तथास्तु !

मागच्या दोन लेखांमध्ये आपण पाहिले की यश मिळवण्याची ईच्छा आणि त्याला अनुसरून होत असलेला आपला स्वतःशी संवाद आपल्याला यशाकडे नेत असतो. पण ते प्रत्यक्षात  कसं होतं, त्यासाठी आपल्याकडे अशी काय सिद्धता असते ते आज आपण येथे पाहु. त्यापूर्वी, १९५० च्या दशकात घडलेली हि एक सत्य-घटना वाचा.

ऑलंपिक स्पर्धांसह शारीरिक खेळांचा ईतिहास सुमारे २५०० वर्षांचा आहे. या सर्व खेळांमध्ये एक लोकप्रिय प्रकार आहे तो म्हणजे १ मैल धावण्याची शर्यत. गेल्या २५०० वर्षांमध्ये कोणताही स्पर्धक १ मैल धावण्यासाठी जो वेळ घेई तो साधारण ४ मिनिटांपेक्षा जास्तच असे. ४ मिनिटाच्या आत १ मैल अंतर कोणीही पार करू शकले नव्हते. त्यामुळे, असा एक समज रूढ झाला होता कि १ मैल अंतर धावून पार करायला कमीत कमी ४ मिनिटे लागतातच.

१९५० च्या दशकात एक ब्रिटीश धावपटू, रॉजर बँनिस्टर ते अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी धडपडत होता. त्याच्या या प्रयत्नाबद्दल त्याला सर्वांकडून काय ऐकायला मिळाले असेल याचा अंदाज लावणं फार कठीण नाही. “अरे, कसं शक्य आहे? हजार वर्षांत हे कोणी केलेले नाही. तू कशाला उगाच आतडे पिळवटून घेतोस? दुसरा एखादा विक्रम कर हवं तर” वैगेरे वैगेरे. असे सल्ले त्याने नक्कीच ऐकले असणार. परंतु, त्याचे मन काही मानत नव्हते. सरतेशेवटी, त्याने हे आव्हान म्हणून स्विकारले आणि ४ मिनिटाच्या आत १ मैल अंतर पार करेलच असा निश्चय केला. त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरु झाले. कठीण सरावाला त्याने सुरुवात केली. धावण्याच्या शारीरिक क्रियेचा आणि त्यावर प्रभाव टाकणाऱ्या कित्येक पैलूंचा जसे हवेचा प्रतिरोध, धावतांना शरीराची होणारी हालचाल ई.चा त्याने बारकाईने अभ्यास केला. कठीण सरावानंतर ६ में १९५४ रोजी त्याने १ मैल धावण्याची शर्यत पूर्ण केली तीसुद्धा ३.५९.४ मिनिटामध्ये.  तुम्ही जर गुगल केले तर त्याविषयी तुम्हाला वाचायला मिळेल. कित्येक लोकांनी त्याच्या या यशाबद्दल आश्यर्य व्यक्त केले कारण २५०० वर्षात असे कधी घडलेले नव्हते. पण आश्चर्य हे नव्हतेच मुळी. आश्चर्य म्हणावे असे तर त्यानंतर घडले. त्याच्या रेकॉर्डच्या केवळ ४६ दिवसांमध्ये दुसऱ्या एका धावपटूने त्याचाही रेकॉर्ड मोडला आणि ३.५७ मिनिटामध्ये १ मैल पार केले. जे गेल्या २५०० वर्षांमध्ये अशक्य मानल्या गेले होते ते रॉजर बँनिस्टरने करून दाखवल्यावर ४६ दिवसांमध्येच दुसरा कोणी त्याच्याही पेक्षा चांगलं कसं करू शकला? रॉजर बँनिस्टर मेडीकलचा विद्यार्थी होता. त्याने धावण्याचा शास्त्र-शुद्ध अभ्यास केला होता आणि म्हणून त्याचे यश अपवादात्मक होते असे आपण एक वेळ समजू परंतु पुढच्या ४६ दिवसांमध्ये धावण्याची अशी कोणती वेगळी technique तयार झाली होती? आणि  त्यानंतर मात्र हा रेकॉर्ड तोडणाऱ्यांची रांगच लागली. पुढच्या ३ वर्षात तर १५-१६ धावपटूंनी एकमेकांचे रेकॉर्ड मोडीत काढत आणखी कमी वेळात ते अंतर पार केले. काय कारण असेल? -इतरांना हे शक्य झाले कारण रॉजरने केलेले पाहून  “हे सहज शक्य आहे” असं त्यांना वाटलं. मात्र जे रॉजरने केलं ते काय होतं?  …. त्याने स्वतःच्या अमर्याद क्षमतांवर विश्वास ठेवला. आजपर्यंत झालं नाही म्हणून ते होऊ शकत नाही हा समज जो प्रत्येकाने त्याच्या आधी मान्य केला होता तोचं त्याने धुडकावून लावला.

      मित्रांनो, अभ्यास-सराव सर्व काही नंतर येते. त्याच्याही आधी येतो तो ध्यास असतो. आणि जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, तेंव्हा तो ध्यास पूर्ण करण्यासाठी आपल्या आतमध्ये निसर्गाने बसवलेली एक यंत्रणा आपलं काम सुरु करते जिचं नाव आहे Reticular Activating System (RAS).  याचे ज्ञान आपल्याला झाले तर आयुष्यात यश मिळवणे सहज शक्य आहे.

RAS नावाची  एक अतिशय सुसज्ज यंत्रणा आपल्या शरीरामध्ये आपल्यासाठी अव्याहतपणे काम करत असते. आपल्याला यश मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. तिच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. RAS आपल्या मेंदूचा भाग आहे. जिथे आपला पाठीचा कणा संपतो त्या जागेवर मेंदूच्या खालच्या भागाला हि यंत्रणा असते.  RAS तशी बरीच कामे करत असते. त्यातली काही अतिशय महत्वाची कामे पहा.

 • आपल्या जागृतावस्था आणि निद्रावस्था यांचा ताळमेळ घालण्याचे काम:-

शरीराच्या गरजेनुसार जागृत राहणं अथवा झोप यांदरम्यान आपली जी अवस्था बदलत राहते त्यावर RAS चं नियंत्रण संपूर्ण असते.

 • आपल्याला प्राप्त होणाऱ्या सर्व संवेदना चाळून-गाळून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवणे.

आपली इंद्रिये प्रचंड प्रमाणात माहिती मिळवत असतात. फक्त डोळ्याचंच बोलायचं झालं तर प्रत्येक सेकंदाला सुमारे ३०० मेगापिक्सल ईतकी दृश्य-माहिती आपले डोळे टिपत असतात. मिनिटाचा, तासांचा आणि दिवसाचा हिशोब लावणं केवळ अशक्य. तीच गत कान, नाक, त्वचा या ईतर इंद्रियांची. इतक्या प्रंचंड प्रमाणावर कित्येक माहिती इंद्रियांच्या माध्यमातून आपल्या मेंदूमध्ये   साठवल्या जात असते. या सगळ्याच माहितीकडे लक्ष द्यायचे ठरवले तर आपण लवकरच ओव्हर-लोडेड होऊन कोलमडून जाऊ. मग RAS तिथे एक महत्वाचं काम करते. प्राप्त होणाऱ्या सर्व माहितीला फिल्टर करून “फक्त आपल्यासाठी महत्वाच्या” असलेल्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करायला मदत करत असते. हेच आपलं “ध्यान”. ध्यान तिथेचं असते, जिथे आपले विचार असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण शाळा किंवा कॉलेजच्या वर्गात बसलेलो असतो, शिक्षक शिकवत असतात. त्यांचा आवाज कानापर्यंत तर पोहोचत असतो मात्र, ते काय बोलत आहेत ते समजत नसते कारण आपण मनाने “दुसरीकडे” असतो.

            तुम्ही कधी हे अनुभवलं असेल, जर आपण मित्राबरोबर रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहोत जिथे हळू आवाजात गाणे सुरु आहे आणि आजूबाजूला खूप लोकांचा बोलण्याचा आवाज आहे. आपल्याला तितकेच ऐकू येत असते जे आपला मित्र बोलत असतो आणि तेवढेच कळत असते. इतर आवाज म्हणजे आपल्यासाठी फक्त “गोंगाट” असतो. पण त्याच गोंगाटामधून जर कोणी आपलं नाव उच्चारलं तर लगेच आपल्याला ते ऐकू येतं. किंवा आपल्या आवडीच्या गायकाचं गाणं लागलं तर लगेच आपलं तिकडे लक्ष जातं. आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टीवर focus करायचे आणि त्याच वेळी महत्वाच्या नसलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे RAS चं एक काम. पण म्हणून आपल्याला इतर माहिती मिळणं बंद होत नसते. ती मिळत राहते फक्त आपल्याला माहित होत नाही. आपण आणि आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी RAS साठी अंतिम असतात. त्यामुळे जेंव्हा एखादी गोष्ट आपण सतत विचारात घेतो, तेंव्हा तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीकडे RAS आपलं ध्यान केंद्रित करत असते. जे आधी कधीही आपण नोटीस केलेलं नसतं ते आता आपल्याला नोटीस होऊ लागतं.

 • आपल्याला “हाय-अलर्ट” स्थितीमध्ये पोहोचवणे:-

RAS, पूर्णतः आपल्या belief-system वर अवलंबून असते. जे आपल्यासाठी खरं तेच तिच्यासाठी खरं, मग जग भलेही काहीही म्हणोत. तिथे किंतु-परन्तु नसतो. आपण ध्येय निश्चित करतो म्हणजेच अमुक एक गोष्ट आता आपल्यासाठी महत्वाची आहे असं स्वतःला सांगतो आणि त्या अनुषंगाने स्वतःला प्रश्न विचारू लागतो. योग्य प्रश्न विचारणं हेचं आपल्या विचारांचं (स्व-संवाद) काम आहे. त्यावेळी आपण focused असतो. हि यंत्रणा मग पुढचे काम सुरु करते. आपली सर्व इंद्रिये त्यासंबंधीची माहिती गोळा करू लागतात. आधी गोळा झालेली माहिती आठवायला लागते. उपयोगी पडतील असे काही संदर्भ, काही प्रसंग, काही व्यक्ती आठवायला लागतात. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सुचायला लागतात. कधी कधी खूप महत्वाचे काम करत असतांना आपण तहान-भूक विसरतो कारण ते याक्षणी महत्वाचं नाही आहे असं RAS ठरवते आणि आपल्याकडून तेवढंच करून घेते ज्या गोष्टींनी आपलं विचार-विश्व व्यापलेलं आहे. त्या गोष्टीसंबंधी आपण “हाय-अलर्ट” स्थितीमध्ये जातो.

success
यशाचे एकच रहस्य आहे…. एकाग्रता.

आपल्याकडे जमा असलेली आधीची सर्व माहिती (म्हणजेच स्मृती) आणि काय केले म्हणजे ध्येय साध्य होईल याचा सर्व अंदाज आपल्याला हि यंत्रणा देऊ लागते. थोडक्यात आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही आपल्यासमोर म्हणजेच वर्तमानात हजर होतात. रॉजर बँनिस्टरने जेंव्हा ४ मिनिटाच्या आत ते अंतर पार करायचं ठरवलं आणि ते होऊ शकतं असं स्वतःला त्यानं सांगितलं, तेंव्हा ते अंतर पार करण्यासाठी काय काय करावे लागेल याचे विचार त्याच्या मनात येत गेले. त्यानुसार तो प्रयत्न करत गेला आणि परिणाम आपल्या सर्वांपुढे आहे, २५०० वर्षांची परंपरा मोडीत निघाली.

      उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मानवाला अशा अनेक अनमोल देणग्या मिळालेल्या आहेत ज्यांचा वापर करून आपण आपली ध्येये साध्य करू शकतो. तेंव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. आधी कोणी केले नाही म्हणून तुम्ही कधी करू शकत नाही हा गैरसमज मनातून काढून टाका आणि कामाला लागा. यश फक्त तुमचे आहे.

तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते अवश्य कळवा. वलयांकितचा प्रत्येक लेख तुम्हाला तुमच्या अंतर्मनात घेऊन जाणार आहे, तेंव्हा समजून घ्या आणि तुमच्या आयुष्यात त्याचा कसा उपयोग करता येईल ते बघा. हा लेख तुमच्या जवळच्या व्यक्तींना share करायला मात्र विसरू नका.

वि रा…!

3 thoughts on “तथास्तु !

 • December 28, 2016 at 6:36 pm
  Permalink

  APRATIM……………

  Reply
 • December 29, 2016 at 1:53 pm
  Permalink

  Many of us were not knowing about RAS. Now after knowing that there comes a question, is RAS system works well in other countries than ours. In our society we have many things which distract us from knowing what we like and focusing on that. Where as in US or Europe, the required freedom is given to concentrate on what we want. A article on that will really be good to read. Cheers

  Reply
 • December 29, 2016 at 7:43 pm
  Permalink

  Really, very inspiring and intresting article.It will b useful for most of the people. Keep on writing. 👍

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: