जाणती प्रजा !

                     आटपाट नगरीचा राजा होता. कर्तव्यदक्ष, निर्मोहि अन् न्यायनिष्ठुर अशी त्याची ख्याति होती. आपल्याला मिळालेली राजगादी ही पाच वर्षासाठी लागलेली लॅाटरी नसून लोककल्याणासाठी मिळालेली संधी याची पुरेपुर जाणिव ठेवणारा व त्यासाठीच झुरत राहणारा एक निर्मळ राजा. सत्तेत आल्यासरशी त्याने आपल्या मंत्र्यांना लगबगीने कामं ऊरकण्याचे आदेश दिले, करावयाच्या कामांची यादी आणि त्यासाठी लागणारा वेळ यांचे कोष्टक बनविण्याचे फर्मान जारी केले. मुदत संपली तरी काही मंत्री मात्र कामाला अजूनहि लागलेले दिसत नव्हते. त्यातले काहि तर नशिबाने मिळालेली संधी सोडू इच्छित नव्हते. आजपर्यंत  नदीच्या काठावर ऊभे राहून जमेल तसे हात ओले केले होते. आज नदीच ताब्यात आली होती शिवाय पुढच्या १०० पिढ्यांची जबाबदारी होती, मग काय पहावे? जमेल तसे सुरु होते. कामं काय,सुरुच राहणार आहेत. परंतु अशी संधी पुन्हा पुन्हा थोड़ीच येते. राजाला एव्हाना कल्पना येऊ लागली होती. राज्याची घड़ी वर्षानुवर्ष विस्कटलेली होती. समज असूनही आधीचा राजा परिणामकारक ऊपाययोजना करु  शकलेला नव्हता, त्याला कारणंही बरीच होती. जबाबदारीचे भान असलला हा नवा राजा मात्र शांत बसणारा नव्हता. काही जाणकार लोकांशी चर्चा करत असता एक  गोष्ट त्याच्या लक्षात आली, पैसा जे विनिमयाचे साधन होते, त्याला जनतेने चक्क  वस्तुरुपाने साठवायला सुरुवात केली होती. साठवलेल्या ह्या पैशांची कुठेही नोंद होणार नाही याची पुरेपुर काळजी हा प्रत्येक साठेबाज घेत होता. हेच सर्व समस्यांचे मुळ होते. व्यवहारात उपलब्ध नसलेला हा पैसा प्रत्यक्षात मात्र सर्वच व्यवहार नियंत्रित करत होता. साठवलेला हा पैसा प्रत्येक देवाणघेवाणीमध्ये वापरुन साठेबाज आणखी  पैसा निर्माण करत  होता. हाच तो “काळा पैसा”. संधी मिळालेल्या प्रत्येकाने मागच्या कित्येक वर्षांत बेसुमार काळा पैसा साठवला होता. एक समांतर अर्थव्यवस्थाच निर्माण झाली होती.

                  पैसा, जो सरकार बनवते, जो सरकारच्या मालकीचा असतो, तो पैसा काही ठराविक लोकांची वैयक्तिक मालमत्ता झाला होता. पैसा, ज्याला “चलन” असंही म्हंटलं जातं, तो अचल झाला होता, काही ठरविक लोकांच्याच मर्जीने चालू शकत होता. कष्टाने पैसे मिळवणे आणि मिळवलेला पैसा जाहिर करुन त्यावर कर भरणे हे मुर्खपणाचे लक्षण सिद्ध होत होते कारण कर भरणारा दिवसेंदिवस गरीब होत चालला होता तर कर चुकवणारा श्रीमंत. साठवलेल्या पैशाचा माज महागाईला निमंत्रण देत होता. महागाईला तोंड देता देता गरीब-मध्यमवर्गियांची पुरी दमछाक होऊ घातली होती. गोष्ट गंभीरच होती. हे सर्व थांबवायचे असेल तर साठवलेला पैसा पुन्हा चलनात आणणे हा एकच पर्याय होता. राजाने आवाहन केले, साठवलेला पैसा नाममात्र कर भरुन चलनात आणण्याची विनंती केली, पैसा कुठून आला हे विचारल्या जाणार नाही याची ग्वाही दिली. काहिंनी प्रतिसाद दिला, पैसे जमा केले. तरीही बराच पैसा बाहेर येणे आहे आणि कठोर ऊपाय केल्याशिवाय तो बाहेर येणार नाही अशी राजाची मनोमन खात्री झाली. राजाने फर्मान सोडले, चलनात असलेली जास्त किमतीची मुद्रा अवैध ठरवली गेली. सरकारच्या तोंडाला पानं पुसत आलेली साठेबाजांची टोळी अचानक निघालेल्या ह्या फर्मानाने गांगरली, असं काही कधी होईल याचा विचार त्यांच्या मनाला साधा शिवलादेखिल नव्हता, त्यामुळे पुढच्या ५६ पिढ्या बसून खातील एवढी करुन ठेवलेली पैशाची साठवणुक क्षणात धूळीत मिळाली. २०१० साली काळ्या पैशाच्या व्यवस्थेचे मुल्य भारत देशाच्या GDP च्या 20% आसपास होते. कित्येक राष्ट्रांची वार्षिक उलाढाल ज्याहून कमी आहे इतका पैसा ह्या समांतर अर्थव्यवस्थेत फिरत होता जो अनियंत्रित होता, देशासाठी अनुत्पादक होता, काही मुठभर लोकांच्या मालकीचा होता. यातला बराचसा पैसा “टॅक्स हेवन” मधून आलेला होता. टॅक्स हेवन म्हणजे छोटे देश किंवा राज्य जिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना करांमध्ये विविध सवलत देऊन स्थावर होण्यासाठी उद्युक्त केले जाते. अश्या ठिकाणी बऱ्याचद गोपनीयतेच्या कराराचा आधार घेऊन बेहिशेबी पैसा गुंतविला जातो किंवा तिथे नोंदणी केलेल्या संस्थेच्या नावाने पुन्हा देशात परत आणला जातो जो पूर्णतः पांढरा भासतो. अश्या प्रकारच्या व्यवस्थेने बेहिशेबी पैसा जमा केला जातो किंवा वाढविला जातो. 2012 मध्ये  Ministry of Finance तर्फे White Paper_Black Money नावाचा एक रिपोर्ट पब्लिश केला होता. तो वाचला तर या प्रकरणाची व्याप्ती कळेल. तो सारा पैसा आता शुन्य ठरला आहे. बराचसा बेहिशेबी पैसा जमीन, स्थावर मालमत्ता, सोन्यासारख्या वस्तुंमध्ये कधीच रूपांतरीत केल्या गेला असण्याची शक्यता असली तरीसुध्दा अधूनमधून सरकारी बाबूंच्या, छोट्या-मोठ्या उद्योगपतींच्या आणि राजकारणी लोकांच्या बाथरुम मधुन, कार्पेटखालून वा घराच्या सिलिंगमधुन निघणारा पैसा आपले अस्तित्व टिकवुन होता हे सिद्ध करतोच. काळ्या पैशाचे पुनर्निर्माण करण्यासाठी काळा पैसे लागतोच त्यामुळे तो पूर्णतः स्थावर मालमत्तेमध्ये रूपांतरित झाला होता यावर कोण विश्वास ठेवणार?  ९ नोव्ह. च्या या निर्णयाने हा सर्व पैसे खोटा झाला. तोंडावर निवडणुका आलेल्या, बऱ्याच लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रजेच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी तयारी केलेली होती, त्या सर्वांचा घोळ झाला. पैशाशिवाय आता निवडणूक कशी लढवायची हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासमोर उभा ठाकला. कारण निवडणूक गुणाने नाही तर रुपयाने जिंकायच्या हे ते सरावाने शिकलेले. मग जनतेचे कसे हाल होतात आहेत अशी ओरड करून दिशाभूल सुरु झाली. आजपर्यंत इतक्यांदा रांगेत उभे राहलो, कोणी कधी साधी दाखल हि नाही घेतली मग आज च इतका पुळका का? जनतेला  हे सर्व समजते आहे.

                           q    एक मात्र वाईट झाले. खरा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत होता. त्यांच्या गाठीला असलेले पैसे आज कवडीमोल होते. दैनंदिन गरजा ज्या नोटांवर भागत होत्या, त्या नोटाच आज अवैध ठरल्या होत्या. या अवैध नोटा सरकारात भरुन नविन नोटा घेणे अपरिहार्य होते. रोज लांबच लांब रांगा लागत होत्या. रांगेतच दिवस संपत होता. कामं ठप्प झाली होती. परंतु जुन्या नोटा बदलण्याशिवाय पर्याय तो काय होता? येथेही साठेबाज आपली पोळी भाजून घेत होते. जूनी नोट असेल तर नाहक जास्त खरेदीचा आग्रह करत होते. कोणी टाळत होता तर बरेच जण त्याला बळी पडत होते. सामान्यांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. जनता निमुटपणे याला सामोरी जात होती. रोग गंभीर आहे तेंव्हा त्याचा ईलाजही त्रासदायक असणार याची तिला जाणिव होती. जास्त ताण  पडला तो हातावर पोट पाळणाऱ्या घटकावर. एक तर तो घटक बँकिंग पासून हटकून आहे, जितक्या सुलभतेने कार मधून आलेल्याला बँकेत व्यवहार करता येतात तितक्या सोप्या पद्धतीने पायी चालत येणाऱ्याला सर्विस मिळत नव्हती. शिवाय मिळकतच मुळी कमी असल्यामुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याचा उल्हास या थरात फारसा नव्हता. त्याचे पैसे घरातच एखाद्या डब्यामध्ये मावत होते पण मोठ्या नोटाच त्यात प्रामुख्याने असणार. हाच तो घटक होता जो कर्जासाठी बँके ऐवजी Informal Finance पसंद करत होता ज्यामध्ये प्रामुख्याने निधी, हुंडी, चिट-फंड येतात. कागदी प्रक्रियेचा अडथळा जो प्रामुख्याने बँकेत असतो तो इथे कमी होता. शेतकरी, छोटे व्यापारी, अडती, हमाली सर्वच लोक अशा प्रकारचे लोण वापरत होते. भारताच्या GDP मध्ये  ४५% हिस्सा आणि जवळजवळ ८०% रोजगार सामावून घेणारे हे सेक्टर मात्र आज या निर्णयाच्या कचाट्यात सापडले आहे. या सर्वानाच आज या निर्णयाने अडचणीत आणले आहे. त्या सर्वांचीच साठवण आज टांगणीला आहे.पैसे सुरक्षित आहेत मात्र तो जास्त हवालदिल आहे कारण रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे. व्यवहार सुरळीत व्हायला निदान महिना अजून जावा लागेल तोपर्यंत त्याने तग धरायला हवा.             

            जगात इतर देशातही अशी उदाहरणे आहेत जिथे आधीची करन्सी रद्द करून सरकारने नवीन करन्सी उपलब्ध करून दिली. EU  ने २००२ मध्ये, फिलिपिन्स ने २०१५ मध्ये तर झिम्बाब्वे मध्ये पण असे घडल्याची उदाहरणे आहेत पण त्याठिकाणी जुनी करन्सी चलनातून लगेच बाद ना ठरवता व्यवहारात वापरण्याला परवानगी होती. भारतात मात्र काळा पैसा रोखण्याच्या दृष्टीने इतके कडक धोरण राबवणे अगत्याचे झाले असणार. काळा पैसा शोधणे अवघड होते, तो कुठे आणि कसा निर्माण होतो ते शोधणे अवघड होते. त्यामुळे असा तातडीचा कठोर निर्णय घेऊन विद्यमान सरकारने त्यांची कटिबद्धता तर सिद्ध केलीच परंतु काळाबाजार करणाऱ्यांचे कंबरडे सुद्धा मोडले. जरी या निर्णयाचे स्वागत असले आणि सरकारला पाठिंबा असला तरी सरकारने हि लवकरात लवकर पाऊले उचलून परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा.या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागतच झाले. दाबून ठेवलेला पैसा चलनात आला तर महागाई कमी होईल, सरकार कडे शिलकी जमा असेल ज्यामुळे बँक आणखी स्वस्तात कर्जे देऊ शकेल. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी भरण्यास सुरुवात होईल. करचुकवेगिरी ऐवजी श्रमाला आणि इमानदारीने कर भारण्याला प्रतिष्ठा येईल अशी आशा करण्यास हरकत नसावी. हा निर्णय राबवताना त्यातील त्रुटी ध्यानात घेऊन व आणखी काय पाऊले उचलता येतील ज्यायोगे भविष्यात पुन्हा असा काळा बाजार तयार होणार नाही या साठी प्रयत्नरत राहावे लागेल. शिवाय स्थावर मालमत्ता जी इतर कोणाच्या नावे नोंद करून लपवून ठेवली आहे त्याविरुद्ध सुद्धा मोहीम हाती घेणार हे राजाने जाहीर केले आहे. या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन. पण एकटा जाणता राजा आज काही हि करू शकत नाही, प्रजेने हि शहाणं होणं गरजेचं होतं. आणि ज्या संयमाने प्रजा ह्या स्थित्यंतरातून जात आहे, ज्या धीराने ह्या आणीबाणीला तोंड देत आहे नक्कीच म्हणावे लागेल कि प्रजा जाणती झाली आहे.

विरा…!

12 thoughts on “जाणती प्रजा !

 • November 19, 2016 at 3:13 pm
  Permalink

  खुपच अभ्यासपुर्वक लेख

  Reply
  • November 20, 2016 at 6:27 am
   Permalink

   Thank you. hope you will like upcoming posts too

   Reply
 • November 19, 2016 at 4:02 pm
  Permalink

  Very thoughtful article. Keep it up.

  Reply
  • November 20, 2016 at 6:27 am
   Permalink

   Thank you dear… lots of topics keep appealing me everyday.. lets see how much i can put forth.. thank you for encouragement.

   Reply
 • November 19, 2016 at 5:10 pm
  Permalink

  Abhinandan… Atishay sutasutit sahaj samajel ashya shabdat abhyaspurvak mandani keliy….

  Reply
 • November 20, 2016 at 3:04 pm
  Permalink

  Very nice sir…i liked it…

  Reply
 • November 20, 2016 at 3:29 pm
  Permalink

  The feeling of common man is given in right way. This article is not only presenting current situation but also giving a positive thought to government and public.

  Reply
  • November 20, 2016 at 3:48 pm
   Permalink

   Thank you dear.. it feels great to get appreciated by people like you. rgds

   Reply
 • November 20, 2016 at 3:41 pm
  Permalink

  Very Nice Raut Sir .. It’s really encouraging and that’s what people actually want this time and these types of Encouragements are really needed.

  Reply
  • November 20, 2016 at 3:47 pm
   Permalink

   Thank you.. hope you will enjoy my future posts too.. you can subscribe to email notifications also.

   Reply
 • November 23, 2016 at 1:47 am
  Permalink

  Excellent article. Keep the spirit of writing.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: