तुमच्याकडे काय आहे, करिअर कि जॉब?

               काही दिवसांपूर्वी “धोनी – द अनटोल्ड स्टोरी” पाहिला. छोट्या शहरातला एक छोटासा मुलगा, ज्याचं जगही छोटंसच होतं. शाळा, खेळ आणि आपलं कुटंब यापलिकडे फारसं काहि माहीती नसलेलं. तब्येत ठिक नसतांनाहि आपले वडिल रात्री ११ ला जाऊन काम करत आहेत हे पाहुन आयुष्यातल्या खडतरतेच अंदाज घेणारं त्याचं वय. परिस्थितीची समज येऊ लागणारा कोणताहि मुलगा अशा वेळी काय विचार करतो? खुप अभ्यास करुन चांगली नौकरी पकडावी,  खूप मोठं व्हावं, आई-बाबांना सुखात ठेवावं वगैरे वगैरे. परंतु माहीची ऊर्मी काही औरच होती, खेळ त्याचा जीव की प्राण होता. खेळण्यातून जे समाधान मिळत होते त्याची तुलनाच होऊ शकत नव्हती. मात्र वडिलांची ईच्छा होती की मुलाने सरकारी नौकरी करावी. कारण आपण जसे कुढत-कुढत मन मारून जगत आहोत, आयुष्याला सपशेल शरण गेलो आहोत आणि पैशांअभावी जसे छोट्या छोट्या आनंदाला मुकतो आहोत तसे माहीच्या बाबतीत होऊ नये. छोटा माही जेंव्हा सचिनचे एक Poster विकत घेतो, तेंव्हा पैसे खर्च झाल्याचे वडिलांना झालेले शल्य बरेच काही बोलुन जाते. अशा घरात मुलाने लवकर शिकुन पायावर ऊभे रहावे, घराचा भार ऊचलावा अशी अपेक्षा यथोचितच होती. माहीसुद्धा वडिलांची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. ईथपर्यंत सर्वकाही तसेच वाटले जसे बहुतांश घरांमध्ये घडते, तुमच्या आमच्यासोबत घडते. फरक जो जाणवला तो मात्र यानंतर. वडिलांच्या ईच्छेखातर म्हणुन माही शिकत राहिला, एक एक वर्ग पुढे सरकत राहिला, परंतु त्याने खेळ सोडला नाहीं. त्याची आंतरिक ऊर्मी जी त्याला सतत सांगत होती की माही, खेळणं ही एकच गोष्ट आहे जी तू खुप चांगली करु शकतो. तू फक्त खेळत रहा. खेळणं तुझा ध्यास आहे कारण खेळ हाच तुझा श्वास आहे.

                     माही आणि आपल्यात फरक तो ईतकाच की माहीने अंतर्मनातून येत असलेल्या आवाजावर लक्ष्य केंद्रित केले. तो खेळत राहिला, त्याचा खेळ आणि वडिलांचे स्वप्नं यांदरम्यान अथक-अविरत पळत राहिला. खेळ आयुष्याला कुठे घेऊन जाणार हे माहीती नव्हतं. खेळण्यातले सातत्य टिकवण्यासाठी लागणारी साधनं नव्हती. होता तो फक्त ध्यास. वेडच म्हणाणा हवं तर. पण त्या वेडासाठी धावता धावता माहीचा महेंद्रसिंग धोनी झाला. कित्येक मानसन्मान, पैसा, प्रसिद्धि आज त्याच्या पायाशी लोळण घेते आहे.  एका यशस्वी कप्तानाची कारकिर्द गाजवुन वयाची चाळिशी ओलांडायच्या आतंच माही रिटायर सुध्दा होऊन जाईल. याच्या अगदी उलट सांगायचे झाले, तर कित्येकजण चाळिशीच्या ऊंबरठ्यावरहि अस्वस्थ असतात. आयुष्याची दिशा ठरवत असतात. कमाई जरी चांगली होत असेल तरी काहिसे ऊदास असतात. त्यांच्याकडे जॅाब असतो पण करियर नसते. कारण फक्त जॅाब असुन भागत नाही, जॅाब satisfaction सुद्धा हवं असतं तरच  करियर घडतं. असे करियर नसलेले मित्र जेंव्हा-कधी भेटतात, त्यांचा संवाद ठरलेला असतो, ” बोर झालोय यार, लाईफ कुठे घेऊन जाते आहे तेच कळत नाही. असं वाटतं काहितरी करायला पाहिजे”, कित्येकदा चर्चा करुनहि “काहितरी” म्हणजे काय ते मात्र समजतच नाही. “काहीतरी” चा शोध अखंड सुरु राहतो पण हाती काहिच लागत नाही. लागेल तरी कसे? अंतर्मनाचा आवाज आपण कधी ऐकतच नाही. खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. एखादा छंद असतो, काही आवड असते. आपल्या प्रत्येकाकडे असं काही तरी नक्कीच असतं जे करतांना आपण सुखावत असतो, तहान-भूख विसरत असतो.  प्रत्येकाकडे असं “काहितरी” असतं जे तो ईतरांपेक्षा नक्कीच चांगलं करु शकतो. समज येऊ लागण्याच्या वयात आपल्याला ते खुणावू लागतं, अंतर्मनातुन त्याची ओढ लागते. अन त्याच दरम्यान घोळ होतो. आपण विनाकारण वेळ वाया घालवत आहोत अशी ओरड सुरु होते. जबरदस्तीने अभ्यास करण्यासाठी बसवले जाते. इतर काहीहि करण्यावर बंदी येते कारण दहावीची परीक्षा तोंडावर आलेली असते. बहुतेकांचे करिअर याच वळणावर संपते. दहावी झाली कि लगेच बारावीची परीक्षा असते. त्या तीन वर्षात आपण आपला आवाज खोलवर दाबून टाकतो, आपले व्यक्तिमत्वच बदलून जाते. पुढे काय करायचे आहे ते घरात कोणीतरी ठरवलेलं असतंच. अशाप्रकारे आपलं सोडून इतरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सिद्ध होतो, दिशाहीन पळत सुटतो.

                       दहावी/बारावी चे मार्क्स खरंच इतके महत्वाचे असतात का? डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणजेच करिअर असते का? पोगो चॅनेल वरच्या हारुण रॉबर्टला पहिले आहे कधी? कागदाच्या तुकड्यांपासून वेगवेगळे आकार घडवत  कित्येक मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे त्याने. ते सर्व जेंव्हा तो करत असतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत असतो त्या आनंदाला दहावीच्या मार्कांशी कसं जोडता येईल. नवनिर्मितीसाठी असलेला त्याचा ध्यास अभ्यासक्रमात कधी समाविष्टच होऊ शकला नसणार. पुस्तकात पाहून जमले असते तर खूप सारे रॉबर्ट तयार झाले असते. पण एकच रॉबर्ट का, तर त्याने त्याचा आतून आलेला आवाज ऐकला, जसा माही ने ऐकला होता. म्हणून रॉबर्टकडे आज करिअर आहे आणि त्याचा “काहीतरी” चा शोधहि संपलेला आहे कारण तो जे करतो त्यातून त्याला कमाई तर होतेच आहे पण समाधान सुद्धा मिळते आहे. तसच एक उदाहरण म्हणजे अच्युत पालव. कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व. पुस्तकातली अक्षरं वाचता वाचता त्या अक्षरांमधले निरनिराळे आकार त्या माणसाला खुणावू लागले आणि आज अच्युत पालवेंनी लिहिलेली अक्षरे अख्या जगाला वेड लावत आहेत. याला अभ्यासक्रमात कसे बसवायचे? माझा एक मित्र आहे. स्वभावाने शांत, आदरातिथ्याचा आवड असलेला. त्याला नवीन ओळखी करण्याचा आणि  फिरण्याचा भारी शौक. त्याने स्वतःची एक कंपनी सुरु केली. बऱ्याच कंपन्या दरवर्षी मीटिंगसाठी वेगवेगळी ठिकाण निवडत असतात. तिथे 50-100 लोकांची 4-5. दिवसांसाठी व्यवस्था करण्याचे काम हा मित्र मिळवतो. त्यांना ठिकाण शोधून देण्यापासून, सर्वांची बुकिंग, येण्याजाण्याची व्यवस्था, मुक्काम दरम्यानच्या सोयी-सवलती सर्व काही तो बघतो. पैसा तर मिळतो आहेच पण त्याची फिरण्याची हौस पण तो भागवतो आहे. त्याला नक्कीच आयुष्यात पोकळी जाणवत नसणार. कारण त्याच्याकडे करिअर आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे चाकोरी सोडून काहींनी आपल्या मनातले “काहीतरी” ऐकले. दिवस-रात्र कष्ट उपसले आणि यशाच्या शिखरावर पोहोचले.

                      मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक उद्देश असतो, आणि तो उद्देश बऱ्याचदा आपल्या आवडीमध्ये, छंदांमध्ये किंवा आपल्याला अवगत असलेल्या कलेमध्ये दडलेला असतो. कोणी वक्तृत्वपटू असतो, कोणी छानसे लिखाण करतो, कोणी छान गातो तर काहींच्या शरीरात नृत्य दडलेले असते. काही जणांना खाद्य पदार्थाची चव इतकी तंतोतंत कळते, कि ते लोक त्या पदार्थामधली  उणीव अचूक सांगू शकतात. या व अशा अनेक गोष्टी आहेत ज्याभोवती करिअर गुंफता येऊ शकते. गरज असते ती आतला आवाज ऐकण्याची, आपल्यातल्या कलेला ओळखण्याची. आपलं असं “काहीतरी” शोधून जर त्यावर मेहनत घेतली, नैपुण्य मिळवले तर आपण आयुष्यात लवकरच उंची गाठतो. पैसे आणि प्रसिद्धी तर मिळतेच परंतु जे अपार समाधान मिळते त्याची इतर कशाशी तुलनाच होऊ शकत नाही. कारण करिअर म्हणजे फक्त पैसे मिळवणे कधीच नसते. ते आपल्याला पडलेले एक गोड स्वप्न असते. त्या स्वप्नाचा पाठलाग करतांना आपल्याला आपल्या अस्तित्वाचा आणि एकूणच आपल्या जगण्याचा अर्थ कळत असतो.

                     थोडक्यात सांगायचे तर जॉब हे केवळ “उपजीविकेचं” साधन असते तर करिअर हीच आपली मुख्यजिवीका असते. पण  उपजिवीकेभोवती घिरट्या घालत आपण आयुष्य जगत असतो. उपजिविकेलाच आयुष्य समजून बसतो. जॉब तर सुरु राहतो परंतु सतत एक पोकळी जाणवत राहते. आणि मग आधी सांगितल्याप्रमाणे आपण सतत “काहीतरी” शोधत राहतो. प्रोमोशन्स  मिळतात, पैसासुद्धा मिळतो परंतु समाधान मिळत नाही. कधी वाटते जॉब बदलावा. कधी वाटते फील्डच बदलावे. एक अपूर्णता सतत पाठलाग करत राहते. कारण उद्देश सापडत नाही. आपण काय आणि कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. तुम्ही जर Rock-On part-1 पहिला असेल, तर त्यातली पात्रे आठवून बघा, ते सर्वच जण   आपापल्या आयुष्यात settled होते. तरीहि आनंदी नव्हते, कारण त्यांची श्वासाची नाळ music शी जोडलेली होती पण प्रत्यक्षात मात्र ते music पासून कोसों दूर होते. ज्या क्षणी त्यांनी सर्व झुगारून देऊन वाद्ये हातात घेतली, त्यांच्या आयुष्यातला आनंद परतला. मित्रांनो, पैसा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्यामुळे फक्त पैश्यासाठी काम करत राहणं यात आनंद तो कसलाच नाही. यातून बाहेर पडायचं असेल तर रोज स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवत चला. आपली आवड, आपला छंद जोपासा. हळूहळू त्यामध्ये नैपुण्य मिळवा. तुमच्या छंदाशी निगडित छोटे छोटे उपक्रम करून त्यातूनच अर्थार्जन कसे करता येईल याचा विचार करा. तुम्हाला जे आवडते त्यातूनच जर तुम्ही पैसे कमवू शकले तर त्यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? त्यावेळी तुमच्याकडे जॉब नाही तर करिअर असेल.  मात्र ज्या प्रेरणेने तुम्हाला जन्म दिला आहे ती प्रेरणा जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत असं भटकणं ठरलेलं हे हमखास…आणि हो, असं भटकणं निदान आपल्या मुलांच्या वाटेला येणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी..

विरा… !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: