तीचा वॅलेंटाईन

१४ फेब्रुवारीची सकाळ

तो: (ऑफिसमध्ये जात असतांना)
मस्तsss! आज १४ फेब्रुवारी, जगभरातल्या प्रेमिकांच्या उत्साहाला उधाण आणणारा हा दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काय घेऊ अन कुठे घेऊ याच्या उजळणीत कित्येक दिवस घालवून, घेतलेले गिफ्ट देतांना आपल्या प्रियेसीच्या चेहऱ्यावरचे बोलके भाव टिपणारा हा दिवस. काय अनुभूती असते ना ह्या प्रेमाची?
कित्येक लोकांनी कित्येक प्रकारांनी प्रेमाचे वर्णन केले आहे तरीही प्रत्येकाचे प्रेम अनोखे असते, जगावेगळे असते. त्या प्रेमाची सुरुवातच अशी काही हुरहूर लावते कि भले-भले चक्रावून जातात. वय-स्थळ आणि काळ निरपेक्ष असलेले हे प्रेम प्रत्येकाला आपल्या मधुर रसात न्हाऊ घालत असते. माझे हि असेच झाले. कधी आणि कसा तिच्याकडे ओढल्या गेलो ते कळलेच नाही.  मग काय? केले लव्ह मॅरेज. आज आमचा पहिलाच वॅलेन्टाईन. म्हणून एक हिऱ्याचा हार तिच्यासाठी मी घेतला आहे. सकाळी तर तिला समजूच दिले नाही मला आजचा दिवस लक्षातहि आहे म्हणून. पण, लोच्या फक्त एकच आहे….. मी दिवसातून हजार वेळा तिच्यासमोर आपलं मन व्यक्त करतो. आणि ती? ती मात्र कायम अबोलच? कधी तरी तिने आपले मन बोलून दाखवावे ना? ठीक आहे, १४ फेब्रुवारीला आपण सोबतच दिवस घालवू असे ती मागे कधीतरी म्हणाली होती, पण ऑफिसचे पण पाहावेच लागणार ना? पूर्वी असं होत नव्हतं, पूर्वी ती कित्ती कित्ती बोलत होती म्हणून सांगू… हल्ली मात्र तीssssss. काय झाले असावे बरं याssss र?

१४ फेब्रुवारीची सकाळ

ती: (ऑफिसमध्ये जात असतांना)

खरचं नात्यात तो मोकळेपणा, जिवंतपणा, प्रेम आणि आपलेपणा असतो? पुस्तकात वाचायला मिळतो तर कधी काव्यांमधून भेटतो परंतु, अनुभव? आयुष्यातला अनुभव तर वेगळेच काही सांगत असतो.

दोन वेगवेगळ्या मानसिकतेची, वैचारिकतेची, भिन्न परिस्थितीतुन आलेली माणसं खरंच एकरूप होऊ शकत असतील? नाहीच मुळी. ही केवळ स्वप्नवत बाब आहे.
एकाच्या ह्रदयात उठलेली कळ दुस-याला नाही जाणवत हेच अंतिम सत्य.
यंत्राच्या साहाय्याने कागदावर उमटणारा ह्रदयाचा ईसीजी आलेखच बघा ना…  तो आलेख खरेतर भावनांची उलथापालथ दाखवत असतो जी मनातूून होणारी असते. यंत्राला जे मन इतकं अचूक समजतं, ते मन समजून घेणं, हे आपल्याच जवळच्या इतर व्यक्तींसाठी खरंच इतकं कठीण का असतं? पंचेंद्रियाचे ज्ञान असलेल्या मानवी बुद्धीला सहावं इंद्रिय (मन) सुद्धा ज्ञात आहे असं म्हणतात. स्वत:च्या प्रत्येक व्यवहाराचा संबंध प्रत्येकक्षणी मनाशी जोडणारा मनुष्य दुस-याचे मन समजून घेताना मात्र सोयीस्करपणे सावध होतो. का होत असेल असे?
खूूूप साधं सरळ उत्तर आहेे…
कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये एकरुपता तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते दोघेही भावनिकदृष्ट्या समपातळीत असतात. जन्माला येतांना तर मनुष्य प्रेमस्वरुप, आत्मानंदी असतो. मात्र हळूहळू त्याला आप-परकेपणाची लागण होते आणि स्वतःच्या गरजेपलीकडे इतर कशाचीही त्याला किंमत वाटेनाशी होते. माणसा-माणसामध्ये आपणच तयार केलेले हे भेद, मग ते स्त्री-पुरुष असो, गरीब-श्रीमंत असो, श्रेष्ठ-कनिष्ठ असो किंवा इतर काही असोत. हे वैचारिक भेदच मग आपल्यासम असणा-या इतर माणसाला समजून घेताना अडथळा करतात. भावनांना समजून घेण्याची समरुपता हे भेद कधीच येऊ देत नाहीत. केवळ इतकेच नाही तर कधी आपण इतरांच्या भावनांना कुस्कारत आहोत, रक्तबंबाळ करत आहोत याचं साधं भान हि येऊ देत नाहीत. स्वत:ला बुद्धीवादी म्हणवणारे आपण कधी आपल्याच प्रेमाच्या माणसांना गमावतो हे ही न कळण्याइतपत उच्च बौद्धीक पातळीवर आपण पोहचतो. निसर्गातील इतर सजीवांकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की त्यांच्यात त्यांच्यात मात्र असा काही भेदभाव नाही. त्यांना बुद्धी नाही असं तर आपण म्हणतो परंतु  प्रत्यक्षात हे प्राणीच खरंतर निसर्गाचा, प्रेमाचा सुंदर अविष्कार म्हणवता येतील. निसर्गाने त्यांना अशा काही प्रेमाने ओतप्रोत भरुन सिद्ध केलेय  की ख-या प्रेमाची जादू ते किती सहज  अनुभवतात. प्राण्यांचे स्पर्शज्ञान ,गंधज्ञान, आवाजातून एकमेकांना सावरण्याची भावना, व्यक्त होणारे प्रेम  माणसांकडून बोलून व्यक्त केल्या जाणा-या प्रेमापेक्षा श्रेष्ठच म्हणावे लागेल.
वनस्पतींना भावना असतात हे सिद्ध करणारा हि मानवच ना? वनस्पतींच्या भावना जपणारं माणसाचं मन मात्र आपल्या सहवासातल्या माणसच मन नाही जाणू शकत याला काय म्हणावंं? मुक्या प्राण्यांकडून बोलण्याची अपेक्षा असणारे आपण, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि एवढेच नाही तर त्याने एखाद्या शब्दाला जरी हलकासा प्रतिसाद दिला तर त्याचे उर भरुन कौतुक करणारा माणूस सहवासातल्या आपल्याच माणसाचं रुदन करणाऱ्या बोलाला प्रतिसाद मात्र देत नाही. तेव्हा प्रेमानं बोलणारं मन काय बोलतं किंवा आक्रंदनारं मन काय बोलतं या सर्वांना काय अर्थ उरतो?
 प्रत्येक भावनेच्या मुळाशी एक गरज असते. ती गरज व्यक्त करण्याचे सुंदर साधन म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेला भावनांचा अनमोल ठेवा. प्राणी न बोलताही त्या भावनांना प्रतिसाद देतात आणि आपण मात्र शब्दांचे खेळ खेळू लागतो.
“अगं मग सांगायचे ना? मला कसे कळणार? मी अंतर्ज्ञानी आहे का?”, ह्म्म्म… (एक उसासा टाकून)
यंत्राला सजीवावस्था देउन आणि त्यातहि भावना ओतण्याच्या तयारीत असलेले आपण हे का नाही जाणू शकत आहोत की कुठलीही भावना ही केवळ त्या क्षणाची जिवंत अनुभूती असते. त्या क्षणाची संवेदना अनुभवणारादेखील मला नाही वाटत शब्दात वर्णू शकत असेल. ज्याक्षणी भावना जन्म घेते त्या क्षणांमधली हृदयाची धडधड आणि मनाची तगमग फक्त ह्रदय आणि मन जाणतं.  तो क्षण शब्दातीत असतो आणि म्हणूनच कोणतीही भावना फक्त अनुभूतीपुरतीच उरते. कदाचित प्रत्येक गोष्टीला शब्दबद्ध करणारा माणूस ह्याचा अनुभव मुक्तपणे घेऊ शकत नाही हे दुर्दैवी आहे.

वास्तविक प्रेम हा शब्दच असा जादूई आहे की केवळ उच्चारला तरी स्वर्ग दोन बोटे उरतो. परंतु, प्रेमाची  अंर्तबाह्यानुभूती जितकी विलक्षण तितकेच प्रेम समजायलापण कठीण. ज्या प्रेमाला अनुभूतीतून जगायचे असते त्या प्रेमाला शब्दांमध्ये बांधण्याचे विफल प्रयत्न माणूस आयुष्यभर करत राहतो.

 

तो म्हणतो हल्ली तू बोलतच नाहीस . अरे माझ्या राजा, शब्द निर्जीव असतात रे. त्यांना भावना जिवंत करते. भावनांना प्रत्येक वेळी शब्द लागतातच असं नाही. त्या भावनांकडेच मुळात दुर्लक्ष करणाऱ्या मनुष्याला जिवंत प्रेमाचा अनुभव कसा घेता येईल? भावनेची तीव्रता संवेदनेनं जगायची माझी उर्मी. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस असे केवळ तोंडाने बोलून नाही तर त्याचा आपल्या देहबोलीतून प्रत्यय देऊन व्यक्त व्हायला मला आवडते. म्हणूनच कदाचित प्राणी मोकळेपणाने, उच्च पातळीचे, सळसळणारे प्रेम अनुभवत असतात, वनस्पतीसुद्धा सैर प्रेम जगतात कारण ते फक्त अनुभवतात…. माणसांसारखं शब्दकोडी नाही जगत. हे मी तुला कसे सांगू?

 

आणि वॅलेंटाईनचेच म्हणशील तर ज्या दिवसापासून प्रत्येक जण आपल्या आसपासच्या प्रत्येकाच्याच भावना ओळखू लागेल, मग ते आई-वडील असोत, बहीण-भाऊ असोत, पती वा पत्नी असो कि मित्र असो.  स्वतःच्या पलीकडे जाऊन तो जेंव्हा त्यांना प्रतिसाद देऊ लागेल, तो प्रत्येक दिवस माझा वॅलेंटाईन असेल….; भेटू संध्याकाळी सोन्या…..

 

काय कशी वाटली कथा? मित्रांनो तुमच्या ग्रुप मध्ये बऱ्याच लोकांना हि गोष्ट नक्की आवडेल.. वलयांकित एक समूह आहे.. आणि तो मोठा व्हायला हवा, तेंव्हा ग्रुप मध्ये शेअर करायला विसरू नका..

वि.रा.!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: