घरातलं Facebook काय म्हणतंय?

मागच्या आठवड्यात न्युज पेपर मध्ये एक बातमी वाचनात आली.. एका बड्या फिल्म स्टारला त्याच्या मॅनेजरने काही काळासाठी सोशल साईट्स न वापरण्याचा सल्ला दिला आहे.  मागील काही दिवसांपासून तो फिल्म स्टार सतत या ना त्या कारणामुळे नकारात्मक चर्चेत असून त्याची लोकप्रियता घटण्याची भीती निर्माण झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी त्याने सामाजिक घटनांबाबत मौन बाळगावे तसेच फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे असे त्याच्या मॅनेजरने सुचवले आहे अशी ती बातमी होती. थोडक्यात काय, तर जे वाटते ते जशास तसे न बोलता त्याने आपल्या reactions आणि responses moderate करूनच प्रतिक्रिया द्याव्यात. कारण व्यक्त केलेल्या मतांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास प्रतिमा मलिन होईल आणि एक स्टार म्हणून त्याची कारकीर्द धोक्यात येईल अशी भीती त्यां मॅनेजरला वाटत आहे. त्यासाठी त्याने एक टीमच अँपॉईंट केलीय जी त्या स्टारचे फेसबुक, ट्विटर वगैरे handle करेल. मनात आले हे फक्त स्टार किंवा सेलिब्रिटीज साठीच गरजेचे असेल का? आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला हि गोष्ट लागू होत नसेल? भले हि आपण स्टार अथवा सेलिब्रिटी नक्कीच नाही मात्र आपणसुद्धा आपल्या वर्तणुकीतून आपल्या घरामध्ये, मित्रांमध्ये किंवा ऑफिस मध्ये स्वतःची एक  ओळख, एक प्रतिमा निर्माण करत असतो. आपला इतरांशी सतत सुरु असलेला संवाद, आपण व्यक्त केलेल्या भाव-भावना आणि आपला साद-प्रतिसाद यातूनच आपली इतरांना ओळख होत असते. आपली मुलंसुद्धा आपल्याकडे बघूनच भावना समजून घ्यायला आणि व्यक्त व्हायला (react करायला) शिकत असतात. मग आपल्या वागण्यामुळे किंवा प्रतिक्रिया देण्यामुळे आपलीसुद्धा  लोकप्रियता घटत नसेल का?

                            उदाहरणादाखल एक गोष्ट सांगतो.  माझ्या एका मित्राच्या वडिलांना सतत सल्ले देण्याची सवय होती.  ती  भावंडं जेंव्हा कधी आपापसांत चर्चा करीत, त्यांची चर्चा मध्येच तोडून पिताश्री सुरु व्हायचे. अभ्यास, खान-पानाच्या सवयी, रात्रीच जागरण, अभ्यासाची रूम, त्यातला पसारा, एक ना अनेक. एकदा त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला कि सर्व ऐकवूनच ते शांत व्हायचे. ती मुलं तर रोज ऐकतच होती  शिवाय घरी कोणी मित्र आले तर त्यांची सुद्धा खैर नसायची.  बरं, आपण मन लावून ऐकतोय तर ठीक, पण दुर्लक्ष करतोय असे वाटले तर पुन्हा आपण आयुष्याबद्दल किती निष्काळजी आहोत यावर सुरु व्हायचे. खूप मन लावून ऐकावे लागायचे. त्यामुळे आम्ही जर कधी मित्राच्या घरी गेलो अन त्याच्या वडिलांच्या कचाट्यात सापडलो तर खूप मन लावून ऎकत आहोत असा चेहरा करून त्यांच्यासमोर उभे ठाकायचो.  रोज रोज तेच ऐकून तर सर्व पाठ झाले होते. आज हि 20-25 वर्षांनंतर त्यातला शब्द न शब्द आठवतो इतक्यांदा ते ऐकून झाले होते. त्याचा परिणाम असा झाला कि कुठलीही गोष्ट वडिलांपर्यंत जाणार नाही याची काळजी ती भावंडे घेऊ लागली. सर्वचजण घरात इतक्या हळू आवाजात बोलत जशी बोलणे हि चोरी होती. घरात कायम curfew लागला आहे असे वाटायचे. खरं सांगायचं तर त्याच्या वडिलांची तळमळ योग्य होती. आपली मुले चुकू नये, भरकटू नये असे त्यांना वाटत असे. म्हणून सतत पिताश्रींचा “क्लास” सुरु असायचा. पण ज्या आक्रमक शैलीत ते वारंवार तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगत असत त्याचा शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला, ती मुलं त्यांच्या पासून दुरावली. असे कित्येक पालक आहेत जे मुलांना अखंड उपदेश देत राहतात. मुलं कोणत्या मनस्थितीत आहे ते जाणून न घेता फक्त आपले अनुभव तेवढे त्यांच्या पुढ्यात मांडत राहतात. आपणच व्यक्त होत राहतात मात्र मुलांना व्यक्त होऊ देत नाहीत. व.पुं.च्या पुस्तकातले एक वाक्य आठवते, “जिथे मन मोकळं करता येतं, ते घर.” माझ्या मित्राच्या नशिबी असं घर कधी आलंच नाही. आणि म्हणूनच वाटतं कि नको त्या वेळेला नको ते बोलून आपण नात्यांमध्ये दुरावा तर निर्माण करीत नाही आहोत याचा पालकांनी विचार करणे आवश्यक ठरते.  मुलांचं चुकणं, त्या चुकांमधून शिकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण वारंवार त्यांच्या चुकांवर बोट ठेऊन रागावण्यापेक्षा आपण त्यांना चुकांकडे तटस्थतेने पाहायला शिकवणं, त्यातून बोध घेऊन पुढे जायला मदत करणं इतकंच काय ते गरजेचं असतं. त्यासाठी आलेला राग गिळून घेऊन पालकांनी आपली नाराजी विधायक मार्गाने व्यक्त करायला हवी.

                    father-son

                            reaction moderation च्या संदर्भातील उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नवरा-बायकोचे भांडण. पहिल्या एका वर्षात क्वचितच भांडणं होतात. दुसऱ्या वर्षांपासून हळूहळू कुरबुर सुरु होते. कारण काय माहित आहे? पहिल्या वर्षी दोघेहि नाण्याची दुसरी बाजू बघत असतात. “त्याने” काही जर म्हंटले तर “त्याला असे नसेल म्हणायचे” असं म्हणून “ती” दुर्लक्ष करते. किंवा “तिने” जर काही केले, जे “त्याला” आवडत नाही तर “मुद्दाम नसेल केले तिने, तिचा काही दुसरा हेतू असेल”, असे म्हणून “तो” पण दुर्लक्ष करतो. थोडक्यात दोघेहि आप-आपल्या reactions moderate करतात अन वाद टाळतात. पण जस जशी व्यक्ती कळू लागते, “ती” त्याला किंवा “तो” तिला “मग ओळखायला” लागतो. मग त्यांची रोजच जुंपते. “कळतात हो टोमणे आम्हाला” किंवा “मला माहिती आहे नाsss, चांगली ओळखते मी तुम्हाला” इति सौ. “हो, तू मुद्दाम केले आहेस, समजतंय मला सगळं “, इति श्री. कारण नाण्याची दुसरी बाजू एव्हाना हरवलेली असते. मग response moderation बंद करून दोघेहि आपल्या खऱ्या अवतारात हजर असतात. जर आपण ती दुसरी बाजू खरी मानली तर हे वाद-विवाद टाळू शकतो हे दोघे हि सोयीस्कर विसरतात. म्हणूनच वाटतं, निदान नातं जपण्यासाठी जरी हे  कटाक्षाने पाळले गेले तरी खूप काही साध्य होऊ शकते, नाही का?

                             संवादात खरं तर फार सामर्थ्य आहे. संवादाने बांधलेली नात्याची वीण घट्ट असते, एकमेकांना आधार देत, एकमेकांचा आधार बनत आयुष्यात पुढे जाण्याची किमया फक्त संवादानेच शक्य आहे. आणि संवादासाठी आवश्यक असतं स्वतःला व्यवस्थित व्यक्त करता येणं. आपल्या reactions आणि responses moderate करता येणं ज्यायोगे आपल्या माणसांना आपण comfort देऊ शकू. त्यासाठी लागतं तरी काय? थोडासा संयम आणि थोडासा समजूतदारपणा. एखाद्या व्यक्तीबद्दल राग आला असेल किंवा कोणाच्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर त्यावर लगेच प्रतिक्रिया ना देता थोडा धीर धरणे आणि पूर्ण विचारांती योग्य शब्दात आपल्याला काय वाटले, कशामुळे वाटले ते सांगणे केंव्हाही योग्य ठरते.  भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पडत असते. स्वतःच्या भावना ओळखणे (मनात नेमके कोणते विचार येत आहेत), त्या भावनांमागील कारण तसेच समोरच्या व्यक्तीच्या वर्तणुकीमागील कार्य-कारणभाव समजून घेणे हा या प्रक्रियेचा पहिला टप्पा असतो. पूर्ण विचारांती योग्य पद्धतीने, योग्य वेळी, आवश्यक तितक्या प्रमाणात व्यक्त होणं हा झाला त्याच्या पुढचा टप्पा. इतकं सगळं जर करायचं तर थोडा वेळ घेऊनच आपली प्रतिक्रिया देणे संयुक्तिक ठरते. वेळ घेण्याचा दुसरा फायदा असा होतो कि मनातले नकारार्थी विचार बाजूला पडतात आणि मन शांत होते. अशावेळी जर आपण इतरांचे वागणे हे त्यांचे “वागणे” आहे, “त्यांच्या दृष्टीने तसे वागणे योग्य असेल” असे स्वतःला समजावून सांगितले तर राग आणखी निवळतो आणि परिस्थिती नियंत्रणात राहायला मदत होते. प्रत्येक घडलेल्या घटनेत स्वतःला केंद्रबिंदू न मानता काही प्रसंगाकडे दुर्लक्ष करणे आणि इतरांच्या (लहान असो व मोठा) भावनांबद्दल, मतांबद्दल सहिष्णुता बाळगणे हा या प्रतिसाद देण्याच्या भूमिकेचा पाया असतो. हा पाया जितका भक्कम तितका आपण देत असलेला प्रतिसाद उत्तम. नकारात्मक गोष्टींवर सतत भर ना देता प्रत्येक प्रसंगामधील सकारात्मक  बाजू पाहायला प्रत्येकाने शिकणे गरजेचे आहे. एकमेकांवर सतत प्रेमाचा अन कौतुकाचा वर्षाव करत राहणं किंवा एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे याविषयीच्या भावना व्यक्त करणं, करत राहणं नितांत गरजेचं असतं. शेवटी कौतुक कोणाला नको असते? (Every soul needs appreciation). आपल्या अशा प्रतिसाद देण्याने निकोप नातेसबंध वाढीला लागून घरातील सर्वांच्या भावनिक विकासात त्याची मोलाची मदत होते. मुलांनाहि त्याचा फायदा होतो. हीच मुले पुढे समाजात मिसळतात तेंव्हा त्यांचे व्यक्त होणे (React करणे) आदर्शवत ठरते. घर-घरांमध्ये सुसंवाद असेल तरच समाजात सुसंवाद नांदेल हेच खरं, नाही का? ….. सारांश काय, तर फिल्मस्टारला मॅनेजर आहे, जो त्याचं व्यक्त होणं manage करेल. परंतु, आपलं अकाउंट तर आपल्यालाच manage करावं लागणार आहे.  काय म्हणता, तुम्ही करताय ना ?

विरा.!

One thought on “घरातलं Facebook काय म्हणतंय?

  • November 23, 2016 at 5:08 pm
    Permalink

    Aajpasun aamache facebook manage karayla shikawech lagel…… Masta lihiley Vira…… Really great to read your blog….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: