इमोशनल इंटेलिजन्स – डॅनियल गोलमन

आजच्या पुस्तक मंथन मध्ये डॅनियल गोलमन यांचे भावनिक बुद्धिमत्ता ह्या पुस्तकाचा सारांश देत आहे

बुद्धिगुणांक (I.Q.) आणि तांत्रिक कौशल्ये खालच्या पातळीवरील नेतृत्वासाठी जितकी महत्वाची मानली गेलेली आहेत तितके प्राधान्य त्यांना वरच्या पातळीवरील नेतृत्वगुणांसाठी दिले जात नाही. असे म्हणतात कि C.E.O. नां बुद्धिमत्ता आणि व्यावसायीक कौशल्ये पाहून कामावर घेतले जाते आणि भावनिक  बुद्धिमत्तेच्या अभावामुळे कामावरून काढून टाकले जाते.

भावनिक बुद्धिमत्ता हे डॅनियल गोलमन यांनी लिहिलेले पुस्तक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.

उच्च्य बुध्यांक असलेले परंतु भावनिक बुध्यांक कमी असलेले लोक, कमी बुध्यांक असलेल्या मात्र उच्च्य भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या हाताखाली का काम करत असतात याचे उत्तर जाणून घेणे असल्यास गोलमन यांचे हे पुस्तक वाचावयास हवे.

जी व्यक्ती स्वतःच्या भावना समजून घेते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवते आणि मगच परिस्थिती हाताळते ती व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी असते. अशी व्यक्ती सकारात्मक वातावरण निर्माण करते ज्यायोगे समूहाचे नेतृत्व करणे आणि इतरांकडून अपेक्षित कामे करून घेणे त्यांच्यासाठी सहज शक्य असते.

आपली शिक्षण पद्धती भावनिक बुद्धिमत्तेवर भर ना देता केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर देते. परिणामी, आयुष्यातल्या कटू-गोड क्षणांना हाताळण्याची शैली विकसित होत नाही.

बोध :
भावना कशासाठी असतात?

सर्वच सजीवांना भावना असतात. सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करून घेऊन सद्य परिस्थिती जीवनास अनुकूल आहे कि प्रतिकूल आहे याचे संवेदन प्रत्येक सजीवास त्याच्या चेतासंस्थे मार्फत होत असते. चेतासंस्थेस मेंदूने दिलेला पहिला प्रतिसाद म्हणजे उत्पन्न झालेली भावना भावना.
भावनेचा मूळ उद्देश जीवाला धोका आहे (दुःख) किंवा आनंदासम परिस्थिती आहे याचे ज्ञान करून घेणे. म्हणून भावना तर्काच्या आधी येते.
ज्याचे भावनेवर नियंत्रण नाही त्याच्याकडून नेहमी भावनेच्या भरात अगोदर कृती होते आणि मग त्यावर विचार केला जातो. थोडक्यात, आधी कृती आणि नंतर विचार. परिणाम स्पष्ट आहे, ताणलेले संबंध, राग, चिडचिड, ताण-तणाव आणि शारीरिक व्याधी.

भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे ?

प्रत्येक भावनेच्या मुळाशी एक गरज अथवा अपेक्षा असते. उदाहरणादाखल जर दिलेला शब्द जोडीदाराने पाळला नाही तर आलेल्या रागाच्या मुळाशी मला कुणी गृहीत धरू नये हि अपेक्षा असते. ती पूर्ण न झाल्यामुळे दुःख होते आणि उद्विग्नता येते. ज्यावेळी, अशी उद्विग्नता मनाचा ताबा घेऊ लागते, तेंव्हा वेळीच सावध होऊन शब्द खरंच का पाळल्या गेला नाही? जोडीदाराची काय अशी अडचण होती यावर लक्ष देऊन मनाचा तोल सावरणे गरजेचे असते. थोडक्यात भावनेने शरीराचा ताबा घेण्याआधी मेंदूने आपले नियंत्रण स्थापित करणे आवश्यक असते. त्यायोगे Inter-personal relations सुधारता येतात. जीवन प्रभावी आणि समाधानकारकतेने व्यतीत करता येते.

आत्मनिरीक्षण:

मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेकडे तटस्थपणे पाहणे, ती भावना कशामुळे उत्पन्न झाली हे समजून घेणे  आणि केवळ त्या भावनेची अनुभूती घेणे याला आत्मनिरीक्षण असे म्हणतात. आत्मनिरीक्षणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनात उठणारे तीव्र भावनावेग अथवा त्रासदायक विचार यांच्यावर नियंत्रण ठेवून चित्त शांत ठेवता येते. मनात येणारे रागाचे, नकारात्मकतेचे वादळ दोन पाऊले मागे जाऊन दुरून अनुभवता येते. त्या भावनावेगात बुडून न जाता, त्याकडे केवळ एक जाणीव म्हणून पाहता येते आणि संभाव्य ताण-तणाव टाळता येतात. भावनांची अशी जाणीव होणे हेच मुळात भावनिक कौशल्य आहे.

भावनावेगाला अनुसरून कृती करणे हि उत्क्रांतीच्या अवस्थेतील एक गरज होती. कारण मनात येणाऱ्या चिंतेची, रागाची दखल न घेणे म्हणजे हिंस्त्र श्वापदाच्या हातून जीव गमावणे असा सरळ हिशोब होता.
ज्यागतीने, सामाजिक बदल झाले आणि जीवन सुरक्षित झाले त्यागतीने आपल्या भावना नियंत्रित करण्याची व्यवस्था आपल्या शरीरात तयार होऊ शकली नाही. त्यामुळे परिस्थिती बदलली मात्र परिस्थितीचे आकलन करण्याची गल्लत मात्र आपल्या मेंदूकडून जुन्याच पद्धतीने होते आहे. मनाविरुद्ध घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या अस्तित्वाशी जोडून आपल्याकडून प्रतिक्रिया दिल्या जातात आणि आणि त्यामुळेच सर्व घोळ आहे.

थोडक्यात, आपल्या तसेच इतरांच्या भावनांविषयी मनात येणाऱ्या दुःखद, क्रोधाच्या किंवा नकारात्मकतेच्या प्रत्येक विचारला प्रयत्नपूर्वक दूर सारणे आणि विचारपूर्वक परिस्थिती हाताळणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. प्रत्येकाने ती आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे. संग्रही असावे असे हे पुस्तक विकत घ्यायला हरकत नाही.

आपल्या मित्रांना हा सारांश शेयर करायला विसरू नका..

वि. रा. !!!

 

 

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: