ज… जगण्याचा !

माधवराव आय.सी.यु. च्या काचेतून वसंतकडे हताशपणे बघत उभे होते. 3 दिवसांपूर्वी त्याला ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता. थोडाजरी आणखी उशीर केला असतात तर मुलगा हातातून गेला असता हे डॉक्टरचे वाक्य पुन्हा-पुन्हा त्यांच्या कानात घुमत होते. ज्याच्यावर हळूहळू आपला भार आता टाकावा असं माधवराव मनाशी ठरवीत होते त्यालाच खांद्यावर उचलून हॉस्पिटलमध्ये आणावे लागेल असा त्यांनी कधी विचारहि केला नव्हता. तरीही आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत आनंदाने जगायचे असा मूळ स्वभाव असल्याने या प्रसंगाला ते मोठ्या धैर्याने सामोरे गेले होते. चष्म्याला न जुमानता त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माधवरावांनी चष्मा काढून मफ्लरने डोळे पुसले. रडण्यासाठीसुद्धा नशिबानेच सोबत मिळते असं काहीसं पुटपुटत ते आय.सी.यु. कडे पाठ करून बाकावर बसले. तोच समोर वैभव दिसला. “अरे वैभव, तू कधी आलास?” वैभवने पायाला हात लावला, “हा काय, येतोच आहे काका.” वैभव त्यांच्या शेजारी बाकावर बसत म्हणाला. माधवराव गहिवरले. वैभव त्यांच्या पाठीवरून हाथ फिरवू लागला. “कसा आहे वसू आता? काय म्हणतात डॉक्टर?” वैभव.

“आता ठीक आहे. अंडर कंट्रोल. चांगला रिस्पॉन्स दिला त्याने ट्रिटमेंटला. येईल लवकरच बाहेर असं वाटतंय.” माधवराव हाताची घडी घालून मागे पाठ टेकवून बसले.

“आम्ही ४-५ दिवसांखाली बोललो होतो, तोपर्यंत तर सारे ठीक होते. मग अचानक?”

माधवराव खिन्नपणे हसले. “दिलपे मत ले यार म्हणणारी जनरेशन तुमची. प्रत्येक गोष्ट मात्र मनाला लाऊन घेतल्याशिवाय एक दिवसही जगू नाही शकत. ऑफिसमधलं टेन्शन घरी घेऊन यायची सवय त्याला. मागच्याच आठवड्यात अप्रैजलचे रिझल्ट्स आले होते. वसंताला डावलून दुसऱ्याच कुणालातरी प्रमोशन दिलं गेलं. मग रोज चिडचिड.. सतत फोनवर लागलेला असायचा. शांतता म्हणून दिवसभरात अशी काही नाहीच. तुला कधी काही बोलला नाही तो?”

“हो, म्हणजे महिन्याभरापूर्वी याविषयी आमचं बोलणं झालं होतं, बॉसवर तो नाराजच वाटला. कामाला योग्य न्याय देत नाही असं सांगत होता. शेवटी ईतकी मेहनत करून त्याचं काही फळ मिळणार नसेल तर वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. स्ट्रगल किती करावा माणसानं?…” वैभव थांबला, माधवरावांची नजर शून्यात गेली होती. काही वेळ शांततेत गेला.

नजर तशीच शून्यात ठेवून माधवराव बोलू लागले, “वसंत १० वर्षाचा होता जेंव्हा त्याची आई गेली. घरून खूप आग्रह झाला होता पुनर्विवाहाचा. पण याला त्रास नको म्हणून मी ते कटाक्षानं टाळलं. मीच त्याची आई झालो. त्याला शक्य तितकं जपला, त्याचे रुसवे-फुगवे बापाच्या नजरेनं न घेता आईच्या ममतेने सहन केले. मी घर आणि ऑफिस यामध्ये झुलत राहिलो मात्र त्याला फुलवणं कधी सोडलं नाही. आणि खरं सांगू? मला हा कधीच स्ट्रगल नाही वाटला. आयुष्याचं देणं समजून मी प्रत्येक दिवसाला सामोरा गेलो. सर्व शक्तीनिशी मिळालेला हरेक रोल पार पाडला. तुम्हा मुलांची सहनशक्ती ईतकी कशी कमी झालीय रे आजकाल?”

“काका, तुम्ही फार जपलं आहे वसूला. आणि तुम्ही म्हणता तेसुद्धा बरोबरच आहे पण लाईफ खूपच अनसर्टन झालंय आजकाल. करियर खूप सिरीयसली घ्यावं लागतंय, नाहीतर मागे पडतो आपण. तुमच्यावेळी असं नव्हतं.” वैभव बोलून गेला.

माधवरावांनी हसण्याचा प्रयत्न करून पहिला पण डोळ्यातून अश्रूच ओघळले.. मोठ्या मुश्किलीने त्यांनी आवंढा गिळला. “करियर…, अनसर्टनिटी… स्ट्रगल.. एक सांगू वैभव? तुमची पिढी विचारांचं ग्लोरिफिकेशन करण्याच्या मागे लागली आहे. त्याचा हा परिणाम आहे. करियरचं म्हणशील तर आमच्यावेळीसुद्धा प्रॉब्लेम होते, शिक्षणाच्या संधी नव्हत्या, कसलं मार्गदर्शन नव्हतं, ठेचा आम्हीही खाल्ल्यात रे. दोन वेळेचं पोटभर जेवण मिळेल कि नाही हे निश्चित नसायचं, कसली अनसर्टनिटी घेऊन बसलात तुम्ही लोकं? आणि हो, स्ट्रगल- स्ट्रगल करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाने मनुष्य-जातीचा ईतिहास वाचलाच पाहिजे. अरे, जेंव्हा कसलीही हत्यारं नव्हती, आगीचा शोध लागलेला नव्हता, सर्वत्र हिंस्त्र श्वापदं हिंडत असायचे. एक छोटीसी चूक केली तरी मनुष्य जीवानिशी जायचा. अन्नासाठी वणवण भटकणं आणि त्याचवेळी स्वतःचा जीव वाचवणं हे जिकरीचे असायचे. अंधार पडायच्या आत ३०-४० फुट झाड पाहून त्यावर चढून रात्रभर बसून राहायचे. झोपेत तोल गेला तरी खेळ संपला. स्ट्रगलच म्हणशील तर खरा स्ट्रगल तर त्याकाळात होता वैभवा. आजच्या परिस्थितीत अपघात जर सोडले तर असा जिवंत राहण्यासाठी कितीसा स्ट्रगल आहे रे तुमच्या आयुष्यात? जीवानिशी जाण्याईतपत तर काहीच नाही आहे. मग तरीही इतकं ऊर फुटेस्तोवर का धावता आहात तुम्ही सर्व? हा स्ट्रगल आहे कि मृगजळ आहे याचा जराही विचार करत नाही आहात.” माधवराव बोलायचे थांबले. त्यांनी कपाळाचा घाम पुसला. त्यांना अजूनही बोलायचे आहे असे ओळखून वैभव शांतच राहिला.

“खूप वेळा वसंतासोबत माझी खडाजंगी झाली आहे. तो म्हणतो खर्च वाढतो आहे कारण महागाई वाढते. त्यानुसार ईन्कम वाढायला हवे आहे. किती हास्यास्पद आहे हे वैभव? महागाई आमच्यावेळी सुद्धा वाढतच होती. तरीही ईन्कम पुरायचे, नव्हे उरायचे. आता ते पुरतच नाही. केवळ महागाई वाढल्यामुळे नाही तर गरजा वाढवल्यामुळे. चुटकीसरशी वस्तू विकत घेत राहता. ना गरज पाहता ना उपयोग, आलं मनात कि घेतलं. कसा पुरेल रे पैसा? काय तर ईन्कम वाढायला पाहिजे. मग करा ढोर मेहनत” अस्वस्थ होऊन माधवराव उभे राहिले. काचेतून एकवार त्यांनी वसंताकडे पहिले. मग वैभवकडे वळून त्यांनी विचारलं, ” तुला तरी पटतंय का मी काय म्हणतोय ते?”

“पटतंय काका, परंतु सोबतचे मित्र सर्व पुढे निघून जाताहेत असं वाटतं, मग….होते तगमग.” वैभव.

“वैभवा, कोणाशी स्पर्धा का करावी? प्रत्येकाचा अंगभूत गुण वेग-वेगळा असतो. त्यानुसार येणारं यश हे मागे-पुढे होणारच बाळ. धडपड हवी तेवढी करा; पण नाही जमलं म्हणजे सगळं संपलं इतकं स्वस्त आहे का रे आयुष्य? हे वय आहे का हॉस्पिटलमध्ये असं निपचित पडून रहायचं? फार तर फार काय होईल? ज्याच्याशी तुम्ही तुलना करता आहात तो कुठेतरी १०० रुपयाचा चहा पिणार आणि तूम्ही दुसरीकडे १० रुपयाचा, शेवटी चहाच ना?” माधवरावांचा कंठ दाटून आला. वैभवने त्यांना खांद्याला धरून बाकावर बसवले. पाण्याचा ग्लास भरून दिला. एक दीर्घ उसासा टाकून माधवरावांनी कसंबसं एक घोट पाणी पिलं.

Hospital corridor bed

“पण याला अल्प-संतुष्टी नाही का म्हणायचे काका? आपण आपली हार मानायची, आपण आयुष्यात प्रगती नाही करू शकणार हे मान्य करायचे आणि मिळेल त्यात समाधानी राहायचे असेच झाले हे तर.” वैभवने मन मोकळं केलं.

“मोठी चूक करताहात मुलांनो. प्रगती म्हणजे प्रमुख गती, जी प्रत्येकाची वेग-वेगळ्या क्षेत्रात असू शकते. पण आपल्याला कुठे गती आहे हे न पाहताच फक्त नौकरी मिळवण्याच्या हेतून शिकायचं आणि दरवर्षी पगार वाढवा म्हणून ढोर-मेहनत करायची. पगार वाढला म्हणजे प्रगती झाली असे आहे का वैभव? मग नाही वाढला पगार कि टेन्शन घ्यायचे आणि हॉस्पिटलचा रस्ता धरायचा. ते मनमुराद जगणं, खळाळून हसणं, जवळच्या व्यक्तींना वेळ देणं यातलं काहीएक करायला तुमच्याकडे वेळच नाही मुळी.” तेवढ्यात वैभवच्या मोबाईलवर fb नोटीफिकेशनचा टोन वाजला. “काय आहे आजचं अपडेट?” माधवरावांनी विचारले.

“इथे आलोय ना, मित्र विचारत आहेत कसा आहे वसू?” वैभवने मोबाईल सायलेंटवर टाकला.

“किती सोईस्कर मार्ग आहे ना हा काळजी करण्याचा? स्पर्शाला रिप्लेस करता येऊ शकते कशाने?” माधवरावांनी वैभवच्या खांद्यावर हात ठेवला. “तुला एक सांगू वैभव, तू जे काही म्हणालास ना, करियर-स्ट्रगल वगैरे.. वगैरे, यासर्व खुळचट गोष्टींना खत-पाणी घालणाचं काम करत आहे ते तुमचं सुधारलेलं तंत्रज्ञान, तुमचे मोबाईल आणि तुमचे लॅपटॉप. या गोष्टींनी तुम्हाला नव्याने काही करण्याचे तंत्र तर दिले, मात्र तुमचे जगण्याचेच ताळतंत्र बिघडवले. इतक्या माहितीची गरज असते का रे आयुष्यात? प्रत्येक मिनिटाला नको ती माहिती, नको त्या स्वरुपात तुमच्या समोर येत राहते अन त्या प्रत्येक माहितीला तुम्ही आपल्या मेंदूत घेत राहता, त्यावर नकळत कितीतरी विचार करू लागता. त्यातली किती खरी अन किती खोटी हेसुद्धा माहिती नसते.”

“काका, त्याचे फायदेपण तर आहेत. वासूची न्यूज मला fb वरच कळाली, लगेच मी येऊ शकलो.” वैभवने तोकडा प्रयत्न करून पहिला.

“औषध हे औषधापुरतेच घ्यावं मुला. औषधाचेच व्यसन लागले तर काय होईल? तुम्ही मुलं अर्धा तास मोबाईल शिवाय जगू शकत नाहीत. सतत मोबाईलशी चाळा करीत असता. सतत काहीतरी हॅपनिंग हवं आहे. पण बाळा, हॅपनिंग म्हणजे एट टू फिनिश, इन-कम्प्लीट किंवा अर्धवट. त्या अर्धवटतेचं व्यसन तुम्हाला जडतंय त्याचा विचार नको का करायला? एक विषय संपत नाही कि दुसरा मेसेज, लगेच दुसरा मेल, एखादी नवीन जाहिरात.. किती ठिकाणी विखुरले जाताय याचं काही भान? तुम्हाला शांततेची, काही वेळ स्थिर बसण्याची जणू भीती भरलीय. कोणीतरी 3 वर्षापूर्वीचा तुकतुकीत फोटो लावतो आणि गाडी घेतल्याचा फोटो अपलोड करतो. कोणी एखादा तिसऱ्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या हॉटेलात फुकटात जातो अन तिथला फोटो टाकतो. परंतु, प्रत्यक्षात काय असते? ते फोटो टाकणाऱ्याच्या मागे किती आग लागलेली आहे किंवा आयुष्याचे चटके बसून-बसून त्याचा चेहरा आज किती काळा-ठिक्कर पडलाय हे कोणाला दिसत नाही. तो मात्र जुनेच फोटो टाकत राहतो. पाहणाऱ्याला वाटावे काय मस्त सुरु आहे या सर्वांचं,  आणि माझ्याच आयुष्यात इतके प्रॉब्लेम का?  एक आभासी जग तयार करून त्यात तुम्ही स्वतःला कोंडून घेता. तुमचे नसलेले प्रॉब्लेम  मग तुम्हाला मोठे वाटू लागतात अन आयुष्य विनाकारण कठीण वाटू लागतं. अरे, तुम्ही जर स्वतःलाच सहन करू शकत नाहीत तर इतर कोणी तुम्हाला कसे सहन करू शकत असेल? जितका तुम्ही या यंत्रांचा वापर कराल तुम्ही स्वतःच्या मर्यादाच पुन्हा-पुन्हा अनुभवाल कारण इतरांशी सतत तुलना करीत राहाल आणि जितका स्वतःला वेळ द्याल तितके स्वतःच्या सामर्थ्याला ओळखाल.१५ वर्षांपूर्वी याशिवाय जगतच होते ना रे लोकं, मग हे आजच इतकं अवघड कसे झाले? स्वतःला वेळ न दिल्यामुळे, त्याचा स्ट्रेस बिल्ड-अप होतो आहे आणि वेग-वेगळे रूपं घेऊन तो तुम्हाला पोखरतो आहे… सांभाळा गड्यांनो, सगळं काही असूनही एखाद्याला कमी आहे आणि तुटपुंज्या पगारातही दुसरा समाधानी आहे.. स्वतःला समजवायला शिका… दोन जीवाभावाचे मित्र आणि आनंद घरात सर्वत्र…, जगायला इतकंच भरपूर आहे वैभव..” माधवराव काचेतून वसंताकडे पहात बोलले…

गोष्ट कशी वाटली ते लिहा, आवडल्यास मित्रांमध्ये जरूर शेअर करा..

वि.रा…!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: