आभाळाएवढे आयुष्य

व्हिक्टर फ्रॅंकलचे पुस्तक Man’s search for the meaning वाचून काढले. आयुष्यातल्या संकटांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन त्या पुस्तकात दिलेला होता. “समोर उभ्या असलेल्या अडचणींकडे दुर्लक्ष्य करा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी मेहनत घ्या. आयुष्याला स्वतःचा काहीच अर्थ नसतो. आपण त्याला अर्थ देत असतो. तेंव्हा हा अर्थ जाणीवपूर्वक निवडा.”

Man’s search for the meaning  पुस्तकाचा सारांश मी माझ्या मागच्या लेखामध्ये दिलेला आहे. तुम्ही तो येथे वाचू शकता.

इतक्या सोप्या भाषेत लेखकाने सर्वच दुःख बाजूला सारून कसे जगायचे याचा पाठ सांगितला. मनात कुतूहल होतं, “इतकं सहज असेल का हे सर्व?’ आजूबाजूला नजर टाकली तर हेच दिसतं कि प्रत्येक जण आपले दुःख कवटाळून बसलेला असतो. कोणालाहि जरा धक्का द्या, तो रडून रडून आपली कहाणी सांगतो. मनात आलं कि आपण शोधून तर पाहू, व्हिक्टरचे तत्वज्ञान आत्मसात केलेला कोणी दिसतोय का ते? त्यातून हातात आलेली हि एका दुसऱ्या माणसाची गोष्ट. त्याचे नाव Dr. जेरी लॉँग.

वयाच्या १७ व्या वर्षी डाइव्हिंग (वॉटर स्पोर्टचा एक प्रकार) करतांना त्याची मान मोडली. जेरी संपूर्ण जायबंदी झाला. मानेखालचे सर्व शरीर निकामी झाले आणि सर्व हालचाली बंद झाल्या. सारे काही संपले. काय करू शकतो मनुष्य अश्या अवस्थेत? सर्व काही इतरांवर अवलंबून ठेऊन जगणे शक्य आहे? आणि इतर कोणी त्याच्यासाठी किती करणार?

जायबंदी अवस्थेत दिवस कंठत असतांना पुस्तक वाचणे हा जेरीचा एकमेव छंद होता. एके दिवशी व्हिक्टरचे पुस्तक त्याच्या वाचनात आले. त्याने थेट व्हिक्टरला पत्र लिहून आपली दुर्दशा कथन केली. व्हिक्टरनेहि उत्तर पाठवले आणि दोघांची मैत्री सुरु झाली.

व्हिक्टरच्या विचारांनी प्रभावित होऊन जेरीने आपली अवस्था स्वीकारली. जे बदलू शकत नाही त्याचा विचार करून उपयोग नाही हे त्याला पटलं. आजचे आयुष्य कसे आहे याचाच विचार करत बसण्यापेक्षा उद्या आयुष्य कसे असावे याचा विचार त्याने सुरु केला.

आपले शिक्षण घरूनच अभ्यास करून त्याने सुरु केले. १९९० मध्ये जेरीने क्लिनिकल सायकॉलॉजिमध्ये पीएच. डी. केली. अध्यापकाची नौकरीसुध्दा स्वीकारली आणि व्हीलचेअरवर बसून त्याने आपले अध्यापनाचे कार्य आयुष्यभर केले. अनेक सन्मान मिळवले. त्याच्या सन्मानांबद्दल वाचलेली माहिती मी खाली मूळ स्वरूपात येथे देत आहे.

“He was the recipient of numerous awards and honors including the Michael Whiddon Award, Honorary Member of the Austrian Medical Society for Psychotherapy, the Viktor Frankl International Institute of Logotherapy “Medallion of Responsibility”, several university teaching excellence awards and, in 1993, was recognized on a national scale in the United States as he was named “Teacher of the Year” by The National Institute of Staff and Organizational Development. In 2001 Jerry Long received the “Viktor Frankl Award of the City of Vienna.”

आपल्या राहत्या शहरामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य सांभाळून जेरी अनेक देशांतर्गत तसेच अंतर्देशीय उपक्रमांमध्ये सहभागी होता. लोकांशी संवाद साधून, त्यांना धीर देऊन आयुष्यात त्यांना उभं करण्यासाठी अहोरात्र झटत होता. त्याने कित्येकदा जागतिक लोगोथेरपी परिसंवाद मंचाला संबोधित केले आहे.

आयुष्याला खरंच मर्यादा असतात?

आयुष्यात अडचणींचा पाढा सतत वाचून, भूतकाळात घडलेल्या काही घटनांमध्ये अडकून आपण स्वतःला एक जोखडामध्ये अडकवून घेतो. भविष्य घडवायचे सोडून भूतकाळाला दोष देत राहतो किंवा वर्तमानाला घट्ट चिकटून राहतो. आपले आयुष्य थांबवून टाकतो.

पण आयुष्य मुळी थांबते का? ते तर चालूच असते. रोज एक दिवस उगवतो, रोज आपली कामे सुरु राहतात, आपण खातो-पितो, लोकांना भेटतो अन काय बोलत राहतो? “माझा प्रॉब्लेम तुला नाही कळणार, मी कसा जगतोय माझे मलाच माहिती किंवा “माझ्यावर काय प्रसंग गुदरलाय ते तुला सांगूनही समजणार नाही”, “असू दे, माझे प्रॉब्लेम माझेच राहणार, कोणीच माझी मदत करू शकत नाही. वगैरे वगैरे वगैरे…..

अरे यार, तुम्ही स्वतः तरी स्वतःची मदत करताहात का? अडचण छोटी असो वा मोठी, त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे असे कधी तुम्ही स्वतःला कधी सांगितले का? या अडचणींमधू बाहेर पडून मला आयुष्यात काही ध्येय गाठायचे आहे असा कधी ठाम निर्धार तुम्ही केला आहे का? जर तुम्हीच स्वतःला तुमच्या अडचणींमधून बाहेर काढू शकत नाही तर इतर कोणी तुम्हाला मदत  तरी कशी करणार?

अडचणींवर मात करायची आहे असे ठरवा, तुम्हाला बाहेर कोण काढू शकतो ते शोधा, त्याच्यापर्यंत पोहोचा आणि सरळ सांगा मला आयुष्य बदलायचे आहे, मला सहकार्य करा… हे जग असंख्य चांगल्या लोकांना भरलेलं आहे. किती तरी लोकं तुम्हाला मदतीचा हात देतील. पण गरज आहे ती तुमच्या निर्धाराची. त्याच्यापर्यंत तुमची हाक पोहोचायला हवी कि नको? ऊलट, आपण आपले दुःख गुणगुणत राहतो, त्याला कंटाळून लोकं आपल्यापासून दूर पळतात न मदतीचे मार्गच बंद होतात…

व्हिक्टरच्या शब्दांमध्येच जर सांगायचे असेल तर “जेरीचे आयुष्य हे लोगॉथेरपीचे तसेच मनुष्याच्या अचाट सामर्थ्याचे ज्वलंत उदाहरण आहे”

आपल्या एका भाषणामध्ये लोकांना संबोधून जेरी म्हणाला,” मला बरेचदा विचारले जातं कि मी चालू शकत नाही याचं कधी मला दुःख होतं का? त्यांना मी हेच सांगू इच्छितो कि मी माझ्या ध्येयाप्रती इतका व्यस्त आहे कि मी चालू शकत नाही हे प्रोफेसर व्हिक्टर फ्रॅन्कलच्या कधी लक्षातसुध्दा आलं नसेल. खरंतर, बहुतांशी लोकं आयुष्याशी झुंजच देत नाहीत. हे नेहमी लक्षात असू द्या कि आयुष्यात केवळ हात-पाय, डोळे किंवा बुद्धी असून चालत नाही तर आपल्या स्वप्नांना पंख देण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीच आपल्याला आयुष्यात उभं करू शकते.”

इतर प्राणी भविष्याचा विचार करू शकत नाहीत. भविष्याची जाण फक्त मनुष्याला असते. याचं कारण हेच असावं कि आपल्यासहित संपूर्ण चराचर सृष्टीचं भविष्य घडविण्याची जबाबदारी ईश्वराने मनुष्यावर टाकलेली असावी. परंतु, आपण आपली हि जबाबदारी दुर्लक्षित करतो. इतरांचं तर जाऊ द्या पण आपलं भविष्य घडविण्यासाठीसुध्दा आपण काहीच प्रयत्न करीत नाही. त्या प्रत्येकासाठी जेरीची हि लहानशी गोष्ट मोठा बोध ठरेल अशी अपेक्षा करतो.

जेरीच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीला माझा सादर प्रणाम.. माझा लेख वाचून एकाने जरी आपले आयुष्य बदलण्याचे ठरवले तरी माझा खटाटोप यशस्वी झाला असे मी समजेन. तेंव्हा हा लेख शक्य तितक्या लोकांना पुढे पाठवा.. बघूया हे वाचून कोणी आपल्या स्वप्नांना पंख देतो का?

पुस्तक संग्रही असावे असे वाटल्यास तुम्ही ते खालील लिंकवर क्लीक करून विकत घेऊ शकता.
इंग्लिश आवृत्ती – Man’s Search for Meaning

मराठी आवृत्ती – Arthachya Shodhat

खाली एक विडिओ दिलेला आहे ज्यामध्ये जेरी आणि व्हिक्टर फ्रॅन्कलची मुलाखत दिलेली आहे.. आवर्जून बघा.

 वि. रा.!!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

One thought on “आभाळाएवढे आयुष्य

  • March 20, 2018 at 3:56 pm
    Permalink

    आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर http://www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: