयार होत असतो, तोच तुमचा “स्वभाव” असतो. तुमचं वागणं त्या स्वभावाला अनुसरून असायला हवं. मूळ स्वभावाऐवजी जर स्व-प्रतिमा जपण्याला प्राधान्य दिलं तर तुमचा फोकस बाह्य जगावर केंद्रित होतो. इतरांनी आपल्याला यशस्वी म्हणावं किंवा चांगलं म्हणावं यासाठी स्वभावाविरुद्ध जाऊन वागत राहणं शेवटी दुःखाला निमंत्रण देणारंच ठरतं. ते टाळता यायला हवं. पटत नसतील त्या गोष्टी नाकारता यायला हव्यात. परंतु, त्यासाठी आधी स्वतःची ओळख होणं गरजेचं असतं. स्वतःची ओळख पटल्यानंतर आपण घेतलेली प्रत्येक भूमिका तुमची एक नवी ओळख निर्माण करत असते, ती ओळख मग चिरकाल टिकते आणि कुठल्याही टीकेला तोंड द्यायला समर्थ असते. त्याउलट, स्व-प्रतिमा जपत राहणं आणि इतरांच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी स्वतःशी तडजोड करणं हि आयुष्यभराची फसगत आहे. स्व-प्रतिमा तेवढी जपायची असं ठरवलं असतं तर सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय,  रं.धो. कर्वे यांना आयुष्यात काहीच करणं शक्य झालं नसतं. लोकांनी त्यांना उभ्या हयातीत कधीच चांगलं म्हंटलं नाही आणि त्या लोकांनीही कधी लोकांची पर्वा केली नाही कारण त्यांना स्वतःची पुरती ओळख होती.” राधाच्या मनाचा ठाव घेत आरसा बोलायचं थांबला.

“मलाही रंजनचं वागणं कधी-कधी आवडत नाही. करियरसाठी किती सलगी करावी माणसाने? पण त्याला नकार द्यायला मन धजावत नाही माझं. शेवटी तो घरासाठीच तर  करतो आहे” राधा अजूनही विचारात पडलेली होती.

“मान्य आहे. पण तुझ्या मनाविरुद्ध वागून तुला हे सगळं पाहिजे आहे का हा प्रश्न आहे. तुझं उत्तर तर मला माहिती आहे. पण रंजनला हे सर्व आवडतं का? त्याने माझ्यासमोर कधी मन मोकळं नाही केलं त्यामुळे त्याचा मला तितकासा अंदाज नाही आला अजून.” आरश्याने तिच्या गोंधळात आणखीन भरच टाकली.

“नाही रे. तो खूप साधा आहे. पण हतबल आहे. बरोबरीचे सगळे पुढे निघून गेले. त्यांच्याकडे आज चांगली पोझिशन आहे, चांगलं घर आहे, बॅंक-बॅंलन्स आहे, प्रत्येकाकडे कार आहे. हे सर्व जर पाहिजे तर तडजोड करावीच लागणार, महत्वाच्या लोकांना खूष ठेवण्यासाठी स्वभावाला मुरड घालून काही गोष्टी कराव्याच लागणार असच बोलतो नेहमी.” राधाने निराशेचा उसासा टाकला.

“अशी निराश होऊ नकोस राधा. महत्वाकांक्षा असणं वाजवी आहे परंतू त्यासाठी स्वतःशीच तडजोड…? स्वतःपासूनच विलग होऊन इतरांशी स्वतःला कसे जोडू शकणार आहात तुम्ही? शिवाय स्टेटस आणि पोझिशन म्हणजेच सर्व काही आहे का? तुमचं पर्सनल लाईफ बाजूला ठेवून सतत काम आणि कामाची लोकं इतक्यातच जर तुम्ही स्वतःला सीमित करून घेतलंत तर ते स्टेटस मिळूनही काय फायदा? कोणाच्या उपयोगात येणार आहे ते? तुम्ही तर आयुष्यभर इतर लोकांच्या पुढे-पुढे करण्यात दंग असणार कारण ज्या मार्गाने ते मिळवलं त्याच मार्गाने ते टिकवाव पण तर लागेल. असं मिळवलेलं स्टेटस प्लास्टिकच्या फुलांसारखे असतं, दुरून दिसायला सुंदर आणि टवटवीत मात्र जवळ गेलं कि साचलेल्या धुळीचा कोंदट वास नाका-तोंडात जायला लागतो. आरसा पुढे  बोलायच्या तयारीतच होता ईतक्यात लॅचकीने दरवाजा उघडून रंजन आत आला. राधाची काहीच तयारी नाही हे पाहून वैतागून म्हणाला, “हे काय राधा? तू तर अजून तयारच नाही झालीस?”

“रंजन, मी काय म्हणते? मी नाही आली तर नाही का चालणार? माझी तब्येत ठीक नाही आहे रे.” राधाने नेहमीसारखा तोकडा प्रयत्न करून पहिला.

“राधा, राधा. माझे सगळे कलीग्स फॅमिलीसहित येतात. तू आधीपण १-२ वेळा नाही आलीयेस. तू नेहमी असं करशील तर माझे कलीग्स काय म्हणतील? त्याना उगाच वाटेल आपलं काहीतरी बिनसलं आहे म्हणून… ते काही नाही.. झटपट तयार हो बघू, लगेच निघू आपण.” रंजन चेंज करण्यासाठी बेडरूमकडे जात म्हणाला.

राधाने आरश्याकडे वळून पाहिले…..पार्टीतल्या बायकांचे नाटकी हास्य, एकमेकींना गळाभेट देऊन कोणी काय दागिने घातले ते हेरणारी त्यांची बारीक नजर, जन्मापासूनच आपण कसे ब्रँडेड आहोत हे दाखवण्याचा प्रत्येकीचा अट्टाहास… राधाला आरश्यात साफ दिसत होते. आरसा मात्र  गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत होता.

मित्रांनो, गोष्ट कशी वाटली ते जरूर कळवा… आणि आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका…

वि.रा…!

2 thoughts on “प्लास्टिकची फुलं

 • January 31, 2017 at 6:52 pm
  Permalink

  Each function which had some meaning before now has become prestige issue. Be it religious event or some national day. Recently we had Sankranti /pongal. Before it was like meeting all old friends and giving any small plastic thing as token of gift. But it has turned to an event calling office staffs, arranging snacs and giving some so called useful gift. But the affection is no where seen. All like plastic flowers with artificial scent.
  Great going.

  Reply
  • February 1, 2017 at 2:53 pm
   Permalink

   very true dear. Personal touch is missing… we are becoming victims of our endless desires… hence, it becomes necessary to stop and find ourselves first before committing to anything new.. thank you for your comment..share this on your fb

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: